पत्र पहिले 2
वसंता, मी देवाची एकच प्रार्थना करीत असतों कीं ' या देंशांतील तरुणांस सदबुध्दि दे. अखंड भारताचे सारे सच्चे उपासक होवोत. हिंदु-मुसलमान एक होवोत. क्षुद्र भेद नष्ट होवोत. तरुण लोक अनुदार व संकुचित वृत्तीचे न होवोत. माझ्या काँग्रेसला यश येवो. कारण ती सर्वांचे कल्याण करू पहात आहे. तिच्या झेंडयाखालीं नवभारत उभा राहूं दे आणि जगाचे डोळे दिपूं देत.'
तूं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सोडलास एवढयानें तुझें कर्तव्य पुरें झालें असें नाही. आपण वाईटाचा त्याग केलाच पाहिजे. परंतु त्याचबरोबर सत्कर्माचाहि आरंभ केला पाहिजे. तूं संघ सोडलास. ठीक. परंतु एवढयानें भागणार नाहीं. पूर्वीं तूं ज्या तळमळीनें संघाची सेवा करीत होतास, त्याच तळमळीनें तूं आतां काँग्रेसची सेवा कर. तूं म्हणशील मी कोणती सेवा करुं? सेवा अनेक प्रकारची पडली आहे. महात्माजींनी सेवेची अनेक क्षेत्रें उघडी केलीं आहेत. त्या महापुरुषानें जीवनाच्या सर्व क्षेत्रांत प्रकाश पाडला आहे. ख्रिस्त एकदां लोकांना म्हणाला, ' अरे इकडे या. कोळी जाळें टाकतो व मासे पकडतो. परंतु मी माणसें पकडतो. माणसें कशी पकडावीं तें मी दाखवतो. या इकडे. 'महात्माजी जणूं तसें सांगत आहेत. त्या महापुरुषाच्या प्रतिमेला अंत नाहीं. नवीन नवीन कामें, नवीन नवीन उद्योग ते दाखवीतच आहे. हें काम नसेल आवडत तर तें घ्या असें ते सांगत आहेत. खादीचें काम घ्या; हरिजनसेवा करा; साक्षरता-प्रसार हाती घ्या; स्वच्छतेचे धडे दया; राष्ट्रभाषा सर्वंत्र न्या; हिंदुमुस्लीम-ऐक्याचे पुरस्कर्ते बना; दारु बंदी करा; ग्रामोद्योग उचला; मधुसंवर्धन विद्या शिका; वर्धा शिक्षण पध्दतीचे प्रयोग करा; शेतक-यांची-कामगारांची काँग्रेसला अविरोधी अशी संघटना करा. एक का दोन, अनेक कामें आहेत.
परंतु वसंता, यांतील एखादें काम घेऊन तूं बसावेंस असें सध्यां मला वाटत नाहीं. महात्माजींनी सेवेचीं अनेक क्षेत्रें दाखविलीं आहेत. परंतु सेवकांची उणीव आहे. आपापल्या आवडीचीं सेवेचीं कामें उचलतील असे हजारों तरुण दृष्टीस पडत नाहींत. सेवकांचा पुरवठा कसा होईल हा माझ्यासमोर प्रश्र आहे. आज कांही कष्टाळू थोर सेवक ठायी ठायीं ही सेवेचीं कामें करीत आहेत. सेवेचे स्थिर असे नंदादीप ठायीं ठायीं हीं लावीत आहेत. ती महत्त्वाची गोष्ट आहे यांत शंका नाहीं. जनतेंत सेवेच्या द्वाराच सर्वांनीं गेलें पाहिजे. समज, एखाद्या जिल्हयांत दहा कार्यकर्ते दहा ठिकाणीं कोणती तरी एक सेवा हाती घेऊन तेथें पाय रोंवून उभे आहेत. याचा काय परिणाम होईल? मी एका खेडेगांवांत एक काम घेऊन बसलों आहें. रोज लोकांशीं संबंध येत आहे. मी त्यांच्यांत उठत आहें, बसत आहें. आजारीपणांत सेवा करीत आहें. मुलांना शिकतीत आहें. अन्यायाची दाद लावीत आहें. तर हळू-हळू माझ्याभोंवती पांचपन्नास माणसें निष्ठेचीं जमा होतील. त्यांचे माझे निकट संबंध येतील. एक भ्रातृमंडळ जणूं निर्माण होईल. आणि उद्यां चळवळ झाली तर माझ्या पाठोपाठ ही सारी मंडळी येईल. मी म्हणजे पन्नास माणसें असे दहावीस कार्यंकर्ते जिल्हयांत असतील तर त्यांच्यापाठीमागें हजार सेवक, हजार सैनिक उद्यां येतील. महाराष्ट्रांत असे शंभर कार्यकर्ते जर स्थिरतेनें कार्य करतील तर दहा हजारांची सत्याग्रही सेना ते उभी करतील. अर्थात, हे शंभर सेवक निष्ठेने निरहंकारपणे सेवा करीत राहिले तर.