धडपडणारी मुले 57
स्वामी बोलत होते. मध्येंच त्यांचा आवाज सौम्य होई, मध्येच संताप होई.
“पाऊस येण्याची चिन्हें आहेत, आपण निघू या,” नामदेव म्हणाला.
“चला. घ्या आपापलीं निशाणें! घ्या झाडू, घ्या खराटे, घ्या कुदळी, फावडी,” रघुनाथ म्हणाला.
गांवांतील मंडळी सीमेपर्यंत पोंचवावयास आली. ‘वंदे मातरम्, वंदे मातरम्’ स्वामी म्हणाले, मुलें म्हणाली. निघालें. यात्रेकरु परत निघाले. नवभारताचे ते यात्रेकरू होते. त्यांनी घेतलेला हा पहिला पाठ होता. त्या सर्वांना सेवेचा आनंद झाला होता. नेहमींच्यापेक्षा निराळ्या जीवनाचा तो अनुभव होता. गाणीं गात, गप्पा मारीत मलें निघाली. पुढच्या रविवारीं पुन्हां आपण कोठें तरी असेंच जाऊं असें कांही म्हणत होतीं. परंतु आकाश आतां फारच भरून आलें. जवळजवळ अंधार पडला. पक्ष्यांची तारांबळ उडाली. घरट्यांतून पांखऱे जाऊ लागली. मुलें भराभर चालू लागली. गडगडाट होऊं लागला. जोराचा वारा सुटला. सुष्टीचें महान् संगीत सुरु झालें.
“नामदेव! खोलीत बसून गातोस. तेथे रा. या विश्वसंगीतांत तुझे गीत मिळव,” स्वामी म्हणाले.
“नामदेव बाहेर कधी गाणें म्हणत नाही. तो लाजतो,” यशवंत म्हणाला.
“खरें गाणें खोलींत बसून म्हणता येणार नाही. पांखराला पिज-यांत बसून किंवा खोपट्यांत बसून खरी लकेर मारता येणार नाहीं. निळ्या आकाशांत उडत उडत चंडील गातो व गात गात उडतो. सुष्टीची अनंतता पाहून आत्म्याची प्रतिभा स्फुरते, आत्म्याला पंख फुटतात, गाणें स्फुरतें एखादा हिरव्या फांदीवर बसून विशाल सृष्टी पाहात पक्षी गातो. खोलींतील, ढोलींतील गाणें म्हणजे म्रणाचें गाणें. बाहेरचें गाणें म्हणजे जीवनाचें गाणें, विकासाचें गाणें, समरसतेचे गाणें. गा! नामदेव गा,” स्वामी म्हणाले.
नामदेव गाऊं लागला. मुलें नाचू लागली. परंतु आला, जोराचा पाऊस आला. मुलें सारी ओलीचिंब झाली.
“खादी तेथेंच ठेवली म्हणून बरें झाले,” रघुनाथ म्हणाला.
“आपणहि तेथेच थांबलों असतों तर बरें झाले असतें,” मुकुंदा म्हणाला.
“ अरे, पावसांत तर मजा आहे. पाऊस म्हणजे देवाची कृपा. आज देव तुमच्यावर प्रसन्न झाला आहे. तुमच्यावर परमेश्वर अभिषेक करीत आहे. आज तुम्ही देवाचे देव झाला आहात,” स्वामी म्हणाले.
“ते कसें काय?” विश्वनाथानें विचारलें.
“अरे, आज तुम्ही महादेवाचें दर्शन घेतलेंत. ज्या महादेवाच्या दर्शनाला कोणी जात नाही, तेथे आज तुम्ही गेलात,” स्वामी म्हणाले.
“अस्पृश्याच्या घऱीं, होय ना?” मुकुंदा म्हणाला.
“अरे, खेडेगांवांतील जनता म्हणजेच महादेव. हा भोळा सांब आहे. सेवा करणा-यावर हा भोळा सांब लवकर प्रसन्न होतो. परंतु याची आज उपेक्षा होत आहे. भोळ्या सांबाची उपेक्षा केली तर तो रुद्र होतो. खेड्यांतील जनतेची जर स्थिती सुधारली नाही, तर सर्वांचा संहार आहे. सरकार, सावकार सर्वांकडून हा भोळा सांब पिळला जात आहे. रुढी व खोटा धर्म यांच्याकडून छळला जात आहे. हा भोळा सांब एक दिवस आपलें समाधान, संतोष फेंकून देईल व सर्वांना काकडीप्रमाणें खावयास उठेल. या महादेवाची पूजा करावयास सर्वांनी निघाले पाहिजे. या महादेवाला प्रदक्षिणा घातल्या पाहिजेत. प्रदक्षिणा घालून देवाचें स्वरूप समजतें. देवाला किती हात, किती पाय, त्याला कोणता नैवेद्य हवा आहे हें सारें समजू लागतें. आपण प्रदक्षिणा घाणून देवाशी समरस होतो.