धडपडणारी मुले 116
देवापूरचा आश्रम
शनिवारी रात्री छात्रालयात भजन होत असे. भजन झाल्यावर स्वामी कधी गोष्ट, कधी एखादा निबंध वाचून दाखवीत. एखादे वेळेस कविता वाचीत किंवा काही विचार सांगत. शेवटी प्रसाद वाटण्याचे गोड काम झाल्यावर तो समारंभ समाप्त होत असे.
शनिवारचे भजन संपले. स्वामी आज काय वाचणार, काय सांगणार? स्वामी जरा गंभीर होते. नेहमीप्रमाणे ते हसत नव्हते. तोंडावरची प्रसन्नता पळून गेली होती. ते काहीतरी बोलू लागले. मुले ऐकू लागली.
"मुलांनो ! मी आज जरा गंभीर आहे हे तुम्हाला दिसतेच आहे. मी तुम्हांलाही थोडे गंभीर करणार आहे. दैनिकांतून निरनिराळे विचार मी तुम्हांला देतच असतो. आज नवीन असे काय सांगणार आहे? आज मी तुम्हाला प्रत्यक्ष त्याग शिकविणार आहे. तुमच्यापैकी बरीचशी मुले सुखवस्तू लोकांची आहेत. खरे पाहिले तर ही सुखस्थिति तुम्हाला कोणी दिली ? लाखो गरीब लोक रात्रंदिवस श्रमतात व तुम्ही सुखात राहता. तुमच्या शाळेची इमारत कशी उठली ? मिलमध्ये मजूर मरत आहेत, त्यांनी निर्माण केलेल्या संपत्तीतून तुमची शाळा बांधली गेली. खरे म्हटले तर 'मजूर हायस्कूल' असे तुमच्या शाळेचे नाव हवे. ज्या मजुरांनी मरेमरेतो कामे करून ही शाळा बांधायला पैसे दिले, त्या मजूरांच्या मुलांना शिक्षण मिळते का ? त्यांना ज्ञान मिळते का ? शाळेली सरकार ग्रँट देते, हजारो कोट्यवधि शोतक-यांनी दिलेल्या करांमधून ही ग्रँट दिली जात आहे. परंतु त्या कोट्यवधि शेतक-यांना विचाराची भाकरी मिळते का? कोणामुळे आपणांस भाकर मिळते ? त्या अन्नदात्या व ज्ञानदात्या उपकार करणारांस आपण सारे कृतज्ञतेने विसरतो.
"लाखो शेतकरी, कामकरी यांना विचार मिळावे असे तुम्हांला वाटते का? तसे वाटत असेल तर काय करावयास हवे ? आपण ठिकठिकाणी प्रचारक पाठविले पाहिजेत. हे प्रचारक खेड्यापाड्यांतून वर्ग घेत जातील, रात्रीच्या शाळा चालवितील, सदीप व्याख्याने देतील, वर्तमानपत्रे व पुस्तके वाचून दाखवितील. ज्ञानाची भाकर त्या बुभुक्षित मनांस मिळेल. परंतु हे प्रचारक कोणी नेमावयाचे ? तुम्ही नेमले पाहिजेत. आणि मोठे झाल्यावर तुम्ही स्वत: प्रचारक झाले पाहिजे. तुम्ही स्वत: मोठे होऊन तुम्हाला पोसणा-या शेतक-यांना, तुम्हाला पांघरणा-या मजुरांना काय विचारमेवा नेऊन द्याल तो द्याल, परंतु तोपर्यंत काय करावयाचे ?