धडपडणारी मुले 74
“नामदेव, रघुनाथ! किती सांगू, किती बोलू? हें हृदयमंथन आहे. अमृतसिद्धां होईपर्यंत हें मंथन सुरु ठेवावयाचें. दैवी व आसुरी वृत्ति या हृदयसिंधूचें मंथन करी असतात. कधी विष बाहेर पडतें; कधी मंदिरा, कधी मंदिराक्षी: कधी लक्ष्मी तर कधी शंख; कधी कौस्तुभ तर कधी चाबूक! परंतु घाबरू नये, शेवटी अमृत बाहेर पडेल. मातींतून आपणांस अमरता मिळवावयाची आहे, अंधारांतून प्रकाश मिळवावयाचा आहे, नरकांतून स्वर्ग निर्मावयाचा आहे! हे मानवी भाग्य आहे! देवानें मानवाला हें महान कर्म दिलें आहे! एक दिवस हें कर्म साधेल. जीवनाची कळी फुलेल, फुलेल!”
असें म्हणून स्वामीनीं एक गोड अभंग म्हटला.
‘संपोनिया निशा, उजळते प्रभा,
दिनमणी उभा, नभोभागी,
लाखों मुक्या कळ्या, त्या तदा हांसती,
खुलती डुलती, आनंदाने.
ऊर्ध्वमुख होती, देव पाहाताती,
गंधधूपारती, ओंवाळीती,
तैसे माझे मन, येतांचि प्रकाश,
पावेल विकास, अभिनव.
तोंवरि तोंवरि, अंधारी राहीन,
दिन हे नेईन, आयु्याचे.
जीवनाची कळी, फुले केव्हा तरी.
आशा ही अंतरी, बाळगीतों || स.||
सूर्य मावळत होता. पांखरें घरट्यांत जात होती, इतरांना ‘चला चला’ हाका मारीत होती. क्रीडांगणावर मुलें हसंत होती, खेळत होती. विहिरीला हल्या जोडण्यांत आला. म्हशींची दुधे छात्रालयाचे गडी काढू लागले. नामदेव व रघुनाथ स्वामींजवळ आहेत. दूध पीत आहेत, अमृत पीत आहेत. अभंग म्हणतां म्हणतां स्वामींनी डोले मिटले होते. नामदेव व रघुनात त्यांच्याकडे पाहात होते. संध्यासमय़ींचा रक्तिमा खिडकींतून आंत आला होता! पवित्र प्रकाश तेथें पसरला होता!
छात्रालयाची भोजनघंटा झाली. मुकें, परंतु हृदये भरून आलेले नामदेव व रघुनाथ उठून गेले.
अंथरुणांत पडल्या पडल्या वाचीत असत. त्यांची आवडती पुस्तके त्यांच्या आजूबाजूला असत. ज्ञानेश्वरी, व्हिटमनचीं तृणपणें, गटेचे फौस्ट, मॅझिनीची कर्तव्ये – तेथें पडलेली होती. नामदेव व रघुनाथ आले म्हणजे त्यांना चांगले उतारे वाचून दाखवीत. ‘नम: पुरस्तात् अथ पृष्ठतस्ते’ या गीतेंतील अकराव्या अध्यायांतील श्लोकावरील ओंव्या ते वाचून दाखवीत व तन्मय होत. किंवा नवव्या अध्यायांतील ‘महात्मानस्तु मां पार्थ’ या श्लोकांवरील ओंव्या वाचीत!’
एके दिवशी नामदेवानें विचारलें, “तुमच्या कविता कोठें आहेत? परवांचा अभंग तुमचाच आहे. होय ना?”