धडपडणारी मुले 21
तीन मुलें
मी फूल तू फुलविणार कुशाग्र माळी |
मी मूल तूच जननी कुरवाळ पाळी ||
स्वामी आपल्या नवीन संसारांत रमून गेले. मुलांच्या सृष्टीत रंगूं लागले. त्यांना नानाविध अनुभव येऊ लागले. मुलांची मने कळूं लागली. त्यांची सुख-दु:खे, त्यांच्या भुका सारें कळूं लागलें. त्यांचे गुणदोष, त्यांच्या आवडीनावडी सारे कळू लागले. स्वामीनी एक सिद्धात उराशी बाळगिला होता. मुलांच्या भोंवती जितके स्वच्छ, पवित्र, मोकळेपणाचे व आनंदाचें वातावरण, तितकें मुलांचे जीवन सुंदर.. मुलें सुधारवयास पाहिजे असतील तर त्यांच्याभोवतालची सृष्टीच बदला. आदळआपट, शिक्षा, दंड यांनी मुलांचा खऱा विकास होत नाहीं. खरा विकास हृदयांत शिरल्याने होईल, प्रत्यक्ष सेवेनें होईल.
स्वामी मुलांना स्वच्छतेचें महत्त्व पदोपदीं सांगत असत. परंतु केवळ उपदेश करून ते थांबत नसत. मुलें शाळेंत गेली म्हणजे स्वामी मुलांच्या खोल्यांतून हिंडत. मुलांचे बिछाने ते उघडीत. मळक्या चादरी, उशांचे घाणेरडे अभ्रे ते काढीत. रोज दोनचार चादरी, दोनचार अभ्रे ते धुऊन टाकीत. उन्हांत वाळवून पुन्हां मुलांच्या अंथरुणांत नीट ठेवून देत. मुलें रात्रीं आंथरुण उघडीत तो स्वच्छ चादर व स्वच्छ उशी पाहून त्यांना आश्चर्य वाटे. हे सारें कोण करतो? स्वामी करतात कीं काय?
मुलांच्या खोल्यांतील कंदील स्वामी पाहात. कोणकोणाचे कंदील इतके घाणेरडे झालेले असत की ते हातांत धऱवत नसत. स्वामी ते कंदील स्वच्छ करुन ठेवीत. कंदिलांच्या कांचा आरशासारख्या करुन टेवती. मुलांच्या खोल्यांत केर सांचलेला असला तर तो उचलून टाकीत. त्यांच्या कोलीत आवराआंवर करीत, सामान नीट लावून ठेवीत. मुले शाळेत जात तेव्हा घाणेरड्या असणा-या खोल्या, मुलें शाळेंतून परत येत त्या वेळेस प्रसन्न मुखानें त्यांचें स्वागत करीत. मुले खोलीकडे पाहातच राहात. हे सांरें कोण करतो?
मुलांची आपापसांत चर्चा सुरु झाली. हें सारें हमाली काम स्वामी करतात असें त्यांना समजलें. त्यांना वाईट वाटलें. कांही मुलें म्हणाली, “आपण जाऊन त्यांना सांगू या की तुम्ही असें करीत नका जाऊ म्हणून.” तीं पाहा कांही मुलें निघाली.
स्वामी आपल्या खोलीत बसले होते. कांहीतरी लिहीत होते. मुलें दार उघडून आंत आली. तेथे पसरलेल्या शिंदीच्या चटईवर ती बसलीं. मुलांना पाहातांच स्वामींची गंभीर मुद्रा हंसू लागली. मुलें दिसतांच स्वामींना नेहमी हंसू येत असे. झ-यांतून बुडबुड पाणी येतें, तसे त्यांना गोड हंसू येई. त्यांच्या जीवनाला अमृत स्पर्श करणारी म्हणजे मुले होतीं. मुलें म्हणजे चैतन्याची कला, आशेची चंक्रकोर असें ते म्हणत असत.
“काय रे, कां आलात? कांही कट करुन आला आहात वाटते?” स्वामींनी प्रेमळपणानें विचारलें.
“कोणी कांही बोलेना. मुलें एकमेकांना हळूच चिमटे घेऊन तू बोल, तूं बोल असें सुचवीत होती. परंतु स्वामींचे प्रसन्न व मनोहर हास्य पाहून त्यांना बोलण्याचें धैर्य होईना.
“अरे, बोला ना. मी का वाघ आहे, की लांडगा आहे? माझी भीति वाटत असेल तर मी येथे कशाला राहू?” स्वामी म्हणाले.
“तुमची भीति वाटत नाहीं म्हणून तर बोलवत नाहीं. तुम्ही आमच्या वर इतकें प्रेम करता की, तुमच्या इच्छेविरुद्ध बोलावयास आम्हांस संकोच होतो. तुमचें हृदय दुखावले जाईल अशी शंका येते,” मुकंदा म्हणाला.