पत्र दहावे 3
बहुजन बोलतात ती भाषा का कम-दर्जाची? आमच्या मराठी नाटकांतून पूर्वी जरी विनोद करायला झाला तरी एखादें खेडवळ पात्र आणून '' व्हय, असं म्हनतुस व्हय ! '' वगैरे त्याच्या तोंडी घालून हंशा पिकवण्यांत येत असे ! ज्याच्या श्रमावर आपण जगतों त्याच्या बोलण्याचें हंसें करणारे आम्ही पांढरपेशे केवळ पापात्मे आहोंत !
हिंदी ही सबकी बोली होऊं दे. त्यांनें का पूर्वींचे साहित्य नष्ट होणार आहे? पूर्वीचे राहील आणि नवीन बहुजनसमाजाच्या हाती जाईल. आपलें वाङमय जास्तींत जास्त लोकांच्या हाती जावे असें ख-या साहित्यसेवकास वाटत असतें. बहुजनसमाजास समजेल असें हिंदींचे स्वरूप करा, असें गांधीजी व खरे काँग्रेसवादी म्हणतात, परंतु बहुजनसमाजास कचरा मानणा-या लोकांना तें कसें पटावें? आमच्या या दुदैवी देशांत राष्ट्राचीं छकलें सांधण्यासाठी कोणतीहि गोष्ट निघाली कीं, तेथें अहंकारी लोक येऊन मोडता घालतात ! सर्वांना समजणारी अशी जी भाषा होईल ती हिंदु-मुसलमान सर्वांसच समजेल. परंतु मुसलमान म्हणुं लागले हिंदी अशी असावी कीं, जिच्यांत उर्दू शब्द पुष्कळ असतील. आमच्यांतील कांही हिंदु म्हणूं लागले कीं, संस्कृतोभ्दव शब्दच तिच्यांत अधिक असावेत. काँग्रेसचे म्हणणें असें कीं, ती हिंदु मुसलमान दोघांसहि समजेल अशा स्वरूपाची असावी.
लिपी उर्दू लिहा वा नागरी लिहा, परंतु भाषा अशी वापरा की, जी सर्वांना समजेल. परंतु मुसलमानांतील आग्रही लोक हिंदूंना न समजणारे बोलणार व हिंदूतील आग्रही मुसलमानांस न समजणारें बोलणार ! परंतु परिणाम येथेंच थांबत नाहीं. हिंदूना न समजणारें असे उच्च उर्दू मुसलमान वत्त्के बोलूं लागले कीं, तें बहुजन मुसलमानांसहि समजत नाही. आणि मुसलमानांस न समजणारें संस्कृतप्रचुर हिंदी हिंदु बोलतील तर तें हिंदूसहि समजणार नाही. हिंदू व मुसलमान यांचा जो संमिश्र बहुजन समाज आहे तो अशी भाषा बोलतो कीं, जी दोघांसहि समजते. परंतु आमचे प्रतिष्ठित वर्ग उभयविध बहुजनसमाजापासून दूर राहूं इच्छितात. भाषा ही आपलें हृदगत दुस-याला कळविण्यासाठी आहे, परंतु ही साधी गोष्टहि अभिमानानें अंध झालेल्यांच्या लक्षांत येत नाही.
राष्ट्रध्यक्ष अबुल कलम आझाद पूर्वी उच्च उर्दू बोलत. परंतु बहुजन समाजाचा विचार त्यांच्या लक्षांत येतांच ते लोकांस समजेल असें बोलण्याची खटपट करूं लागले. आचार्य नरेंद्र देव पूर्वी संस्कृतप्रचुर हिंदी बोलत, परंतु आतां त्यांची हिंदी बहुजनसमाजाची होऊ लागली आहे. बहुजन समाजाचा विचार करील त्याला हें धोरण स्वीकारावें लागेल. स्वराज्य हें बहुजनसमाजासाठी आहे, पलंगपंडितांसाठी, प्रतिष्ठित पंडितांसाठी केवळ नाही.
ईश्वराने हास्याची व अश्रूंची अशी विश्वव्यापक भाषा निर्मिली. अश्रु हें संस्कृत नाहीत, उर्दू नाहीत, अमुक मनुष्य संस्कृतमध्यें रडला, इंग्रजीत रडला, असें आपण म्हणत नाहीं ! अमुक मनुष्य मराठींत हंसला, अमुक कानडींत हंसला असें होत नाहीं ! मनुष्याचे अश्रु सर्वांना समजतात. त्यांचे स्मित सर्वांना समजतें. मनुष्य रडत आहे त्या अर्थी तो दु:खी आहे. मनुष्य हंसतमुख आहे त्या अर्थी तो समाधानी आहे, असें आपण जाणतो. देवानें सर्वांसाठी दिलें, परंतु माणसाने ह्यांत भेद पाडले, भांडणे निर्मिली !