धडपडणारी मुले 97
“परंतु ऋषित्व व कलावत्व यांचा संगम दुर्दर्शनीय आहे. महाभाग्यानें तो पाहावयास मिळतो. सामान्य नियम हा कीं, महापुरुष हा द्रष्टा असतो, विचारदाता असतो. आणि कलावान ते विचार लोकांना समजतील, त्यांच्या जीवनांत शिरतील अशा रीतीनें रंगवितो. विचारांची धगधगीत बाळें कलावान सौम्यसुंदर रमणीय करतो. ध्येयांना घरोघर घेऊन जाणें हें काम कलावानाचें असतें.
“ग्रह ज्याप्रमाणें प्रकाश मिळावा म्हणून सूर्याभोंवतीं प्रदक्षणा घालतात, त्याप्रमाणें ध्येयांचा दिव्य प्रकाश देणार्या महात्म्यांच्या भोंवतीं कलावंतांनीं फिरलें पाहिजे.
“मग महापुरुष तुम्हांला कोणीहि वाटो. तुम्हांला डॉ. मुंजे महापुरुष वाटले तर हिंदूमुसलमानांत ऐक्य कसें निर्माण होणार नाहीं या ध्येयाची सर्वत्र पूजा करा. चित्रें, बोलपट, काव्यें, पोवाडे, गोष्टी, नाटकें, कादंबर्या सर्वत्र असेंच दाखवा कीं, हिंदूला मुसलमानाची चीड येईल ! तुम्हांला महात्मा गांधी मोठा पुरुष वाटला तर हिंदुमुसलमानांचें ऐक्य, हरिजनोद्धार, खेड्यांतील जनतेचे हाल, खादीचा प्रसार, बंधुभाव, प्रेम, असहकार, निर्भयता, ऐक्य यांना कलेची वस्त्रे द्या.
“तुम्हांला लेनिन महापुरुष वाटला तर वर्गकलहाचें, साम्यवादाचें भांडवलशाहीविरुद्ध शेतकरीमजुरांचें वातावरण तयार होईल अशा कलाकृति तयार करा.”
“जो तुम्हांला पूज्य वाटेल, जो युगप्रवर्तक वाटेल, त्याचे विचार प्रत्येक घरीं, प्रत्येक झोंपडींत नेण्यासाठीं तुम्हीं तुमची कला घेऊन उठलें पाहिजे. जर्मनींत महायुद्धापूर्वी इंग्रजांचा द्वेष व जर्मनीचें भवितव्य हें ध्येय होतें. जर्मनींतील सार्या कला या ध्येयाची पूजा करीत होत्या. नाटककार ते दाखवी, चित्रकार तें रंगवी, बोलपट तें बोले. कवि तें गाई, प्रोफेसर तें सांगे, लेखक तें लिही. त्यामुळें सर्व जर्मनीत एक वातावरण विजेसारखे भारले गेलें होतें. त्यामुळेंच १९१४ मध्यें बर्लिन विद्यापीठांत हिंडेनबुर्ग यांनी ‘देशासाठीं लढावयास जे तयार असाल ते उठा ’ असें म्हणताच खाडकन् सारे उभे राहिले.
“अशा मार्गांनी राष्ट्रे तयार होतात. ध्येय चुकीचें ठरलें तर राष्ट्राचा नाश होईल. नवी ध्येयें दुसरा ऋषी देईल. त्या ध्येयबाळांना कलावान् वाढवितील. ऋषी एकाच काळी जन्मले असें नाहीं. सूर्य जसा प्राचीन काळीं होता व आजहि आहे, त्याप्रमाणें ऋषी प्राचीन काळी होते व आजहि आहेत. प्रत्येक क्षण सत्ययुगाचाच आहे. सत्याचेच प्रयोग क्षणाक्षणाला चालले आहेत. त्या त्या काळांतील खळबळींतून त्या त्या काळांतील ऋषी निर्माण होत असतो.”
“महाराष्ट्रांतील कलावान जीवनापासून अलग झालेले आहेत. राष्ट्रांतील ध्येयांची त्यांच्या जीवनांत पूजा नाहीं, मग त्यांच्या लेखणींत तरी कशी होईल ? महाराष्ट्रांतील, भारतांतील कलावंतांनीं राष्ट्रांतील ध्येयें आपलीशी करून राष्ट्रभर नेलीं असती तर भारताचें आजचें स्वरूप किती निराळें दिसलें असतें ! एका वंदेमातरम् गीतानें जितकी देशभक्ति, जितकी एकराष्ट्रीयता निर्माण केली आहे, तितकी लाखों व्याख्यानांनीं निर्माण झाली नसेल. कलेचें हें भव्य कर्म आहे, दिव्य कर्म आहे. एका रामायणानें आजचा महाभारत तयार केला आहे. स्नेह, दया, सत्य, प्रीति समाजांत जी आहे, ती रामायणानें दिली आहे.”
“महापुरुष आपली ध्येयें कृतीत आणून जीवनाची कला जगाला दाखवितो. तो जीवितच कलामय, काव्यमय करतो. ही दिव्य जीवनकला – तिचे उपासक ललितकलांनीं झालें पाहिजे. अहंकारानें आपलेच विषारीं बुडबुडे उडविणें बंद केले पाहिजे.”