पत्र चवदावे 3
जीवनांत सुंदरता, मधुरता, समता, आनंद, न्याय इत्यादी आणण्यासाठी कलांनी झटले पाहिजे. मग ती कला कोणतीही असो. कलांनी आतां दिवाणखान्यांत नाही रहातां कामा. गंगेच्या प्रवाहाचा आकाशांतून खाली भूतलावर अवतार झाला म्हणून तिचे महत्व. त्याप्रमाणे साहित्य, संगीत, चित्रकला ह्यांनी बहुजनसमाजाच्या संसारांत अवतरावें. त्या फाटक्यातुटक्या संसारात आनंद आणण्यासाठी झटावे.
वसंता, धान्य दिवणखान्यांत पेरले तर ते उगवते का? धान्य उघड्यावर शेतांत पेरले पाहिजे. तर ते फोफावेल. त्याचा उपयोग होईल. त्याचप्रमाणे कला आता वरिष्ठ वर्गाच्या दिवाणखात्यांत नकोत. कला खाली उतरु देत. कलांचा दरिद्रनारायणासाठी अवतार होऊ दे.
कलेचे काम आनंद देणे, असे सारे कलावान म्हणतात. मीही तेंच म्हणतो. मीही आनंदमीमांसा मानणारा आहे. परंतु आनंद म्हणजे का दु:खाचा क्षणभर विसर पाडणे? अशाने का जीवनांत आनंद येईल? आपली काही साप्ताहिके क्षणभर आठवडयांतून हसवतात. त्यांचे म्हणणे असे की ' कारकून, कामगार, यांना रोज दु:ख व चिंता आहेतच. आठवडयांतून एक दिवस तरी त्यांना हसूं दे. एक दिवस तरी त्यांना दु:खाचा विसर पडूं दे.' असे म्हणणा-यांना माझे म्हणणे आहे की ते जें सहा दिवस दु:ख होते तें कायमचें कसें दूर होईल व ' अवघाचि संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ही लोक ' असं कधी होईल, याचा कां नाहीं तुम्ही विचार करीत? श्रमणा-या लोकांना आठवडयांतून क्षणभर आनंद देऊं पाहतां. तो सदैव कसा मिळेल याचा शोधबोध तुम्ही कां करीत नाही? त्याचा मार्ग त्या दु:खी जनतेंस तुम्ही का दाखवीत नाही? कामगाराला चिंता कां? शेतकरी रडता कां? कारकुनाला रविवारीहि कचेरीचें काम घरी कां आणावें लागतें? त्या दिवशीहि मुलांबाळांजवळ खेळण्याबोलण्याचा आनंद त्याला उपभोंगतां येत नाही. त्याला मुलांवर ओरडावें लागतें. ही अशी भिकार समाजरचना कां? हें जें सभोंवती विराट दु:ख आहे त्याची मीमांसा तुमच्या लेखणीला करुं दे. तुमची प्रभावी लेखणी जनतेला क्रांतीसाठी उठवूं दे. नवीन प्रकाश व नवीन आशा देऊं दे. आठवडयांतून क्षणभर करमणूक केल्यानें कामुक विनोद दिल्यानें, थोडया गुदगुलया केल्यानें संसार सुखाचा थोडाच होणार आहे? या क्षणिक आनंदाच्या मृगजळानें कोणाची तृप्ती होणार?
वसंता, तुला तुरुंगांतील एक अनुभव सांगू?
एके दिवशी एक कैदी माझ्याकडे आला व म्हणाला, '' माझें पत्र लिहून द्या. '' तो कैदी अस्पृश्य होता. तो एक दरिद्री महार होता. त्यानें काय बरें लिहायला सांगितले? त्याच्या घरीं काय परिस्थिती होती? त्याची पत्नी घरीं होती. त्याला दोनचार मुलेंबाळें होती. मोठा मुलगा चौदा-पंधरा वर्षाचा हाता. दुसरा एक दहाबारा वर्षांचा होता. परंतु हा मोठा मुलगा आईला मारी. आई त्याला कोठें तरी मजुरी करण्यासाठीं जा म्हणे. परंतु रोज रोज कामाला जाऊन तरी मुलगा कंटाळे. एखादे दिवशीं आईला अंगावर धांवून जाई व म्हणे '' नाहीं जात कामावर. '' परंतु मुले मजुरी करणार नाहींत तर घरीं खायचें काय? ती माता सर्वांचें पोषण कसें करणार? त्या मुलांनीं नको का जायला काम करायला? परंतु तीं मुलें आहेत दहाबारा वर्षांची. त्यांना नाचावें, कुदावें असें वाटतें, हिंडावें असें वाटतें. सृष्टीतील आनंद लुटावा असें त्यांना वाटतें. परंतु घरी दारिद्र्य आहे. त्यांना कोठला आनंद? तो महार पुढील मजकूर सांगत होता ---