पत्र तेरावे 5
फ्रॉबेल हा जर्मन शिक्षणशास्त्रज्ञ सांगतो की 'लहान मुलें म्हणजे देवाचें काव्य ! जीवनांत ताल, छंद, नाच यांना महत्व आहे. मुलांना हावभाव करावे असें फार वाटतें. नाचावें, गावें असे वाटतें. यासाठी मुलांना निरनिराळया गाण्यांमधून शिकवा.' आपल्याकडे गुजराती लोकांत गर्बागाणी असतात. त्यांत हावभाव असतो. गर्बा जणुं लोकांच्या भावनांना वळण देणारें महान साधनच. प्लेटो म्हणत असें 'संगीत हा सृष्टिचा आत्माच आहे. तारे आकाशांत थरथरत आहेत. ते तेथे गात आहेत. गायनांतील तानांचा तो कंप आहे !' शिक्षणांत संगीताला फार महत्व. निदान लहान मुलांच्या शिक्षणांत तरी.
पेस्टॅलॉझी शिक्षणांत श्रमशक्तिला वाव द्यावा असे म्हणे. क्रिया शक्तिला अधिक अवसर द्यावा असे म्हणे आणि इटालियन भगिनी मादाम माँटेसरी मुलांच्या उपजत वृत्तीवर अधिक भर देतात. मुलांच्या भोंवती असे वातावरण ठेवावे, असे साहित्य ठेवावें, की त्यांतू ती आपोआप आपल्या भावनास व बुध्दीस अनुरुप व अनुकूल तें घेतील. शिक्षक हा नुसता मार्गदर्शक, सूचक. मुलेंच जणुं स्वत: शिकत आहेत. तीच स्वत:ची शिक्षक. गुजरातमधील थोर बालसेवक स्वर्गीय गिजूभाई यांनी भावनगर येथें दक्षिणामूर्ति नांवाची अभिनव संस्था चालविली होती, तेथे या पध्दतीचे प्रयोग होत असत.
अमेरिकेंतील बुकर टी. वॉशिंग्टन या निग्रो महात्म्यान औद्योगिक शिक्षणावर भर दिला. मुले स्वत:ची शाळा बांधीत आहेत, विटा पाडीत आहेत, कौले तयार करीत आहेत. मला असे वाटते काकासाहेब कालेलकर पंधरा-सोळा वर्षापूर्वी भरलेल्या एका राष्ट्रीय शिक्षण परिषदेच्या वेळी म्हणाले, 'उद्योगधंदा देणें हे पहिले काम. इतर काव्य-साहित्य .फिरायला जातांना, भांडी घासतांनाही शिकवतां येई.' मुलें घेऊन आपण फिरायला निघालो. सृष्टि समोर आहे. शिकवा त्यावेळेस काव्य. 'पक्षी कसे मंजुळ शब्द गाती?' हे का चार भिंतीत सांगू? 'वरी बिंब ते लाल आलें विशाल' हे का खोलींत कोंडलेल्या मुलांना शिकवूं? रोमाँ रोलाँनी आपल्या 'जी ख्रिस्टो पे' या कादंबरींत एका प्रसंगी एका पात्राच्या तोंडी पुढील अर्थाचे वाक्य घातले आहे. 'खांलींत मी गाऊं शकत नाही. मला नदीकाठी, जंगलांत जाऊं दे. तेथे माझी तान आपोआप बाहेर पडेल. पक्षी पिंज-यांत गाऊ शकणार नाही. तो रानावनांतील मोकळया हवेंतच गाईल.'
वर्धा शिक्षण पध्दतीने या सर्व विचारांतील सार घेतले आहे. वसंता, वर्धा शिक्षण पध्दतीत मुख्यत: प्राथमिक शिक्षणाचाच विचार करायचा होता. सर्व जनता साक्षर करावयाची तर कोणत्या मार्गाने, हा प्रश्र त्यांना सोडवायचा होता. ब्रिटिश सरकारने हिंदुस्थानच्या बाबतीत जर सर्वांत मोठें पाप काही केले असेल तर तें हे की जनतेच्या शिक्षणांकडे त्याने दुर्लक्ष केले. शंभर-दिडशे वर्षे राज्य करुनही शेकडा ऐंशी-नव्वद लोक निरक्षर, असे येथले चित्र आहे. येथील ब्रिटिश राज्यपध्दतीवर हा सर्वात माठा डाग आहे ! ब्रिटिश सरकारने दुय्यम व उच्च शिक्षणाकडे त्यांना नोकर वगैरे पाहिजेत म्हणून थोडेफार लक्ष दिले. परंतु प्राथमिक शिक्षण सर्वांना मिळावे म्हणून खटपट केली नाही. आजच्या काळांत जनता निरक्षर राहणे योग्य नव्हे.
उद्यां स्वतंत्र होणा-या हिंदुस्थानला आधी जर कोणते काम करावयाचे असेल तर सर्व जनता साक्षर करण्याचे. नवीन येणारी सर्व पिढी साक्षर हवी. लोकशाहीच्या काळांत निरक्षरता काय कामाची? ब्रिटिशांच्या राजवटींत हिंदुस्थान ही जगांतील अत्यंत दरिद्री असा देश झाला. चाळीस कोटी लोक आणि अत्यंत भीषण दारिद्रय ! उद्यां स्वतंत्र झालो तरी जनतेला शिकविण्यासाठी पैसा कोठून आणावयाचा, हा प्रश्न उभा राहील? ब्रिटिश सरकारने हिंदुस्थानवर दारुचे गुत्ते घातले आणि दारुचे उत्पन्न शिक्षणाकडे लावले. काँग्रेस तर दारुबंदीचा विडा घेऊन उभी राहिलेली. हिंदुस्थानचे ७५ ते ८० कोटी रुपये दारुत जातात. गरीब हिंदुस्थानने दारु सोडली पाहिजे. पूर्वी हिंदुस्थान चीनला अफू विकी. नामदार गोखले नेहमी वरिष्ठ कायदे कौन्सिलांत म्हणत, 'चीनला अफूचे व्यसन लावून आम्ही पैसे मिळविणे हे पाप आहे. हा अफूचा व्यापार बंद झालाच पाहिजे !' त्याप्रमाणेच काँग्रेस म्हणते की लोकांना दारुचे व्यसन लावून तिजोरीत पैसा भरणे हे नीतीवर उभ्या असणा-या वा जनहिताकडे दृष्टि देणा-या सरकारचे कर्तव्य नाही. जनतेचा आत्मा व्यसनांतून मुक्त केलाच पाहिजे.'