पत्र दहावे 5
अशुतोषजींचे हे उद्गार आपण लक्षांत ठेवूं या. कलकत्ता विद्यापीठांत एम. ए. च्या परीक्षेस भाषाविषय घ्यायचा असेल तर बंगालच्या बाहेरचीहि कोणती तरी एक भाषा आवश्यक आहे ! या मोठया देशांत राहणा-यांवर फार मोठी जबाबदारी आहे. परंतु आपणाला सारी थट्टाच वाटत आहे. देशाचा विचार दूर ठेवून केवळ फाजील अभिमानाचे पूजक होऊन आपण बसलों आहोंत. जर दु:खीकष्टी बहुजनसमाज आपल्या डोळयांसमोर येईल तर आपण हे क्षुद्र वाद माजवीत बसणार नाहीं.
महाराष्ट्रांतील पूर्वीच्या साधुसंतांनीं हिंदुस्थानींत रचना केली आहे. तुकाराम महाराजांचे हिंदी अभंग आहेत. रामदास स्वामींनीं हिंदीत काव्यरचना केली आहे. साधुसंतांसमोर सर्व भरतखंड असे. ते पायीं दूरवर प्रवास करीत. उत्तरेकडचे रामानंद वगैरे दक्षिणेकडे येत तर दक्षिणचे साधु उत्तरेकडे जात. नामदेवांचे अभंग शिखांच्या धर्मग्रंथांत जाऊन बसले. कबीराचे दोहरे, मीराबाईंचीं गाणीं, गोपीचंदाची गाणीं हिदुस्थानभर बिनपंख उडत गेलीं ! साधुसंत वादविवाद करीत बसले नाहींत. श्रीशिवाजी महाराजांनीं मराठींत शिरलेल्या उर्दू शब्दांबद्दल संस्कृत शब्द तयार करण्यासाठी कोशकारांस सांगितले. रघुनाथपंत आमात्यांनीं तसाकोश बनविलाहि, परंतु शिवाजी महाराजांनीं स्वराज्य मिळविल्यावर तो उद्योग आरंभला. आणि तो प्रांतिक भाषेपुरता होता. आजचा काळ निराळा. मुसलमान आतां येथले झाले. शेजारीं शेंकडो वर्षे राहिले. आतां मुद्दाम खोडसाळपणा करणें म्हणजे देशद्रोह आहे.
मागें मला एक गोष्ट कळली होती. सातारची वेस्टर्न इंडिया लाईफ इन्शुअरन्स कंपनी आहे ना, तिच्यांत एक कारकून होते. त्यांना मुसलमानांची फार चीड. ते शहरांचीं नांवेंच बदलूं लागले. सातारा जिल्हयातील इस्लामपूर शब्द त्यांना सहन होईना ! त्यांनीं तें नांव बदलून ' ईश्वरपूर ' असें नांव आपल्या मनांत ठेवलें. अहमदनगरचें असेंच कांही दुसरें नांव त्यांनी केलें. आणि गंमत ही कीं, पुढें पत्यावरहि त्यांनी ईश्वरपूर वगैरे ती नवीन नांवें लिहिली ! ती पत्रे परत आली !! व्यवस्थापकांच्या टेबलावर ती परत आलेली पत्रें पडली. व्यवस्थापकाने तें सारे पाहिलें. त्यानें त्या कारकुनांस बोलावलें व विचारलें. ते कारकून म्हणाले, '' माझ्यानें इस्लामपूर शब्द लिहवेना, मी काय करूं? '' मॅनेजर म्हणाले, '' ही ध्येयवाद ठीक आहे. परंतु अशानें कंपनी चालणार नाहीं. तुम्ही ध्येयवाद जरा गुंडाळून ठेवून शहराची नांवे सध्यां आहेत तशींच ठेवा ! ''
इतका हा मुस्लिमद्वेष करून आम्ही काय मिळविणार? मुसलमानांच्या श्वासोच्छ्वासाची हवा पृथ्वीवरील हवेंत मिसळते. यासाठी अशा द्वेषी लोकांनी पृथ्वी सोडून दुसरीकडे वस्ती केली तर बरें ! नाही तर मुसलमानांचे तरी पृथ्वीकरुन उच्चाटन करायला हवें. परंतु तें कसे होणार. द्वेषाने मनुष्य किती अंध होतो ते यावरुन दिसेल. आणि ईश्वरपूर तरी नांव का ठेवायचे? दुसरें एखादें द्राविडी नांव शोधूं या कीं, कारण आपणहि या देशांत बाहेरूनच आलों आहोंत !
अशा या बिकट परिस्थितींतून आपणांस जावयाचें आहे. या देशाच्या मंगल भवितव्यावर श्रध्दा ठेवणा-यांची आज कसोटी आहे. मुस्लीम लीग, हिंदुमहासभा व इतर अनेक पक्षोपपक्ष यांच्या चिखलांतुन राष्ट्राचा गाडा काँग्रेसला ओढावयाचा आहे. वाद करणारे वाद घालोत. संस्कृतप्रचुर हिंदी हवी की उर्दूप्रचुर हवी - करा लठ्ठालठ्ठी ! आपण नीट अभ्यास करूं या. आपण बहुजनसमाजाचे उपासक होऊं या.