धडपडणारी मुले 15
“स्वामी ! आज काल ओंठावर सेवा शब्द पुष्कळांच्या असतो. परंतु प्रत्यक्ष व्यवहारांत संकटे, विघ्नें, विरोध, निराशा सहन करून सेवा करीत राहाणें, स्थिर वृत्तीनें अखंड करीत राहाणें हे दुर्मिळ आहे. हृदयांत सेवेची भावना असेल, ओठांला सेवा शब्दाचें वेड असेल; परंतु हातापायांना सेवेचें वेड लागल्याशिवाय फुकट आहे. स्वामीजी! तुम्हाला तुमचे विचार पसरवावयाचे असतील, तर तुम्ही माणसें तयार केलीं पाहिजेत. माणसें तयार करण्यासाठी तुम्ही संघ स्थापिले पाहिजेत. आश्रम काढले पाहिजेत. एकाचे पांच, पांचाचे पन्नास याप्रमाणें त्या त्या विचारांनी अंतर्बाह्य पेटलेले तरुण राष्ट्रभर गेले पाहिजेत. म्हणून मी म्हणतो कीं आमच्या संस्थेत या. तेथे दीडशें तरुण मुलें आहेत. नवविचार व नवभावना यांची त्यांना भूक आहे द्या त्यांना विचारांची पौष्टिक भाकर. मी त्यांच्या शरिरांना पौष्टिक व जीवनसत्त्वांचा विकास करणारे अन्न देईन. तुम्ही त्यांची मनोबुद्धि पोसा हृदये व बुद्धि यांना तुम्हीच पोसू शकाल. तुम्ही मला नाही म्हणू नका. अशा संस्थेत राहिल्याने तुमच्यासारख्यांच्या जीवनाचा फार उपयोग होईल. निदान कांही दिवस प्रयोगदाखल तरी राहून पाहा,” गोपाळराव उत्कठतेनें बोलत होते
“या संस्थेशी आणखी कोणाचा संबंध आहे?” स्वामींनी विचारले.
“तसा कोणाचाहि नाही. सहानुभूति पुष्कळांची आहे. मीच या संस्थेचा उत्पादक आहे. तुमच्यासारख्यांची जोड मिळाली तर सोन्याहून पिवळे होईल. शाळेंतील शिक्षण कसेंहि असो. परंतु आपण आपल्या छात्रालयांतून तरी त्यांना नवीन दृष्टी देऊं, नवीन सृष्टी दावूं,” गोपाळराव म्हणाले.
“गोपाळराव! जगांत माझी विशेष आसक्ति कोठेंच नसल्यामुळे येथे हा प्रयोग करावयास हरकत नाही. परंतु मला कोणतेहि मुदतीचें बंधन घालू नका. ज्या दिवशी मला जावेसें वाटेल, त्या दिवशीं मी निघून जाईन. हाच आपला नैतिक करार. जावेसें वाटलें की मी जावें. तुम्हीहि तुम्हाला वाटेल तेव्हां मला घालवू शकाल,” स्वामी म्हणाले.
“ चला तर मग. हे पाहा छात्रालयांतील मुलांचे दोन प्रतिनिधी तुम्हाला घेण्यासाठीं आले आहेत. स्वामीजी! मला किती आनंद होत आहे. तुम्ही यालच असें मला वाटलें होतें,” गोपाळराव जरा कंपित आवाजानें म्हणाले.
“हृदयाची खऱी आशा विफल होत नसते. या अमळनेर स्टेशनवर मी उतरलो व एकप्रकारें अननुभूत भाव माझ्या हृदयांत काल उत्पन्न झाला होता. पूर्वजन्मीचे ऋणानुबध या जागेशीं आहेत कीं काय?” स्वामी म्हणाले.
“आंतर:कोऽपि हेतु:|” गोपाळराव म्हणाले.
“आपण सारे पतंग आहोंत. देव उडवून राहिला आहे. कांहीं दिवस मला अमळनेरच्या निर्मळ हवेंत उडवणार वाटतें?” स्वामी म्हणाले.
“कांहीं दिवस कां? आम्ही तुम्हाला जाऊचं देणार नाही.” एक मुलगा म्हणाला.