पत्र दुसरे 4
गांधीजींनी साधेपणा पुढा-यास शिकविला. आब्बास तय्यबजी हे थोर पुरुष एकदां म्हणाले, '' पूर्वी मी खेडेगांवांत गेलों तर लोक माझ्यापासून दूर रहात. परंतु आता साधा खादीचा पोषाख घालून जाऊं लागलों. लोक माझ्याजवळ येऊं लागले. मी त्यांच्यांतीलच एक असें त्यांना वाटूं लागलें. ते आपली सुख:दुखें सांगूं लागले. गांधीजींनीं आम्हांला आमच्या कोटयावधि बंधूंची भेट करुन दिली. त्यांचे हे उपकार. ''
वसंता, तुला बंगालमधील उल्हासकर दत्त कदाचित् ऐकून माहीत असेल. त्यानें स्वत:च्या स्मृति लिहिल्या आहेत. उल्हासकर मोठे क्रांन्तिकारक होते. ते कोमिल्लाचे राहणारे. १९०७-०८ सालांतील दहशतवादी चळवळीत ते होते. ते अंदमांनांतून सुटून आले. ते सुंदर लिहितात. महात्माजींवर असहकाराच्या चळवळींत जो खटला भरण्यांत आला व ज्यांत त्यांना सहा वर्षांची सजा झाली. त्यासंबंधींची एक स्मृति उल्हासकरांनीं एकदा दिली होती. महात्माजींनीं त्या खटल्यांत ''मी एक शेतकरी आहें. माझा विणकामाचा धंदा आहे. '' असें सांगितले होतें. महात्माजींच्या खटल्याची हकीगत वर्तमानपत्रांतून येत होती. उल्हासकरांच्या तेथला एक गरीब मुसलमान नोकर वर्तमानपत्र वाचून रडत होता. '' कायरे, काय झालें? '' असें त्यांनी विचारलें. तो म्हणाला, '' महात्मा गांधींना सहा वर्षांची सजा झाली. वाईट वाटतें, '' '' तुला कां वाईट वाटते? '' त्यांनी विचारलें. '' कां म्हणजे? अहो ते आमच्यांतलेच एक आहेत. आमची स्थिती सुधारावी म्हणून झगडत आहेत. ते एक शेतकरी व विणकर आहेत. '' असें म्हणून त्यानें डोळे पुसले. ही आठवण लिहून उल्हासकर लिहितात, '' या अहिंसक महात्म्यानें अशी क्रांति केली आहे तशी कोणी केली आहे? जनतेशी असा एकरूप झालेला दुसरा कोण आहे.? महात्माजी क्रांतिकारकांचे मुकुटमणी आहेत. त्यांना अनंत प्रणाम. ''
आपल्या ह्या महाराष्ट्रांत असे कांही पंडित आहेत कीं ते अद्यापहि गांधीजींना व काँग्रेसला शिव्या देतात. महात्माजींनी एक कोट टिळक फंड जमविला, परंतु त्या फंडाने टिळकांचे राजकारण मारलें, असें कांही करंटे महाराष्ट्रीय मुत्सदी म्हणत असतात. यांना मुत्सदी म्हणावें की महामूर्ख म्हणावें तेंच समजत नाही ! '' मला एक हजार लोक द्या, मी बंड करतों. '' असें म्हणणारे ते लोकमान्य ! '' डोकीं तापायलाच हवींत. डोकीं थंड ठेवण्याची ही वेळ नव्हे. '' असें म्हणणारे ते लोकमान्य ! '' येथल्या मुसलमानांच्या हातीं सारी सत्ता गेली तरी चालेल. परंतु सहा हजार मैलांवरचे हे परके आधीं जाऊं देत, '' असें तळमळीने म्हणणारे ते लोकमान्य ! त्यांचें राजकारण या दळभद्रयांना समजतें तरी कीं नाहीं देव जाणे. त्या एक कोटि फंडातील पुष्कळशी रक्कम निरनिराळया कार्यार्थच देणा-यांनी दिली होती. कोणी गुजरात विद्यापीठासाठी म्हणून १० लाख दिले. ते त्या कामांत गेले. खादीच्या कामांत २५ लाख घातले गेले. देशभर ज्या राष्ट्रीय शाळा, महाशाळा सुरू झाल्या त्यांना त्या फंडांतून मदत दिली गेली. कोणी स्वदेशी स्टोअर काढलें, त्यांना मदत दिली गेली. या एक कोटि फंडापैकीं कांही रक्कम आलीच नाहीं. कारण दिलेलीं अभिवचनें पुरी केलीं नाहींत ! असा हा एक कोटीचा इतिहास आहे. तरी बेटे पदोपदी म्हणत असतात कीं टिळकांच्या नांवाने फंड काढून टिळकांचें राजकारण यांनी मारलें. टिळकांचे राजकारण म्हणजे तेल्यातांबोळयांचे राजकारण, दरिद्रनारायणाचें राजकारण. या दरिद्री जनतेंत ज्यांनी प्राण ओतला, या दरिद्री जनतेला ज्यानें झुंजार बनविलें, त्यानें का टिळकांचें राजकारण मारलें? मागील महायुध्दाच्या वेळचे लोकमान्यांचे लेख वाचा आणि आजचे महात्माजींचे लेख वाचा. जणुं लोकमान्यच लिहीत आहेत असें वाटतें. इतकें भाषेंत व विचारांत साम्य आहें. महात्माजींनीं केलेल्या प्रचंड चळवळी पाहून लोकमान्य वरुन आनंदाश्रु ढाळीत असतील.