धडपडणारी मुले 39
यशवंत व्हरांड्यांत आला. तों समोर मैदानात कोणीतरी फिरत आहे असे त्याल वाटले. कोण बरें ते? स्वामी ! हो. स्वामीच ते कां बरें ते हिंडत आहेत? त्यांना झोप नाही का येत? कोणत्या आहेत त्यांच्या वेदना, कोणत्या यातना?
यशवंत निघाला. स्वामीकडे निघाला.
“कोण, यशवंत ?” स्वामींनी हांक मारली.
“होय,” यशवंत म्हणाला.
“का रे उठलास?” स्वामीनी प्रेमानें विचारलें.
“तुम्ही येथे का फे-या घालीत आहात? तुम्हाला झोंप येत नाही?” यशवंताने उत्सुकतेने विचारलें.
“तुम्ही निजलात म्हणून मला झोंप येईना. तुम्ही जागे झालात म्हणजे मी निजेन. मुलें खादी वापरीत नाहीत, गरिबांची हाक ऐकत नाहीत, जागे होत नाहीत. तोंपर्यंत मी कसा झोप? तुम्ही माझे लहान भाऊ विदेशी वस्तूंचे व विदेशी वस्त्रांचे विषारी सर्प जवळ घेऊन तुम्ही झोपलांत तर मला कशी झोंप येईल? तुम्ही कर्तव्य करावयाला पेटून उठत नाहीं. तोपर्यंत माझ्या हृदयाची लाहीलाही होणार, आगडोंब होणार. खरें म्हटलें म्हणजें मीच चांगला नाही. माझ्या वाणींत तेज नाही, माझ्या करणीत तेज नाही म्हणून तुम्ही माझे ऐकत नाही. मी देवाला प्रार्थना करतों आहे की देवा मला शुद्ध कर. देवा, मला इतका शुद्ध कर की माझ्यासभोवती कोणी पाप करु नये, बंधुद्रोह करु नये. जा यशवंत, तू जा. देव तुला सद्बुद्धि देवो,” असें म्हणून स्वामी निघून गेले.
यशवंत तेथेच उभा होता. शेवटी तोहि खोलीत जाऊन झोपला.
सकाळी यशवंत नामदेवाकडे गेला. तेथें रघुनाथहि बसला होता. नामदेव म्हणाला, “ये, यशवंत, तुझे डोळे लाल दिसत आहेत. रात्री झोप नाही का आली?” यशवंताने रात्रीची सारी हकीकत सांगितली. तो वृत्तांत ऐकतां ऐकता नामदेवानें डोळे भरून आले. ते सरळ सुंदर डोळे भरून आले.
“नामदेव ! रडू नकोस,” यशवंत म्हणाला.
नामदेव म्हणाला, “मला तुकारामांचा एक चरण आठवला.”
रघुनाथनें विचारलें, “कोणता?”
“काय वानू या मी संतांचे उपकार
मज निरंतर जागवी,’
हा तो चरण,” नामदेव म्हणाला.
रघुनाथ म्हणाला, “खरेंच, स्वामी आपणा सर्वांस जागे करण्यासाठी किती झटत आहेत!”