भारतीय संस्कृती 180
भारतीय संस्कृती रोज पितृतर्पण व ऋषितर्पण करीत असते. ऋषींचे स्मरण व पूर्वजांचे स्मरण. ज्यांनी ज्ञान दिले त्यांचे स्मरण. ज्यांनी देह दिला त्यांचे स्मरण. सर्वांची नावे आपण कशी घेणार ? त्या तर्पणात काही नावे असतात. परंतु ती नावे सर्व ज्ञात-अज्ञात ऋषींची व पितरांची प्रतिनिधिभूत असतात.
श्राध्द म्हणजे श्रध्देने केलेले स्मरण. ज्या दिवशी आई-बाप वारले, त्या दिवशी त्यांचे स्मरण करावयाचे. आपण तीन पिढ्यांचे स्मरण करतो. परंतु तीन पिढ्यांचे स्मरण म्हणजे जणू सर्वांचेच स्मरण असते. श्राध्दाच्या दिवशी घर सारवून स्वच्छ ठेवावयाचे. एक प्रकारे गंभीर वातावरण घरात असते. पिंडांना नमस्कार करण्यासाठी घरातील लहानथोर जमतात. आप्तेष्ट येतात. श्राध्दाच्या दिवशी तीनच पिढ्यांचे स्मरण. परंतु सर्व पूर्वजांबद्दल एक दिवस वर्षांतून ठेविलेला आहे. भाद्रपद महिन्यातील अमावास्या ही सर्वपित्री अमावास्या म्हणून मानलेली आहे. त्या दिवशी सर्व पितरांचे स्मरण करावयाचे.
श्राध्द म्हणजे कृतज्ञता. रोज आपण आपल्या व्यवहारात दंग असतो. परंतु वर्षातून एक दिवस तरी आई-बापांचे स्मरण हवे. भारतीय संस्कृतीत श्राध्दाला फार महत्त्व आहे. पाणी देण्यास कोणी तरी हवे, नाही तर मरणोत्तर गती नाही असे समजण्यात येई. नरकापासून तारतो तो पुत्र. अशी पुत्र शब्दाची व्युत्पत्तीही देण्यात येई. ज्याला पुत्र नाही, त्याचे घर अमंगल मानण्यात येई. पुत्राशिवाय घराला शोभा येत नाही.
याचा अर्थ एवढाच की परंपरा चालावी. आपण आपली कुलपरंपरा कोणाच्या तरी हातात देऊन निघून जावे. जो वंशतंतू आपल्या हातात आला, तो आपण तोडणे म्हणजे पाप आहे. तो तंतू अखंड ठेविला पाहिजे. अशा रीतीने आपण अमर होत असतो. पुत्र असला म्हणजे पितरांना स्वर्ग मिळतो. पितर अमर होतात. पुत्रांच्या रूपाने ते अमर होतात. सर्व पूर्वजांचे पुंजीभूत स्वरूप पुढील वंशतंतूंस असते; म्हणजेच ते सारे अमर होतात हा अर्थ.
श्राध्दाच्या दिवशी दोन हेतू प्रधान असतात. एक पूर्वजांचे कृतज्ञतेने स्मरण आणि दुसरे आपणासही असे मरावयाचे आहे, याचेही स्मरण. श्राध्दाच्या दिवशी दान करावे. एक दिवस सारे सोडून जावयाचे आहे, त्याची तयारी करावयाची. थोडे थोडे देऊन टाकावयास शिकावयाचे. श्राध्ददिन म्हणजे नम्रता शिकण्याचा दिन, अनासक्ती शिकण्याचा दिन, 'कर्तव्य नीट कर, केव्हा जावे लागेल याचा नेम नाही' अशा चेतवणीचा दिन.
श्राध्दाच्या दिवशी आपण ब्राह्मण बोलावतो. त्यांना भोजन देतो. श्राध्दाचे स्वरूप कालाप्रमाणे बदलेलही. समजा, आज कोणी असे जेवण वगैरे न दिले, तरी तो अधर्म आहे असे नाही. दुस-या स्वरूपात दान दे. खादी घेऊन ती वाट. एखाद्या संस्थेला साहाय्य कर. परंतु श्राध्द केलेच पाहिजे. श्रध्देने, कृतज्ञतेने पूर्वजांचे स्मरण व आपल्या मरणाचे स्मरण ताजे राहावे म्हणून त्या निमित्ताने त्याग, असा श्राध्दविधी आहे.
३. एकान्त एकाग्रता
भारतीय संस्कृतीत एकान्त ही एक महत्त्वाची वस्तू आहे. संसाराच्या रामरगाड्यातून मन जरा अलिप्त करावयाचे. मन शांत करावयाचे. मनावरची सारी सुखदु:खाची गाठोडी क्षणभर काढून फेकून द्यावयाची. मनाला मुक्त करावयाचे.
एकान्त म्हणजे विश्रांती. त्या वेळेस आपण आपल्या खोल स्वरूपाशी जणू मिळून जावयाचे. आत आत जावयाचे. आकाशात शेकडो ढग येतात, हजारो वारे सुटतात, धुळीचे लोट उठतात, पाखरे उडतात. परंतु या सर्वांच्या पाठीमागे आकाश निळे निळे असते. त्या आकाशाला या गोष्टींचा स्पर्श नाही. आपले हृदयाकाश असेच करावयाचे. रिकामे करावयाचे. स्वच्छ करावयाचे. यासाठी एकान्ताचा आश्रम करावयाचा.
जरा सायंकाळी टेकडीवर जाऊन बस. नदीकठी जाऊन बस. उचंबळणा-या सागराला पाहा. रमणीय बागेत जा. जरा संसारातील त्रास, चिंता विसर. परंतु मनुष्याला संसाराचा इतका हव्यास आहे, की तो फिरावयासही एकटा जाणार नाही. चार जणांना हाक मारून फिरावयास जाईल. तोच संसार बरोबर. त्याच गप्पा. कचेरी-कोर्टाच्या गप्पा, शाळा-कॉलेजातील गप्पा, आपापल्या कर्मक्षेत्रातील गप्पा. सर्वांची निंदास्तुती चालावयाची.