धडपडणारी मुले 100
“रात्रीचें जागरण. दुपारी विश्रांति नाहीं. भांडीहि घासायला लागलेत, आणि भावनांनीं भरलेलें रसरशीत व्याख्यान. ते व्याख्यान नव्हतें. तें रक्त ओकणें होतें. तुम्हाला दमल्यासारखे नाहीं वाटत? खरें सांगा हां?” नामदेवानें भक्तिप्रेमानें विचारलें.
“नामदेव! माशाला पाण्यांत पोहून का दम लागतो? वासराला गाई-भोंवती उड्या मारण्यानें का शीण येतो? सूर्याभोंवती रात्रंदिवस फिरणारी पृथ्वी ती का थकते? मी माझ्या ध्येयाभोंवती प्रदक्षणा घालीत होतों. ज्या विचारसागरांत नेहमीं डुंबतों, तेथेंच आजहि डुंबत होतों. असें व्याख्यान झाल्यावर दमण्याऐवजीं मला दुप्पट जोर येतो, स्फूर्ति रोमरोमीं संचरलेली असते. ध्येयाचा स्पर्श हा चैतन्यदायी असतो,” स्वामी म्हणाले.
“त्वत्स्पर्श अमृताचा | मजला मृता मिळूं दे
मम रोमरोमिं रामा | चैतन्य संचरू दे ||”
नामदेवानें चरण म्हटले.
“नामदेव ! हे कोठले चरण?” रघुनाथनें विचारलें.
“स्वामींच्या वहींतले,” नामदेव म्हणाला.
पर्वतीच्या पाय-या येतांच स्वामी पळू लागले. नामदेव व रघुनाथ पळू लागले. रघुनाथ हूड होता. लहानपणी सातपुड्याच्या पहाडांत गुराख्यांबरोबर तो शेंकडोंदा चढला, उतरला होता. तो काटकुळा होता. परंतु त्याचें ते शरीर म्हणजे लोखंडाची कांब होती. हरणासारखा, सशासारखा, वानरासारखा उड्या मारीत तो गेला. गेला व वरती जाऊन बसला. कार्तिंकस्वामीच्या मंदिराच्या पाठीमागें जाऊन बसला.
स्वामीहि आले. नामदेवहि आला. रघुनाथ त्यांना दिसला.
“सर्वांच्या आधीं मी आली,” रघुनाथ म्हणाला.
“सर्वांच्या मागे मी होतों,” नामदेव म्हणाला.
“मी तुम्हां दोघांच्यामध्यें कैदी होतो,” स्वामी म्हणालें.
स्वामी आजूबाजूस पाहूं लागले. ते गंभीर झाले. त्यांचे डोळे जरानिराळे दिसू लागले. गार वारा जीवनदायी वाहात होता. पवित्र वेळ होती. सायंकाळ होती. स्वामी उभे राहिले. जणुं दशदिशांना ते वंदन करीत होते. त्यांनी साष्टांग दंडवत घातलें. क्षणभर ते पडून राहिले. सद्गदित झाले.
रघुनाथ व नामदेव यांना ते भावदर्शन समजेना. स्वामी शांत झाले. डोळ्यांतील भाव जरा ओसरला, मुद्रा सौम्य झाली.
“तुम्ही कां संध्या केलीत?” नामदेवानें विचारलें.
“पवित्र स्मरण केलं,” स्वामी म्हणाले.
“कोणाचें स्मरण?” नामदेवांनें विचारलें.
“महाराष्ट्राच्या पुण्याईचें, पावित्र्याचें, पराक्रमाचें, त्यागाचें, वैराग्याचें, भक्तिप्रेमज्ञानाचें,” स्वामी म्हणाले.
“आमच्याहि डोळ्यासमोर उभे करा ना ते चित्र.” रघुनाथ म्हणाला.