धडपडणारी मुले 6
एक मुसलमान म्हणाला, “कुराण आम्हांला मान्य आहे. तें एक आम्ही ओळखतो.”
स्वामींनी त्याला विचारलें, “कुराण या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहीत आहे?”
तो म्हणाला, “नाही”
स्वामी म्हणाले, “कुराण म्हणजे हृदय पिळवटून निघालेला उद्गार ! जो जो हृदय पिळवटून उद्गार निघाला असेल त्याला वैद्य मानिले पाहिजे. असे करणें म्हणजेच कुराण मानणें होय. रामकृष्ण परमहंस, ‘देवा केव्हा रे भेटशील.’ असें रडत म्हणत. तुकाराम म्हाराज ‘भूक लागली नयना’ असे म्हणत ते उद्गार म्हणजे कुराणच आहे. हे विशाल कुराण पाहा.’
एक हिदु गृहस्थ म्हणाले, “आमची महाराष्ट्राची परंपरा निराळी आहे. श्रीशिवछत्रपति व समर्थ यांची शिकवण म्हणजे आमचा वेद.”
स्वामी म्हणाले, “ त्यांची शिकवण व माझी शिकवण यांत फरक नाही. शिवाजी महाराज मुसलमान तेवढा कापावा असे नव्हते म्हणत, त्यांच्या आरमारावर मुसलमान अधिकारी होते. मुसलमान भगिनींस त्यांनी किती थोरपणानें वागविले. ते अन्यायाने शत्रु होते. धर्माचे नव्हते. त्यांनी चंद्रराव मोरेहि मारले व अफझुलखानहि मारला. अन्याय करणारा स्वकीय वा परकीय ही भाषा त्यांच्याजवळ नव्हती. समर्थांच्या शिकवणीचीहि आपण वाढ केली पाहिजे. ‘मराठा तितुका मेळावावा’ हा समर्थांचा संदेश. मराठा म्हणजे का मराठा? मराठा म्हणजे महाराष्ट्रांतील ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र सारे. पेशव्यांच्या काळांत ‘मराठा तितुका मेळवावा’ हा संदेश अपुरा पडला. त्यावेळेस जाट, रजपूत वगैरे लोकांशीं मराठ्यांचा संबंध आला. ‘हिंदू तितुका मेळवावा’ असा संदेश देणारा समर्थ त्या वेळेस पाहिजे होता, परंतु तो न मिळाल्यामुळे मराठे घसरले व सर्वांचे शत्रु झाले. आजच्या काळांत ‘हिंदू तितुका मेळवावा’ हा मंत्रहि अपुरा ठरेल. ‘आज हिंदी तितुका मेळवावा’ असा मंत्र सांगणारा पाहिजे आहे. नामदार गोखले, महात्मा गांधी हा युगमंत्र देत आहेत. मंत्रांतील अर्थ वाढत जात असतो. समर्थांनी सांगितले आहे,
‘घालून अकलेचा पवाड | व्हावें ब्रह्मांडाहुनी जाड
तेथे कचें आणिलें द्वाड | करंटेपण ||
आपापली बुद्धि विशाल करून सर्व ब्रह्मांडाला मिठी मारावी. असें करण्याऐवजीं आपापली शुद्र घरें बांधून अभागी कां होता? लहान लहान जथे निर्माण करून तेवढ्यांतच भिका-यासारखे कां राहाता? विश्वाचा वारसदार तूं आहेस. संकुचित कुंपणें घालीत नको बसूं. हें ध्येय कधीहि दृष्टीआड आपण करतां कामा नये. हा भारताचा तर मोठेपणा आहे. तोच जर आपण गमावून बसलों तर काय शिल्लक राहिलें ?”
हळूहळू लोक जाऊ लागले. स्वामीहि निघाले, कोठे जाणार ते? त्यांची कोणी चौकशीहि केली नाही. ते कुठे उतरले, कुठे जेवले – कोणीं विचारलं नाही. स्वामींना त्याची चिंता नव्हतीच. ते गांवांतून हिंडत बोरी नदीच्या तीरावर पुन्हा आले. जेथे संत सखाराम महाराजांची समाधि आहे. तेथें ते आले. बोरीचा प्रवाह शांतपणे वाहात होता. ही समाधि कोणाची वगैरे स्वामीनीं आसपासच्या मुलांजवळ चौकशी केली. देवदर्शनास लोक येत जात होते.
स्वामीजी समाधीजवळ बसून राहिले. त्यांना वाईट वाटत होतें. संशयाची पिशच्चे सर्वांच्या मानगुटीस बसलेलीं पाहून त्यांना खेद झाला. महाराष्ट्रांतून विशाल दृष्टी विलुप्तच झाली का ? उंच उंच गगनचूंबी पर्वत ज्या महाराष्ट्रांत ठायी ठायीं उभे आहेत, त्या महाराष्ट्रांतील जनतेचीं मनें उंच कां नसावींत ? युगधर्म नाहीं कां कोणी ओळखणार ? भारतवर्षांचें महान् ध्येय – त्या ध्येयाभोंवती यावें, त्या ध्येयार्थ झिजावें, मरावें असे कां बरें कोणास वाटत नाही?