भारतीय संस्कृती 129
हिंसक व्यक्तीसमोर अहिंसक संत उभा राहतो, त्याप्रमाणे हिंसक वर्गाविरूद्ध अहिंसक वर्गाने उभे राहावयाचे. हिंसक जमीनदारांविरूद्ध अहिंसक शेतक-यांनी उभे राहावयाचे. हिंसा हिंसेने शमत नाही; हिंसेवर अहिंसाच पाहिजे.
अहिंसेने हिंसा जिंकल्याचे इतिहासात उदाहरण नाही, असे सांगण्यात येते. व्यक्तिगत उदाहरणे तर पुष्कळ आहेत. सामुदायिक उदाहरणे मात्र नाहीत. पूर्वीच्या इतिहासात उदाहरण नाही म्हणून पुढे होणार नाही. असे कसे म्हणावयाचे? मानवी इतिहास काही पुरा झाला नाही. पूर्वीचेच सारखे करीत बसणे हे मंदगतीचे लक्षण आहे. आज दहा हजार वर्षे जगात लढाया होत आहेत. युद्धाने युद्ध थांबवू पाहात आहेत. परंतु युद्ध थांबत नाही. १८७० मध्ये जर्मनीने फ्रान्सला लोळविले. तर त्या तहात १९१४ चे युद्ध पेरलेले होते. जर्मनीचा सूड उगविण्यासाठी फ्रान्स अधीर होते. फ्रान्सने सूड उगविला. आता पुन्हा हिटलरने फ्रान्सचा सूड पुरेपूर उगवून घेतला आहे. एका लढाईत पुढील दहा लढायांचे वीज असते.
दहा हजार वर्षांच्या या अनुभवाने माणसाने शहाणे झाले पाहिजे. हा मार्ग चुकला; दहा हजार वर्षे हिंसा हिंसेशी झगडत आहे; परंतु हिंसा कमी होत नाही; हिंसा वाढतच आहे; ती अधिकच उग्र स्वरूप धारण करीत आहे; सोडू या हा मार्ग; नवीन मार्ग घेऊ; अहिंसेने हिंसा शमते का पाहू या, अशी महात्मा गांधींनी घोषणा केली. दक्षिण आफ्रिकेत, चंपारण्यात, बार्डोलीत त्यांनी प्रयोग केले.
जगातील ही अपूर्व गोष्ट होती. ज्या भारतात प्राचीन काळापासून अहिंसेचे प्रयोग होत आहेत, त्याच भारतातील एका महात्म्याने भारतात हा व्यापक व अभिनव प्रयोग केला. मानवजातीच्या इतिहासात एक नवीन पान उलटले गेले. दहा हजार वर्षानंतर एक नवीन गोष्ट मानव-इतिहासात लिहिली गेली.
हा प्रयोग बाल्याअवस्थेत आहे. आजपर्यंत असा प्रयोग झाला नव्हता. संकुचित लोक म्हणतात, “हा प्रयोग फसला.” त्यांना हेच उत्तर की, “आजपर्यंत युद्धाच्या प्रयोगास दहा हजार वर्षे देण्यात आली. या अहिंसेच्या प्रयोगाला दहा हजार वर्षे द्या, आणि मग हा प्रयोग फसला की यशस्वी झाला ते ठरवू. साठ-सत्तर हजार लोक सहा महिने तुरूंगात बसून हा प्रयोग अजमाजवायचा नसतो; आणि या साठ-सत्तर हजारांतील ‘केव्हा आम्ही सुटू’ अशी चिंता बाळगणारेच पुष्कळ ! शस्त्रास्त्रांच्या युद्धात पन्नास-पन्नास लाख सैन्य आठ-आठ कोटी लोकसंख्येची राष्ट्रे उभारतात. त्याप्रमाणे या अहिंसक युद्धातही पस्तीस कोटी लोकांतून दोन-अडीच कोटी लोक जेव्हा मरावयास उभे राहतील, तेव्हाच या प्रयोगाची कदाचित सफलता वा विफलता दिसेल.”
हिंसेच्या प्रयोगाला दहा-दहा हजार वर्षे मानवजात देते आणि अहिंसेच्या प्रयोगाला म्हणे मुदत सहा महिने; आणि सैन्य? सहा महिने तुरूंगात जाणारे पन्नास-साठ हजार लोक ! आणि तेवढ्यावरून हा प्रयोग फसला असे म्हणावयाचे? वाहवा रे बुद्धी !
ज्याप्रमाणे शस्त्रास्त्रांच्या युद्धात दहा-दहा, वीस-वीस वर्षे शिकलेले, कसलेले सैनिक असतात, त्याप्रमाणे या अहिंसक सेनेतही अहिंसेची शिकवण दहा-दहा, वीस-वीस वर्षे ज्यांनी अंगी बानविण्याची खटपट केली आहे, असे लोक लागतात. असे नवे सैनिक निर्माण करण्याचा आरंभ महात्माजींनी केला आहे. जगातील एक प्रयोग ते करीत आहेत. हा प्रयोग जगात पुढे-मागे वाढत जाईल. असले प्रयोग मरत नसतात. असलेच मानवजातीला पुढे-मागे वाढत जाईल. असले प्रयोग होत.