धडपडणारी मुले 24
स्वामींनी मुलांसाठी एक वाचनालय व ग्रंथालय सुरु केलें. मुलें महिन्याला दोन आणे वर्गणी यासाठी देत. सुंदर पुस्तके व सुंदर पत्रें येऊ लागली. परंतु मुलांनी वाचनालयांत यावें म्हणून स्वामींनी एक नवीनच उपक्रम सुरु केला. त्यांनी दररोज हस्तलिखित दैनिक काढण्याचे ठरविले.
एके दिवशी ‘छात्रालय दैनिक’ वाचनालयांत झळकले. मुलांच्या झुडी तेथे आल्या. रोज सकाळी छात्रालय दैनिक वाचनालयात ठेवण्यांत येई. पहाटे चार वाजता उठून स्वामी ते लिहित. सहा वाजता प्रार्थनेची वेळ होईपर्यंत तें लिहून होई. पांच चत्कोर पाठपोट लिहिलेले असतं. हे दैनिक म्हणजे मुलांचे नवजीवन झालें.या दैनिकाच्या द्वारें स्वामी एकदम दीडशें मुलांच्या हृदयांत जात, त्यांच्याजवळ बोलत.
या दैनिकांत मुलांच्या खोल्यांची वर्णनें येत. घाण कोठे आहे त्यावर टीका येई. स्वच्छ खोलीची स्तुति येई. मुलांच्यावर टीकात्मक लेख येत. काम निराळे होतें. भारतीय संस्कृतीची शिकवण या दैनिकद्वारां स्वामी देऊ लागले. विशाल भारताच्या भूतभविष्याची चर्चा दैनिकांत होऊ लागली. हे दैनिक मुलांना कधी हंसवी, तर कधी रडवी. कधी त्यांतील विनोदी कविता वाचून मुलांच्या मुरकुंड्या वळत, तर कधी देशाच्या स्थितीचे लेख हृदयांत आगडोंब पेटवीत. कधी इतिहास, कधी समाज, कधी शिक्षण, कधी धर्म, नाना प्रश्न दैनिकांत येत. कधी चरित्र, कधी निबंध, कधी गोष्ट, कधी संवाद , कधी चुटके, कधी स्फुट विचार, कधी गंमत, कधी विनोद सारे येथें असे. कधीं रगरागिणी झांशीची राणी लक्ष्मीबाई मुलांसमोर उभा राही, तर कधी सात्विकतेची मूर्ति सीतादेवी तिचें चित्र तेथे रंगविलेलें दिसे. कधी भीष्म तर कधी चिमाजीअप्पा, कधी भगवान् बुद्ध तर कधी रामकृष्ण परमहंस, कधी मिराबाई तर कधी जनाबाई, कधी देश-बंधु दास तर कधी दीनबंधु अँण्ड्रयूज, कधीं लोकमान्य, कधी महात्मा सारे तेथे ओतण्यांत येई. कधीं इस्लामी संस्कृतीचा हिंदु संस्कृतीवर झालेला परिणाम तेथे वर्णिलेला असे, तर कधी भारतीय संस्कृतीचा जगत्संचार तेथे दाखविला जाई. कधीं जपानचा कोरियांतील धिंगाणा येई, तर कधी स्वदेशांतील अन्यायांची कहाणी येई. कधी रशियांतील नवप्रयोग, कधी तुर्कस्थानांतील नवस्वातंत्र्य, कधी आयर्लंड तर कधी इजिप्त, कधी सन्यत्सेनचें मृत्युपत्र तर कधी रुसो-जपानी युद्धांतील रोमांचकारक प्रसंग. कधी टॉलस्टॉयची गोष्ट तर कदी उपनिषदांतील कथा. कधी परेंच राज्यक्रांति तर कधी अमेरिकेंतील वॉशिंग्टन, गार्फील्ड, लिंकन. कधी रवीद्रनाथ, इकबाल यांच्या कवितांचे अनुवाद तर कधी व्हिटमन गटे, बायरन, शैले यांच्या कवितांची सुदर रुपांतरें. कधीं मिलेटसारख्या चित्रकारांच्या आठवणी तर कधीं अजिंठा, वेरुळच्या लेण्यांची हकीकत!
ते दैनिक मुलांना विश्वदर्शन घडवीत होते. खऱा शिक्षक मुलांना भूतकाळची कल्पना देऊन भविष्याच्या दरवाजापर्यंत आणून ठेवतो. आजपर्यंत जगानें काय केलें त्याची कल्पना देऊन उद्या मानवजातीला काय करावयाचें आहे त्याची सूचना देतो. अशा विशालदृष्टीने शिक्षक लहानपणी मुलांना मिळावयास हवेत. परंतु लहान मुलांच्या दुर्दैवाने अत्यंत संकुचित वृत्तीचे, मनानें व बुद्धीनें जड जरठ झालेले, प्रतिभाहीन, ध्येयहीन असेच शिक्षक मुलांना लाभत असतात. मुलांच्या प्राथमिक शाळांतून जाऊन पाहा. अत्यंत मागासलेल्या व बुरसलेल्या विचारांना उराशी बाळगणारे, प्रेम, समानता, त्या वेळेंस थोर व व्यापक ध्येयें उराशी बाळगणारे, प्रेम, समानता, विश्वबंधुत्व यांना पूज्य मानणारे शिक्षकच मिळाले पाहिजेत. परंतु हें कसें व्हावें?
स्वामींच्या दैनिकानें मुलांच्या जीवनांत क्रांति होऊ लागली. मुलांच्या अंगावर गरिबांनी विणलेली खादी येऊं लागली. खोलींत स्वदेशी वस्तु येऊं लागल्या. देशांतील विराट् दु:ख त्यांना दिसूं लागलें. मुलांची दृष्टी पाहूं. लागली, कान ऐकू लागले. देशाची गाणीं, देशभक्तांची नावे त्यांच्या ओठांवर खेळू लागली. मुलांची जीवनें पेटू लागली, सहृदय होऊ लागली.
छात्रालयांत सर्व कांही होतें. परंतु एक गोष्ट तेथें नव्हती. तेथें बाग नव्हती. मुलें आणि फुलें या गोष्टी नेहमीं बरोबर पाहिजेत. मुलांच्या समोर नेहमीं फुलांची पवित्र सृष्टी हवी. फुलें कशी सुगंधी, स्वच्छ व रसमय असतात, तशी आपली जीवनें व्हावीत ही भावना फुलांच्या दर्शनानें मुलांच्या मनांत न कळत बिबण्याचा संभव असतो.