धडपडणारी मुले 34
श्रीमंतांची मुलें अस्पुश्यच असतात! कोणत्या थोर भावनांचा त्यांना स्पर्श होत असतो ? दोनचार लांगूलचालन करणा-या ‘होयबा’ व ‘जी सरकार’ करणा-या माणसांशिवाय कोठें आहेत त्यांचे मित्र? कृत्रिमता व खोटी आढ्यता यांशिवाय त्यांच्या जीवनांत काय असते? समुद्रात असून ते कोरडे असतात, जिवंत असूनहि ते मेलेले असतात. सभोंवती अनंत जीवनांचा, प्रचंड भावनांचा समुद्र उचंबळत असूनहि त्यांची हृदये शुष्क व नीरस राहातात! जगापासून दूर राखणारी, लाखो स्त्रीपुरुष कामकरी मजूर यांपासून दूर ठेवणारी, सामान्य जनतेपासून दूर राखणारी, पशुपक्षी फुलेंमुलें तारेवारे ऊनपाऊस सर्वांपासून दूर ठेवणारी, अनंतरुपानें पसरलेला हा तो विराट विश्वभर त्याच्या दिव्य स्पर्शापासून दूर ठेवणारी – अशी ही श्रीमंती! तिच्यापेक्षां नरकवास वरा!
विचारा यशवंत ! घरी पिंज-यांत पाळलेल्या पोपटापेक्षा दुस-या पक्ष्यांची त्याला माहिती नव्हती. तो स्वत:च श्रीमंतीच्या पिज-यांतील एक पक्षी झाला होता. पिंज-यांतील ‘पोपटाला पेरू मिळेल, डाळिंब मिळेल; परंतु बाहेरच्या सृष्टीचा त्याला जीवनदायी स्पर्श नाही. बाहेरचा पोपट हिरव्या गर्द झाडावर बसून वा-याबरोबर झोके घेतो. निळ्या आकाशात हिंडतो, रानचे विविध मेवे खातो. पिंज-यांतील पोपट त्या हातभर जागेत नाचणार, तेथेंच उडणार; तेथेंच खाणेंपिणें, तेथेंच मलमूत्रविसर्जन करणें! शिकविलेले दोन शब्द तो बोलेल. यशवंताचें असेंच होतें. ठराविक माणसें, ठराविक गोष्टी, ठराविक पदार्थ, ठराविक शब्द त्याला ठाऊक! घरांतील दही, दूध बासुंदी, अंगारवरचे जरीचे कपडे – याशिवाय त्याला काय माहीत होते? जगांत कोरडी शिळी भाकर खावी लागते, कांजी प्यावी लागते, लक्तरें व चिध्या धारण कराव्या लागतात, धुळीत निजावें लागलें, उन्हांत जळावे लागतें, थंडीत गोठावें लागतें – हें त्याला कांही माहीत नव्हते!
पूर्वजांच्या वैभवावर ऐट मारणारे हे ऐदी शेळगोळे पाहिले की, एक- प्रकारची चीड खरोखर येते. पूर्वजांचा पराक्रम गेला, पूर्वजांची तलवार गेली, पूर्वजांची दिलदारी व पूर्वजांचा त्याग – सारें गेलें, खोटा अभिमान व ऐट ही मात्र या मेषपात्रांजवळ शिल्लक असतात. दागदागिने घालतील, जरीचे पोषाख करतील व मोटारीतून मिरवितील. यशवंत कधी पायांनी शाळेत जात नसे! ईश्वरानें श्रीमंतांस पाय दिले तरी कशाला? उगीच ओझे! एका पोटाची पोतडी दिली असती म्हणजे भागलें असते ! परमेश्वरानें केवळ शिवश्नोदर देऊन पाठविलें असतें तर या पोरूषहीन गर्भश्रीमंतांनी देवाचे आभार मानिले असते. खरें पाहिलें तर शरिराच्या अवयवांचा उपयोग करून शरीर बळकट होतें. अत्यंत श्रम केल्यानें शरीर खंगेल ही गोष्टहि खरी. परंतु चार पावलें जावयाचे झालें तरी जो पाय उचलीत नाही, त्याला काय म्हणावे? आमच्या श्रीमंतीच्या कल्पनाच विचित्र आहेत.
ईश्वरानें दिलेल्या हातापायांचा जो कमीतकमी उपयोग करतो व शिश्नोदराचा जो जास्तीतजास्त उपयोग करतो तो श्रीमंत व सुखी-अशी आमची कल्पना आहे!
जगांतील अनेक शाळा व अनेक छात्रालयें हिडून यशवंत अमळनेरच्या छात्रालयांत आला होता. विलायती वस्त्रांत नटून मूर्ति आली होती. श्रीमंत लोक म्हणजे परदेशी वस्तूंची बोलतींचालती प्रदर्शनें ! यशवंत एक भली मोठी काळी ट्रंक घेऊन आला. त्या ट्रंकेंत वारा सदरे होते. बारा हातरुमाल होते. चार कोट होते. दोन वूलन कोट होते. अन्न व वस्त्र यांनी ती ट्रंक भरलेली होती.
यशवंताला येथें सारेंच निराळे दिसू लागलें. निराळ्याच जगात आपण आलों आहोंत असें त्याला वाटले.
“यशवंत, आज तू केर काढ. आज तुझी पाळी,” खोलींतील मुलें म्हणाली.
“मी काढणार नाही. मी आजपर्यंत कधीहि केरसुणी हातात धऱली नाही,” यशवंत म्हणाला.
“जमूं दे खोलींत केर. स्वामी रागावतील,” मुलें म्हणाली.