पत्र बारावे 1
विचारमंथन
प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद.
मागील पत्रांतून तुला यंत्रवाद, गांधीवाद, समाजवाद, साम्राज्यवाद, फॅसिझम वगैरेंविषयी थोडें थोडें लिहिलें होतें. गांधीवाद व समाजवाद यांतील साम्य व विरोध मी दाखवीत होतों. गांधीवादी लोकांची जीं तीन तत्वें तीं समाजवादानेंहि कशीं साधलीं जातात तें मी मांडले होतें.
गांधीवादी यावर म्हणतात कीं आमचें तुमच्या म्हणण्यानें समाधान होत नाही. यंत्रवादावर आमचा मुख्य आरोंप असा आहे की यंत्रानें मनुष्य केवळ यंत्र बनतो ! यांत्रिक निर्मितीत माणसाला आनंद नाही. मोठमोठया प्रचंड कारखान्यांत निरनिराळे भाग निरनिराळया ठिकाणीं बनत असतात. कोणा कामगाराला मरेपर्यंत चाकेंच करावीं लागतील. कोणाला टांचण्यांची डोंकीच करीत बसावें लागेल. त्याच त्या ठराविक बारीक बारीक वस्तु यंत्रामध्यें वर्षानुवर्षे करती राहावें लागतें. कामगार यंत्रासमोर आपला यंत्राप्रमाणें उभा असतो ! आणि त्या वस्तु भराभरा उत्पन्न होत असतात. त्या कामगाराला त्या निर्मितीत आनंद नाही. ' हें मी केलें, माझ्या बोटांनीं केलें, माझी बुध्दि मी हयांत ओतली, माझी कला ओतली ' असें त्याला म्हणतां येईल का? कामगाराचें जीवन यंत्रामुळें कंटाळवाणे होतें. तुम्ही कामाचे तास कमी कराल व कारखान्यांत जो आनंद मिळत नाही, तो घेण्यासाठी त्याला उरलेला वेळ द्याल. परंतु ग्रामोद्योगांत कामातच आनंद वाटतो. तें काम कंटाळवाणे वाटत नाही. आनंद निराळा शोधावाच लागल नाहीं. समजा मी चरक्यावर सूत कातीत आहे. तें सूत जाड येतें कीं बारीक येतें तें मी पाहतों. त्यांत माझे कौशल्य असतें. तें सुंदर दुधाच्या धारेसारखें सूत निघतांना पाहून मला आनंद होतो. हें माझ्या हातचें सूत असें मी अभिमानानें सांगतो. माझी कला त्या कृतींत असतें. मी तेथें बुध्दि वापरतों. यंत्रानेंच जेथें सारें होते तेथें कलानिर्मितीचा आनंद कोठें आहे? यंत्रनेंच जेथें सारें होते तेथें कलानिर्मितीचा आनंद कोठें आहे? त्यामुळें मग मला आनंद अन्यत्र शोधावा लागतो. पण श्रमच आनंदरूप होणं यांतील गोडी कांही और आहे. आपल्या मागावर लहानशा झोपडींत विणकर मलमल विणतो ! किती हलक्या हातानें तो धोटा फेंकतो, कसा जपतो, कसें बघतो ! त्याचे कलात्मक डोळे, त्याची कलात्मक बोटें, पहा तरीं. तो आपल्या कामांत मग्न असतो. तल्लीन असतो.
ग्रामोद्योगांत, स्वत: निर्माण केलेल्या वस्तूंत, असा हा निर्मितीचा आनंद आहे. हा सात्विक आनंद यंत्रानें नष्ट केला आहे. दुसरी गोष्ट अशी कीं तुम्ही कामाचे तास कमी करणार व त्या वेळांत मनुष्य आपला जीवनाचा विकास करून घेईल, निरनिराळे आनंद, कलात्मक वा बौध्दिक अनुभवील असें म्हणतां. परंतु हे बोलायला ठीक आहे. कारण मनुष्य फुरसतीचा वेळ सार्थकीच लावील याची काय खात्री? मनुष्य प्राणी अद्याप इतका विकसित झालेला नाहीं. पूर्णत्वाच्या गोष्टी आजच बोलण्यांत अर्थ नाहीं. ' रिकामा न्हावी कुडाला तुंबडया लावी. ' ही म्हण खोटी नाही. उद्योगहीन माणसें भांडत बसतात, अध:पतित होतात. '' Satan tends idle hands to do mischief. कर्मशून्य हातांकडून सैतान आपले खेळ करवून घेत असतो ! '' म्हणून मनुष्याला जास्तीत जास्त वेळ, परंतु तो अगदी थकून जाईल इतका वेळ नव्हे, निदान सहा सात तास कामात गुंतवून ठेवणें बरें. त्याच्या आवडीचे उद्योग त्यास द्यावा. म्हणजे त्या कामाचात्याला कंटाळा येणार नाही. आवडींचे काम करण्यांत परमसुख आहे. तें काम करून थकवा वाटत नाहीं. बुध्दि व हृदय यांनाहि त्या हस्तकार्यात वाव असतोच. तुम्ही त्याला निराळा आनंद देऊं म्हणतां, त्याची आमच्य हस्तोद्योगांत जरूरी नाहीं. कारण यंत्राप्रमाणें येथें कंटाळवाणें काम नाहीं.