धडपडणारी मुले 67
“तुम्हाला न्यायला आम्ही आलों आहोंत,” नामदेवानें हात धरला.
“रघुनाथ ! अरे हात पाहा किती कढत,” तो म्हणाला.
“खरेंच,” रघुनाथनें दुसरा हात हातांत घेऊन म्हटलें.
“आपण छात्रालयाची गाडी आणली असती तर किती छान झालें असतें !” नामदेव म्हणाला.
“मी जाऊन आणू का ? तू येथें थांब. इतके चालण्याचे श्रम त्यांना होणार नाही.,” रघुनाथ म्हणाला.
“पण वा-यासारखा पळत जा व विजेसारखा ये,” नामदेव म्हणाला.
रघुनाथ हरणासारखा पळत गेला. नामदेव तेथें बसला. त्यानें स्वामींचे डोकें आपल्या मांडीवर घेतलें होतें. त्या तप्त डोक्यावर तो आपले शीतल हात ठेवीत होता. स्वामी डोळे मिटून पडले होते.
“नामदेव! एखादें गाणं गा,” स्वामी हळूच म्हणाले.
प्रेमळ नामदेव गाणें गुणगुणूं लागला.
“दु:ख मला जें मला ठावें ||
मदश्रूचा ना
अर्थ कळे त्यां.
आंत जळून मी संदा जावे || दु:ख||
वरिवरि हंसतो
अंतरि रडतो
घोर निराशा मला चावे || दु:ख ||
माता सुखवूं.
बंधू हंसवूं.
वदुन असें ना कुणी धांवे ||दु:ख||
सारे जातील
कोणी न उरतील
प्रभुजी कुणावर विसंबावें || दु:ख||
गाणें संपलें, नामदेवाच्या मांडीवर स्वामीच्या डोळ्यांतील पाणी पडलें.
नामदेवाच्या डोळ्यांतील पाणी स्वामींच्या मस्तकांवर पडलें.
“नामदेव! माझे दु:ख तुला माहीत आहे. एकाला तरी माहीत आहे. पुष्कळ झालें. माझी वेदना समजणारा एक जरी मुलगा निघाला तरी मी पुष्कळच मिळविलें,” स्वामी सकंप वाणीनें म्हणाले.
घणघणत, झणझणत गाडी आली.
स्वामी उठले, गाडींत गादी घातली होती. गादीवर घोंगडी होती उशाला तक्या होता. रघुनाथ गाडी हांकत होता. बैल पळत होते.
“रघुनाथ ! जरा गाडी हळू हांक. हिसके फार बसतात,” नामदेव म्हणाला.
“गाडी धीरे धीरे हांक! बाबा धीरे धीरे हांक,” स्वामी म्हणाले.
“ते गाणें मी तुमच्या जवळून उतरून घेतलें होतें, परंतु पाठ केलें नाही. वेणूलाहि तें गाणें येत आहे,” रघुनाथ म्हणाला.
“तू वेणूला तीं पुस्तकें मग नेऊन दिली होतीस का?” स्वामीनीं विचारलें.