धडपडणारी मुले 8
“बाळ ! मानवजात ऐक्यसागराकडेच जात आहे. तू घाबरू नकोस नदी वाकडी गेली, तरी सागराकडेच तिची चाल असते. मानवजातीचीं पावलें कवी वाकडी पडतील. परंतु शेवटीं मानवजात प्रेमसागराकडेच जाणार !”
नदी न बोलता बोलली.
स्वामीजी तेथल्या शिलाखंडावर बसले. डोळे मिटून बसले. ते का प्रार्थना करीत होते? का आपल्या अंत:सृष्टीत ते दिव्य ऐक्यसंगीत ऐकत होते? ते पाहा दोन तरुण येत आहेत. त्यांना कोण पाहिजे आहे? इतक्या रात्रीं ते का देवदर्शन घ्यावयास आले होते ?
“अरे, तेथें ते खडकावर बसले आहेत; तेच ते”. एकजण म्हणाला.
“होय; चल त्यांच्याजवळ जाऊं. परंतु त्यांच्याजवळ काय बोलावयाचे?”
दुसरा म्हणाला.
“आपण आणलेला फराळ त्यांच्यासमोर ठेवूं व वंदन करूं. न बोलतांच जें बोलता येईल तें बोलू,” पहिला म्हणाला.
दोघे स्वामींच्याजवळ येऊन उभे राहिले. जयविजय उभे होते. तरुण भारत स्वामींच्याजवळ उभा राहिला होता. हिंदुमुसलमानांचा संयुक्त महान् भारत त्यांच्या हांकेला ओ देऊन तेथें आला होता.
“येणार, येणार, मानवजात शेवटीं एकत्र येणार,” एकदम स्वामी मोठ्याने म्हणाले. त्यांनी डोळे उघडले., त्यांच्यासमोर दोन तरुण उभे होते. वरती आकाशांतील तारे पावित्र्याच्या तेजानें थरथरत होते. ते दोन तरुणहि कापत होते. त्यांच्या तोडांतून शब्द बाहेर फुटेना. शेवटी मुजावर म्हणाला, “स्वामीजी.”
“काय पाहिजे तुम्हांला? तुम्ही माझ्याकडे का आले आहात? बसा,” स्वामी प्रेमळ वाणीनें म्हणाले.
ते दोघे युवक खाली बसले. मधून ते स्वामीच्या तोंडाकडे बघत, मधून खाली बघत.
“काय हवे तुम्हांला?” स्वामींनी विचारलें.
“कांही नको,” कृष्णा म्हणाला
“मग सहज बोलत?” त्यांनी पुन्हां विचारलें.
“आम्ही तुम्हाला फराळाचें आणलें आहे. दूध आणलें आहे,” कृष्णा म्हणाला.