धडपडणारी मुले 20
स्वामीजी उभे राहिले. त्यांचें मन भरून आलें होतें. ते म्हणाले, “मला जगात एकच बंधन तोडता येत नाहीं व ते म्हणजे मुलांचें. मी इतर सर्वांच्या इच्छा धुडकावून लावतों, परंतु मुलांची इच्छा मी भंगूं शकत नाही. आज गोपाळरावांबरोबर दोन ही मुलें न येतीं तर मी येथे आलों असतों कीं नाही याची मला शंका वाटते. मुलांनी मला येथे खेंचून आणलें आहे. उंच पर्वत इकडे तिकडे भटकणा-या मेघांना ओढून घेतात, प्रचंड जंगले मेघांना ओढून घेतात. त्याप्रमाणे इतस्तत: भटकणा-या मला, तुमच्या प्रमेळ व थोर हृदयांनी ओढून घेतलें आहे. तुमच्यांत राहावयास मी उत्सुक आहे. आपला हा सहवास एकमेकांस उत्साप्रद, बलप्रद व स्फूर्तिप्रद होवो. आजपासून मी मुलांचा होत आहे. मुलें म्हणजे माझे देव,” असे म्हणून स्वामी खाली बसले.
गोपाळराव स्वामींना म्हणाले, “ एखादी प्रार्थना म्हणा. नवीन संसाराला प्रार्थनेंनें आरंभ होऊ दे.”
“संन्याशाचा संसार,” स्वामी म्हणाले.
मुले हंसली.
“ एखादा अभंग म्हणा,” गोपाळराव म्हणाले.
“ काहींहि म्हणा,” मुले म्हणाली.
“ देवांची आज्ञा झाली. आतां म्हणतो,” असें म्हणून स्वामी गुणगुणू लागले. पद सुरु झालें. भावनामय गाणें सुरु झाले. स्वामींचा गोड व मीठा आवाज त्या प्रार्थनामंदिरांत भरून राहिला.
मुलें म्हणजे देव
मुलें म्हणजे देव
मुलें म्हणजे राष्ट्राची मोलाची ही ठेव || मुलें.||
त्यांना देई सारे कांही
त्यांनी चिंता सदा वाही
त्यांना आधी पोटभर मागून तूं रे जेव || मुलें.||
हंसव त्यांना खेळव त्यांना
फुलव त्यांना खुलव त्यांना
आनंदाच्या विकासाच्या वातावरणी ठेव ||मुलें.||
भविष्याचे कोमळ मोड
भविष्याच्या कळ्या गोड
भविष्याचे विधाते हे भक्तिभावे सेव ||मुलें.||
गाणें म्हणून स्वामी एकदम निघून गेले. गोपाळरावहि न बोलता उठले. मुलेंहि शांतपणे क्षणभर बसली व मग उठली. ‘मुलें म्हणजे देव, मुलें म्हणजे देव’ हेंच चरण वातावरणांत भरुन राहिले.