धडपडणारी मुले 26
“नामदेव, नामदेव,” त्यानें हांक मारली.
“काय रे रघुनाथ,” नामदेवनें विचारलें.
“अरे कळी आली. चिमुकली कळी ही बघ.” रघुनाथचा आनंद गगनांत मावेना. नामदेव आला. खाली वांकून त्यानें ती पाहिली. त्याच्या नाकाला ती कळी लागली. त्या कळीला रघुनाथनें कुरवाळलें, दोन्ही हातांत धरून ठेविलें.
“रघुनाथ ! असें नको करुं. ती कळी अशानें हाताळेल, चुरगळेल; तिच्याकडे दुरूनच बघ,” नामदेव म्हणाला
रघुनाथ वेळ मिळतांच त्या कळीचें दर्शन घेण्यासाठी येत असे. तिला कीड नाही ना लागली, मुंग्या नाही ना खात – नीट लक्ष देऊन पाही. मुंगी दिसली तर ती हाकली. जणु तो स्वत:च्या पवित्र कळीलाच फुलवीत होता. कळी वाढू लागली. तिचे अंतस्तेज प्रकट होऊ लागलें. आंतील गंध व रंग हळूहळू बाहेर येत होतीं. कशी टपोरी फुगीर दिसत होती! अनंत आनंदाने जणु ती भरली होती.
एके दिवशी सकाळी ती कळी फुलली! भीत भीत तें फूल सृष्टीकडे बघ होते. सूर्याकडे बघत होतें. विनयानें अर्धस्मित करीत होतें. थोडी मान वर थोडी खालीं; थोडें मिटलेलं, थोडें उघडलेलें! किती गोड, गोड फूल!
रघुनाथ पाहातच राहिला. स्वामी पाहातच राहिले. नामदेव पाहातच राहिला.
“आज रात्री येथें आपण समारंभ करू,” नामदेव म्हणाला.
“करा,” स्वामी म्हणाले.
रात्रींचीं जेवणें झालीं. एकदम विगूल वाजलें. सारी मुलें खोल्यांतून बाहेर पडलीं. आपापले कंदील घेऊन मुले बागेंत आली. वरती आकाशांत तार होते. खाली कंदील होते. वरती देवाच्या बागेंतील फुले फुलली होतीं. खालच्या बागेंतहि फुले फुललीं होतीं. मुलें बसली. स्वामी बसले. त्यांनी प्रथम एक आश्रमभजनावलींतील प्रार्थनागीत म्हटलें.
‘अंतर मग विकसित करो अंतरतर हे !’
हें उद्बोधक पद त्यांनी म्हटलें. पद म्हणून झाल्यावर त्यांनी चार शब्द सांगितले. ते म्हणाले, “मुलांनो! ज्या जागेवर आपण आतां बसलेले आहोंत, ती एक पडकी ओसाड भूमि होती. आवारांतील सारी घाणे येथें टाकीत पहिली घाण पाहून आणखी घाण येथे येई. परंतु या भूमीची रघुनाथ, नामदेव, यशवंत, दयाराम यांना दया आली. या भूमीचें रडगाणें त्यांनी ऐकले. ‘माझी जर कोणी काळजी घेईल, मला जर कोणी पाणी घालील, माझ्यातील दगडघोंडे काढील, माझ्यांत चागलें पेरील तर मीहि हसेन. मी बाईट नाही, तुच्छ नाही; गंधवती पृथ्वीचाच मी अंश आहे.’ या भूमीमध्ये फुलबाग होण्याचें सामर्थ्य होतें. आपण ते प्रकट केलें आहे.
“मित्रानों! आपल्या देशांत किती पडीत जमिनी आहेत. बाहेरच्या पडीत जमिनीचे मळे करावयाचे आहेत. परंतु त्याशिवाय दुस-या देवाघरच्या पडीत जमिनी आहेत. भिल्ल, गोंड, कातकरी, अस्पृश्य-शेंकडो तिरस्कृत केलेल्या, उपेक्षित केलेल्या जाति आहेत. सेवेचे पाट घेऊन त्यांच्याकडे आपण गेलें पाहिजे. त्यांच्या ओसाड मनोभूमि लागवडीस आणल्या पाहिजेत. त्यांना संस्कृति दिली पाहिजे, विचारवेलींची, सत्कल्पनांच्या लतांची लावणी त्यांच्या हृदयभूमींत केली पाहिजे. आपल्या वरच्या वर्णांची मनें आतां नि:सत्व झाली आहेत. पीक पुष्कळ घेतलें म्हणजे जमीन नापीक होते. आतां पडीत जमिनी मशागतीस आणू या, म्हणजे अपरपार पींक येईल. हिंदुस्थानांत कला व विद्या यांचा नवविकास व्हावयास पाहिजे असेल, तर अस्पृश्यांच्या, मिल्लाकातकन्याच्या मनोभूमींत काम करावयास चला. तेथें मनगटासारखी विचारांची कणसें येतील. तुम्हाला पुढे हें काम करावयाचें आहे. आपला रडका भारत हसवावयाचा आहे. नंदनवनाप्रमाणे भारत होता. आज त्याचा मसणवटा झाला आहे. परकीय व स्वकीय दास्यामुळे भारत रडत आहे. त्याला तुम्ही नाहीं का फुलवणार?