धडपडणारी मुले 164
“थट्टा कोठे करावी हेंही तुम्हाला समजत नाही. दगडाची आहेत तुमची हृद्ये,” वेणू म्हणाली.
“मग ती दगडाची हृद्ये का तुला हवी आहेत ?” रघुनाथने विचारले.
“हो. त्या दगडांना ऊब देऊन फुलविण्यासाठी. खूप ऊन पडले की, दगडांच्यासुद्धा लाह्या होतात !” वेणू म्हणाली.
“कविच झालीस तू,” रघुनाथ म्हणाला.
“चल आता रघुनाथ,” नामदेव म्हणाला.
“भाकर आई भाजते आहे ती खाऊन जा,” वेणू म्हणाली.
“स्वामींनाही बोलावतो,” रघुनाथ म्हणाला.
“ते उजाडत खात नाहीत,” नामदेव म्हाणाला.
दोघे मित्र भाकरी खावयास बसले.
“वेणू आमच्या बरोबर तूहि खा,” रघुनाथ म्हणाला.
“मला कोठे जायचे आहे घरातला कोपरा हे माझे जग. वेणूला दुसरे काय आहे ? कोप-यात बसावे, मुखाने गावे, हाताने कांतावे आणि प्रेमाने तुम्हाला द्यावे. कधी एखादा अश्रू ढाळावा,” वेणू म्हणाली.
“तुला आमच्या बरोबर यायचे आहे ? तू कोठे येणार ?” रघुनाथने विचारले.
‘मला कोण नेणार ? कोणी नाही. आंधळ्याला फक्त भगवान. दुसरे कोणी नाही,” वेणू म्हणाली.
“पुरे भाकरी,” नामदेव म्हणाला.
“एवढ्यात पोट भरले,” वेणूच्या आईने विचारले.
“वेणूचे शब्द ऐकून पोट भरले,” नामदेव म्हणाला.
“वेणूचे शब्द ऐकून हृद्य नाही ना भरत?” वेणूने विचारले.