धडपडणारी मुले 66
“तुम्हाला जायला उशीर होईल,” मुलगा म्हणाला.
“मी आता जातो. परंतु तुझे नांव काय?” स्वामीनीं विचारलें.
“माझे नांव धर्मा,” मुलगा म्हणाला.
“किती रे गोड तुमची नांवें असतात. अमळनेरच्या त्या एका मुलींचें नांव आहे एकादशी, एकीचें नाव आहे तुळशी ! तुमच्यांत अधिक धर्म आहे, अधिक परमेश्वर आहे,” स्वामी म्हणाले.
“स्वामी जावयास निघाले.
“धर्मा ! थोडें पाणी असले तर दे रे. मला तहान लागली आहे,” स्वामी म्हणाले.
“ पण कशांत देऊ पाणी?” मुलानें विचारलें.
“त्या नारळाच्या आईंत. मला करवंटी फार आवडतें. करंट्या लोकांना ती आवडत नाही.” स्वामी म्हणाले.
धर्मानें पाणी आणलें. स्वामी पाणी प्यायले व निघाले.
“मी येऊ थोडा तुमच्याबरोबर?” धर्मानें विचारलें.
“चल, येत असलास तर,” स्वामी म्हणाले.
धर्मा व स्वामी बोलत बोलत जात होते.
“मी तुमचा हात धरु?” धर्मानें विचारलें.
“धर,” स्वामी म्हणाले.
धर्मानें स्वामींचा हात हातांत घेतला.
“तुमचा हात किती कढत आहे?” धर्मा म्हणाला.
“माझ्या हातांत प्रेमाची ऊब आहे,” स्वामी म्हणाले.
“ताप तर नाही आला?” मुलानें विचारलें.
“धर्मा! आम्हाला ताप कशाला येईल? तुम्हां गरिबांना ताप,” स्वामी म्हणाले.
“तुम्ही गरीबच आहात, तुम्ही श्रीमंत असतेत तर आमच्याकडे कशाला येतेत? करटींतून पाणी कशाला पितेत?” धर्मा म्हणाला.
“धर्मा, आतां तू घरी जा. काळोख पडू लागला आहे. मी झपझप जाईन,” स्वामी म्हणाले.
“वंदे मातरम्,” मुलगा म्हणाला.
“तुला रे काय माहीत हा शब्द?” स्वामीनीं विचारलें.
“त्या दिवशीचा मुलांचा तो जयजयकार मी ऐंकला होता. गांवांतील मुलेहि एकमेकांना ‘वंदे मातरम्, वंदे मातरम्” धर्मा म्हणाला.
“म्हण तर मग वंदेमातरम् आपण दोघे एकदम म्हणू,” स्वामी म्हणाले.
एकदम वंदेमातरम् मंत्र म्हणण्यांत आला. धर्मा गेला व स्वामी झपाट्यानें चालूं लागलें. परंतु ते दमले. थकले, त्यांना ग्लानी वाटू लागली. कढत. कढत श्वासोच्छवास होऊ लागला, शेवटी ते एके ठिकाणी बसले. त्यांना पूर्वींच् असाच एक अनुभव आठवला. त्या अनुभवाच्या स्मृतीत असतानाच स्वामी तेथें मूर्च्छा येऊन पडले.
शाळेतून नामदेव, रघुनाथ छात्रालयांत आले. परंतु त्यांना स्वामी दिसत ना. स्वामींचा खिन्न चेहेरा त्यांच्या सारखा डोळ्यासमोर होता. शाळेंत त्यांची त्यांना आठवण येत होती. स्वामींचा पत्ता लागेना. कदाचित् फिरायला गेले असतील असें मनात येऊन नामदेव व रघनाथ निघाले. ते दोघे मारवडच्या रसत्याला गेले. झपझप पावलें टाकीत होते. हरवलेलें रत्न पाहाण्यासाठी ते तडफडत होते. त्यांचे पाय पळू लागले, धांवू लागल. हृदय व प्राण तर शरिराच्या पुढे पळत होते. मनाच्या गतीबरोबर हा मातीचा गोळा टिकेना, पाय भराभर वा-यासारखे जात नाही म्हणून त्या दोघांना पायांचा राग येत होता.
थंडगार वारा वाहत होता. स्वामींना वा-यानें शुद्ध आली. पुन: ते उठले. कसे तरी चालत होते. तो समोरून नामदेव व रघुनाथ आले.
“स्वामी, स्वामी,” दोघांनी शब्द उच्चारला.
“यशवंत गेला, तुम्हीहि जाणार का? तुम्हीहि जाणार असाल तर कशाला इकडे आलात? मी एकटा आहे तोच बरा,” स्वामी म्हणाले.