पत्र सातवे 5
परंतु काँग्रेसनें स्पेनमधील शेतक-या-कामक-यांस गलबतभर धान्य पाठविले. कांही कपडे पाठविले. जवाहरलाल स्पेनमधील बॉबवर्षाव स्वत: पाहून आले होते. तेथील गरिबांचा जय व्हाव असें त्यांना वाटत होते. दुसरी मदत करतां येत नव्हती. परंतु काँग्रेसनें आपण कोणत्या बाजूचे आहों हें जगाला कळविले.
ईजिप्त, तुर्कस्थान, वगैरे मुसलमानी राष्ट्रांस उद्यांच्या स्वतंत्र होणा-या हिंदुस्थानचा सहकार मिळेल. कारण हीं मुसलमानीं राष्ट्रे साम्राज्यवादी नाहीत. आमच्यांतील कांही संकुचित दृष्टीच्या लोकांना वाटत असतें कीं सारी मुस्लीम राष्ट्रें एक होतील व हिंदुस्थानवर येतील ! हा त्यांचा भ्रम आहे. जें तें राष्ट्र स्वत:पुरते पाहते. केमालपाशाला हिंदुस्थानांतील एक धर्मवेडा मुसलमान जाऊन म्हणाला, '' जमाना बदल गया है बेटा ! मला आज कोण मानील? ईजिप्तमधले लोक म्हणतील 'ईजिप्त ईजिप्शियन लोकांचा.' इराणांतील लोक म्हणतील, 'इराण इराण्यांचा.' अफगाण म्हणतील, 'अफगणिस्थान अफगाणांचे.' खलीफा होऊन हंसें करुन घेण्याइतका मी वेडा नाहीं. मला माझ्या तुर्कस्थानचें कल्याण पाहूं दें. ''
खेदाची गोष्ट ही कीं आमच्यांतील कांही धर्मवाल्या लोकांची दृष्टि अद्याप प्राचीन काळांतच ०आहे. अद्याप मुसलमानांच्या स्वा-यांचीच त्यांना भीति वाटत असते. अद्याप पंधराव्या, सोळाव्या, सतराव्या शतकांतील राजकारणाहून पलीकडे त्यांची दृष्टि गेली नाहीं. हिंदुस्थानांतील मुसलमान मनांत काय मांडे खात असतील ते खावोत, परंतु हिंदुस्थानाबाहेरचे मुसलमान हिंदी मुसलमानांची कींवच करतात ! काँग्रेसच्या अधिवेशनास इजिप्तमधील प्रतिनिधी हजर राहतात. पॅलेस्टाइनमधील अरब जवाहरलालना बोलावतात. एवढेंच नव्हे तर क्केटा-बलुचिस्थानमधील मुस्लीमबंधु खानसाहेब व जवाहरलाल यांनाच आमंत्रणें देतात. जगांतील स्वातंत्र्यप्रेमी मुस्लीम जनता स्वातंत्र्यार्थ झगडणा-या काँग्रेसची किंमत जाणते.
सर सिकंदर हयादखान पंजाबमध्यें म्हणाले, '' काँग्रेस या युध्दांत सहकार करीत नाही. मुस्लीम राष्ट्रांच्या दाराशीं संकट आलें तरी काँग्रेस सत्याग्रहाची भाषा बोलतें. मुसलमान राष्ट्रांबद्दल काँग्रेसला कोठें आहे सहानुभूती? '' शिकंदर हयातखान हिंदुस्थानांत असा विषारी प्रचार करुं शकतील. परंतु मुस्लिम राष्ट्रातून जाऊन जर काँग्रेसवर ते असे आरोप करतील तर कोणतें बक्षीस त्यांना मिळेल बरें? स्वातंत्र्य-प्रेमी व स्वातंत्र्यार्थ झगडणा-यांची किंमत जाणतो. स्वार्थासाठी ब्रिटिशांचे जूं हिंदुस्थानावर कायम राखूं पहाणा-यांस कोणतें स्वातंत्र्य प्रेम? ''
वसंता, महात्मा गांधी सर्वांनी जगावें असें म्हणत आहेत. एकदां एका जमीनदारानें त्यांना विचारलें '' जमीनदार सारे नष्ट व्हावे असें काँग्रेसचें म्हणणे आहे काय? '' महात्माजी म्हणाले, '' तुम्ही सर्वांनी जगावें असें मला वाटतें. जमीनदार, जहागिरदार, संस्थानिक सारे रहा. परंतु गरींबांचे विश्वस्त म्हणून रहा. तुमच्या जवळची धनदौलत गरीबांची ठेव समजा. ती त्यांच्या हितासाठीं खर्चा. त्यांतून स्वत:ची चैन करूं नका. तुम्ही जगावें असें मला वाटतें. परंतु माझ्या इच्छेनें काय होणार? तुमचें जगणें व मरणें तुमच्या कृतीवर अवलंबून आहे ! '' अर्थपूर्ण शब्द.भांडवलवाले, संस्थानिक, जमीनदार, काँग्रेसच्या लहान सहान सुधारणांनाही जर विरोध करतील तर ते पुढें कसे जगतील?