धडपडणारी मुले 80
“ध्येयासाठी मरावें कीं नाही?” स्वामीनीं प्रश्न केला.
“ध्येयासाठीच जीवंत आहे,” नामदेव म्हणाला.
“काय रघुनाथ? जीवन मोठें कां जीवनाहून कांही मोठे आहे?” स्वामींनी पुन्हां प्रश्न केला.
“जीवन हें देण्यासाठी आहे. जीवनाहून महत्तर अशा कोणत्यातरी गोष्टीसाठीं हे जीवन अर्पावयाचें असते,” रघुनाथ म्हणाला.
“मग प्रेमाच्या ध्येयाची पूजा करताना मला मरण आलें तर त्यांत काय वाईट? माझ्या ध्येयासाठीं मी मेलों असें प्रेमोपासक म्हणेल. तें मरणें व्यर्थ जात नाहीं. त्या मरणानें तें ध्येय वाढलेंच. त्या मरणाचा परिणाम झालाच असला पाहिजे. त्या मरणा-याच्याहि मनावर संस्कार झालाच असला पाहिजे. अशीं हजारों मरणें तो पाहील तेव्हां तो संस्कार दृढ होईल. हाच मार्ग मानवाला शोभतो. परंतु हजारों वर्षांचे रक्ताचे संस्कार एकाएकी कसे जाणार? ध्येयवादी पुरुष आशेनेंच धडपडेल,” स्वामी म्हणाले.
“तुम्ही कोणाला मारणार नाही?” रघुनाथनें प्रश्नकेला.
“रघुनाथ! मी काय करीन याचा हा प्रश्न नाहीं. मला कोणी मारावयास आला तर मीहि त्याला मारण्याचा प्रयत्न करीन किंवा भागुबाईसारखा पळूनहि जाईन. परंतु त्या दोन्ही गोष्टीबद्दल मला वाईट वाटेल. मी दुबळा आहे म्हणून मी दुस-याला मारण्याचा प्रयत्न केला. फारच दुबळा आहे म्हणून पळून गेलों. त्यांच्यासमोर उभें राहून, ‘गड्या! मार मला. मला मारायचेच असेल तर मार्र, पण मी तुला मारणार नाही. तू मला मारलेंस तरी मी तुला प्रेमच देईन,’ असें चैतन्यप्रभूप्रमाणे मला म्हणता येत नाही म्हणून मी रडेन. मी माझ्या दुबळेपणाचें तत्त्वज्ञान निर्माण करणार नाही. तोफाबंदुकाचें, हिंसेचे परब्रह्य करणार नाही. आज तोफाबंदुकांचे समर्थन करणारे तत्त्वज्ञानच निर्माण होत आहे. ते ध्येय मानलें जात आहे. प्रेम शक्यच नाही असे म्हणण्यांत येत आहे. ही मोठी दु:खाची गोष्ट आहे. बळी तो कान पिळी ही का शेवटी मानवाची महती? जो समर्थ असेल तो जगेल, तो जिंकील, दुबळ्यांचे काम काय, असे का मानव म्हणणार? दुबळेपणा त्याज्य ही गोष्ट खरी. परंतु दुबळ्याला चिरडून हें दाखवायचें नसतें. दुबळ्याला हात देऊन आपण त्याला समर्थ करू दुबळ्याला सांगू, ‘मी तुला मदत करीन. ऊठ, असा पडू नकोस.’ मी समर्थ होईन व दुस-यालाहि साहाय्य देऊन समर्थ व स्वतंत्र करीन. आई मुलांपेक्षा बळवान् असते. त्या दुबळ्या पोराला तिनें का वाढवाचें?” द्यावें फेंकून गटारांत, नाहींतर कच-याच्या पेटीत! नित्शच्या तत्त्वज्ञानांच्या उपासकांनी हेंच केलें पाहिजे. परंतु माता तसें करीत नाही. ती मुलाला वाढविते. त्याचें बोट धऱते, त्याला बोलायला शिकविते. त्याला समर्थ करते, पायांवर उभें राहावयास शिकविते. शेवटी सहकार्य, साहाय्य, सहानुभूति प्रेम हाच मानवजातीचा अखेरचा संदेश हवा. त्या ध्येयाच्या धरुवावर आपले डोळे हवेत. सध्या तोफा, बंदुका बाळगू या. परंतु त्यांची शरम वाटू दे. खंत वाटू दे. केव्हा बरें ही पशुत्वाची चिन्हें फेंकता येतील. ह्याची मानवी समाजांना तळमळ लागू दे.”
बोलतां बोलतां स्वामी भावनावश झाले. ते थरथरत होते.
“वाटेंत धर्मांच्या घरी जायचें का?” रघुनाथनें विचारलें.
“ही. डोकावून जाऊ,” स्वामी म्हणाले.
“त्याला द्यायला कांही नाहीं बरोबर,” रघुनाथ म्हणाला.
“माझ्या पिशवीत बिस्किटांचा पुडा आहे. साठे बंधू बिस्किटें. स्वदेशी नामदेव म्हणाला.
“कशाला रे आणलीं होतींस?” रघुनाथनें विचारलें.
“स्वामींना भूक लागेल म्हणून, होय ना? मला तुम्ही कुकुलें बाळच समजता,” स्वामी मंद हंसले.
“तसें नाही. रघुनाथच्या लहान भावंडांस खाऊ म्हणून मीं दोन पुडे आणले आहेत. एक धर्माला देऊ,” नामदेव म्हणाला.
“नामदेव! तुला सारें सुचतें. आम्हाला रे का नाही सुचत.?”
स्वामीनीं विचारलें.