धडपडणारी मुले 149
आश्रमाचा वाढता व्याप
भावनांची वाढती गुंफण
११
देवपूरचा आश्रम चांगला चालू लागला. गांवातील तीनचार मुले विणकाम शिकली. विणण्याचे काम ती मुले आश्रमात करीत व आश्रम त्यांना मजुरी देई. गांवातील बायका आश्रमास दुवा देऊ लागल्या. पहाटे रस्त्यांतून हिंडले तर चरख्याचे गूं गूं ऐकू येत असे. गांवात आता रिकामे कोणी नसे. निरुद्यागी नसे.
देवपूरला झालेली खादी स्वामी अमळनेरला घेऊन जात व ती तेथे विकून टाकीत. होताहोईतो खादी शिल्लक न राहूं देण्याची ते खबरदारी घेत. छात्रालय हे मुख्य गि-हाईक होते. शिवाय गांवातील काही लोक आश्रय देत असत.
आश्रमाने गांवाची स्वच्छता ठेवली होती. संडास व मोर्यायांची सुधारलेली आश्रम पद्धति गांवात सुरू करण्यात आली. गांवातील मुलांनाच गांवचा अभिमान वाटू लागला. आपला गांव स्वच्छ असावा, आपल्या गांवची अब्रू जाऊ नये असे त्यांना वाटे.
आश्रमातले चार प्रचारक अमळनेर तालुक्यात हिंडू लागले. पंचवीस पंचवीस गांवे एकेकाकडे देण्यांत आली होती. आठवड्यांतून सह दिवशी सहा गांवे घ्यावी व सातवा दिवस आश्रमांत घालवावा. तेथे माहिती द्यावी. पुन्हा निघावे. अशा प्रकारे प्रचारक घुमूं लागले. राष्ट्रीय जागृति हा त्यांचा मुख्य विषय असे. या विषयाभोवती ते अनेक विचार गुंफीत असत. देशातील सर्व चळवळीचे इतिहास, आपली दु:स्थिति, इतर कसे प्रयोग चालले आहेत, आपण काय केले पाहिजे, सघटनेचे महत्त्व, निर्भयता, एक्य, स्वदेशीचे महत्त्व-शेकडो गोष्टी प्रचारक सांगत. कधी ते गाणी म्हणत, कधी गोष्टी सांगत. कधी वर्तमानपत्रे वाचून दाखवीत. कधी देशभक्तांची चित्रे नेऊन देत. कधी ते स्वत: गांव स्वच्छ करीत. कधी औषधे आणून देत. विचारांचे वारे अमळनेर तालुक्यात फिरू लागले. ज्या गांवांत गेल्या शंभर वर्षात कधी कोणी विचार देण्यास आलेला नसेल, अशा त्या गांवांतून प्रचारक हिंडू लागले. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल, लोकमान्य टिळक, देशबंधु दास वगैरे नांवे कानावर पडू लागली. १९२०-२१ सालांतील असहकारितेचा इतिहास, जालियनवाला बागेंतील हृदयास घरे पाडणारे प्रसंग, लष्करी कायद्याच्याखाली मनुष्यास लाजविणारे प्रकार-सर्व गोष्टी शेतकर्यांच्या कानावर पडू लागल्या. इतर देशांत सरकारी नोकरांस पगार कसे कमी आहेत, इतर देशांत शिक्षणावर कसा कोट्यावधि रुपये खर्च करण्यांत येतो. एका जपान देशांत सातशेंच्या वर उद्योगधंद्याच्या शाळा आहेत व हिंदुस्थानांत सातसुद्धा कशा नाहीत, इतर देशांतील सहकारी पेढ्यांचे भांडवल कसे मुबलक असतें, आपल्याकडे कसा खेळखंडोबा आहे- सारा इतिहास खेड्यांतील जनतेला कळू लागला.
प्रचारक कोणी जेवायला बोलावले तर त्याच्याकडे जात, नाहीतर स्व:ता हाताने करीत. भाकरीचे व बेसनाचे पीठ, कांदे, तवा, पितळी, लोटा त्यांच्याबरोबर असे. त्या त्या गांवांत खादीधारी कोण आहेत, निर्भय वृत्तीचे कोण आहेत, वर्तमानपत्रे कोणाकडे येतात, कोणती येतात, गांवांत भांडणे आहेत की काय, गांवांत गुरेंढोरे किती, गांवचा शेतसारा किती, पूर्वी किती होता, किती वाढला, गांवात कर्ज किती, सोसायट्यांचें किती, सावकारांचे किती, शाळा आहे की नाही, मुली शाळेत जातात की नाही, लिहावाचावयास किती लोकांस येते- सर्व माहिती प्रचारक गोळा करीत असत. तालुक्याचा तो उत्कृष्ट अहवालच तयार झाला असता. शंभर वर्षांत खेडी कशी झाली त्याचा जळजळित इतिहास तो तयार होत होता. दारूचा तर एक स्वतंत्र ग्रंथच झाला असता. गांवोगांव दारूपायी भिकारी झालेली कुटुंबे होती. मोठमोठ्या हवेल्या दारूपायी सावकाराच्या घरांत कशा गेल्या व सुखवस्तु घरंदाज शेतकरी अन्नाला मोताद कसे झाले, अब्रू कसे गमावून बसले, मुलाबाळांचे, बायामाणसांचे कसे हाल झाले- याच्या कादंबरीहून रोमांचकारी व उत्कट कथा गांवोगांवात ऐकावयास मिळत!