पत्र पाचवे 1
खरें आस्तिक व्हा !
प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद.
दत्तु नांवाचा एक लहान मुलगा संघ सोडून तुझ्या सेवा दलांत आला हें वाचून आनंद झाला. जातीय संघटनांनी हिंदुस्थानचा नाश चालविला आहे. भारतीय मनाला ही कीड लागत आहे. लाठी फिरवून कवाईत करून संघातील मुलांचीं शरीरें दणकट होतील, परंतु शरीरांतील मनें विषारी होत आहेत. आपल्या संघटनेंतील मुलांच्या कानांवर नवीन विचार ते जाऊं देत नाहींत. बौध्दिक गुलामगिरी निर्मिली जात आहे ! दुनियेंतील सर्व विचारांचा व प्रयोगांचा अभ्यास करून जर कोणी एखादा मार्ग पत्कारला तर ती गोष्ट निराळी, परंतु या जातीय संघटना मुलांची बुध्दिच मारीत आहेत. त्यांच्या आत्म्याचा वध करीत आहेत.
आपल्या हिंदुधर्मांत गायत्री मंत्राला आपण अत्यंत पवित्र मानलें आहे. कां बरें? वेदांत शेकडों मंत्र आहेत. परंतु ह्याच मंत्राला आपण प्राधान्य कां दिलें? कारण या मंत्रात स्वतंत्र विचारांची देणगी मागितली आहे. सूर्याजवळ प्रार्थना केली आहे कीं, '' हे सूर्या, जसा तुझा प्रकाश स्वच्छ आहे, तशी आमची बुध्दि सतेज राहो. आमच्या बुध्दिला चालना दे. '' गायीगुरें, धनसंपत्ति, संतति वगैरेंची मागणी करणारे वेदामध्यें शेंकडों मंत्र आहेत, परंतु बुध्दिची मागणी करणारा मंत्र आपण पवित्र मानला. ती बुध्दिच आज मारली जात आहे. एका ठराविक सांचाचें अहंकारी विषारी खाद्य अशा संघटनांतून दिलें जात आहे. या संघटनाचें पुरस्कर्ते आपापल्या संघटनांभोवतीं भिंती बांधीत आहेत. बाहेरच्या विचारांची त्यांना भीति वाटते. परंतु बाहेरचे विचार आल्याशिवाय राहणार नाहींत. विचारांना कोण अडथळा करणार? हिमालयाचीं उंच शिखरें ओलांडून ते विचार धांवत येतील. सप्तसागर ओलांडून ते विचार येतील. तुमच्या भिंती कोलमडून पडतील. नवविचारांची ज्यांना भीति वाटते, त्यांचें तत्वज्ञान कुचकामी आहे. बायबलमध्यें एक वाक्य आहे, ''तुझें घर खडकावर बांध म्हणजे तें वादळांत पडणार नाहीं, पावसांत वाहून जाणार नाहीं.'' त्याप्रमाणें आपल्या संघटना शास्त्रीय विचारांच्या पायावर उभारल्या पाहिजेत. परंतु शास्त्रीय विचारांची तर या संकुचित मंडळींस भीति वाटते.
वसंता, एखादें लहानसें रोपटें तूं उपटून बघ. त्याचीं मुळें एकाच दिशेला गेलेलीं दिसतील का? नाहीं. झाडांचीं मुळें दशदिशांत जातात. जेथें जेथें ओलावा मिळेल तेथें तेथें जाऊन तो ओलावा घेऊन झाडें उभीं राहतात. त्याप्रमाणें आपलें जीवन हवें. ज्ञानाचा प्रकाश कोठूनहि येवो. त्याचा आपण सत्कार केला पाहिजे. दाही दिशांतून प्रकाश येवो. सर्व खिडक्या मोकळया असूं देत. परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघांत काय चालतें? अन्य मतांचा वाराहि आपल्या संघातील मुलांच्या कानांवर येऊं नयें म्हणून तेथें खटपट केली जाते ! मी मागें संगमनेर येथें गेलो होतों. सायंकाळी माझें व्याख्यान आहे असें जाहीर होतांच संघचालकांनी एकदम आपलीं मुलें कोठेंतरी बाहेर नेण्याचा कार्यक्रम ठरविला. तुला हा अनुभव आहेच. तूंच मागें आपल्या पहिल्या भेटींत म्हणाला होतास. ''आमची कींव करा. आम्हांला दुसरे विचार ऐकूंच देत नाहीत.'' ती सत्य गोष्ट आहे. मला या गोष्टींचें फार वाईट वाटतें.