भारतीय संस्कृती 71
अशा रीतीने किंमत वाढू लागली. माळी मनात म्हणाला, “हे दोघे ज्या गृहस्थाला कमळ नेऊन देणार, त्याला जर ते आपणच नेऊन दिले तर आपणांस अधिक किंमत मिळेल.” अशा विचाराने तो माळी त्या दोघांस म्हणाला, “मी कोणासच देत नाही. तुम्ही जा.”
राजा व सावकार निघाले. त्यांच्या पाठोपाठ तो माळीही निघाला. भगवान बुद्ध एका शिलाखंडावर बसले होते. हजारो लोक उपदेश ऐकत होते. राजाने वंदन केले व निमूटपणे दूर जाऊन बसला. सावकाराने प्रणाम केला व तो दूर जाऊन बसला. त्याच्या पाठोपाठ तो माळीही होताच. भगवान बुद्धांच्या पायांवर ते कमळ ठेवून तो ही नम्रपणे दूर जाऊन बसला.
भगवान बुद्धांना पाहताच पैशाचे स्वार्थी विचार माळ्याच्या मनात उभे राहिले नाहीत. त्या पवित्र मूर्तीसमोर पवित्र विचारांनीच त्याचे हृदय भरून आले. त्या वातावरणात स्वार्थी विचार क्षणभरही जगू शकत नव्हते.
एक क्षणभर भेटीचा जर इतका परिणाम, तर तपेच्या तपे अशा महात्म्याच्या संगतीत दवडली तर जीवनाचे सोने का होणार नाही ? संत कसे बोलतात, कसे चालतात, निरनिराळ्या परिस्थितींत कसे वागतात, कसे निर्भर असतात, कसे निःस्पृह असतात, किती निरिच्छ, किती मृदू, परंतु किती निश्चयी, कसे निरहंकारी, कसे सेवासागर, किती निरलस, किती क्षमी, कसे त्यांचे वैराग्य, कशी निर्मळ दृष्टी, कसा विवेक, कसा अनासक्त व्यवहार,-हे सारे त्यांच्या सहवासात नित्य राहिल्यानेच समजत असते.
आपले गढूळ जीवन अशा सद्गरुच्या सहवासात निर्मळ होऊ लागते. पटले जातात, प्रकाश येतो. प्रत्यक्ष प्रायोगिक शिक्षण प्रत्येक क्षणाक्षणाला मिळते. सद्गुरुच्या श्वासोच्छ्वासाबरोबर पावित्र्य येत असते. आईबाप देह देतात, जन्म देतात. परंतु या मातीच्या देहाचे सोने कसे करावे, हे सद्गुरू शिकवितो. भौतिक शास्त्रांतील गुरू मातीची माणके बनवितील. परंतु सद्गुरू जीवनाच्या मातीची माणिक-मोती बनवितो, पशूचा मनुष्य करतो. वैचारिक जन्म देतो, सत्यसृष्टीत देतो. अशा सद्गुरूचे उतराई कसे होणार ? ज्याने माकडाचे माणूस केले, पशूंचे पशुपती होण्याची हाती किल्ली दिली, त्या सद्गुरूचे ऋण कसे फिटणार ? त्याचे कोणत्या शब्दांनी स्तवन करू ? त्याला किती वानू, किती मानू, किती वाखाणू ?
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुःसाक्षात परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः।।
सद्गुरुचे वर्णन करावयास वाणी तोकडी पडते. गुरु म्हणजे देव, महादेव. गुरु म्हणजेच सर्व काही.
आपणाकडेच सद्गुरुंची परंपरा सांगण्याचा प्रघात आहे. सर्वांचा आदिगुरु म्हणजेच कैलासराणा शिव चंद्रमौळी, निर्मल, धवल अशा उंच कैलासावर राहणारा, शौलाचा चंद्र मिरवणारा, ज्ञानगंगा मस्तकी धारण करणारा, सर्पांना निर्विष करून फुलांच्या हाराप्रमाणे अंगावर खेळविणारा, सर्वस्वाचा त्याग करुन विभूतीचे वैभव मानणारा, जगासाठी स्वतःहालाहल पिणारा, भुते-प्रेते-पिशाच अशा पापग्रोनींनाही प्रेमाने जवळ घेऊन त्यांना मांगल्याचा पथ दाखविणारा, वैराग्याचा तृतीय नेत्र उघडा ठेवून वासनांचे भस्म करणारा, असा हा पशुपती मृत्युंजय शिव सर्वांचा आदिगुरू. त्याच्यापासून सर्वांची ज्ञानपरंपरा.
जनकाचा याज्ञवल्क्य गुरू, जनक शुक्राचार्यांचा गुरू, निवृत्तींचा शिष्य ज्ञानदेव, रामानंदांचे शिष्य कबीर, असे हे संबंध शब्दांनी वर्णन करता येणार नाहीत. जीवन स्वच्छ, शुद्ध, शांत व्हावे अशी जोपर्यंत तळमळ माणसास राहील तोपर्यंत हे संबंधही जगात राहतील. हे संबंध भारतातच नाही, तर जगातही राहतील. ते राहण्यातच जगाचे कल्याण आहे.