भारतीय संस्कृती 44
परंतु आज समाजात काय दिसते ? गव्हर्नर यावयाचा असला म्हणजे म्युनिसिपालिटी जागी होते. मग रस्ते साफ होतात. गटारे धुतली जातात. परंतु लाखो लोक म्युनिसिपल हद्दीत राहतात, ती का मढी आहेत ? त्यांना का स्वच्छता नको ? त्यांना का घाणीच्या नरकात ठेवावयाचे ? आज बडे लोक आपले देव झाले आहेत. ते आले म्हणजे कर्मे नीट करू लागतो. परंतु लाखो माणसे ही परब्रह्मे आहेत ही भावना बाळगून कर्मे होऊ लागतील तेव्हा भाग्य येईल, मोक्ष येईल, स्वातंत्र्य येईल. तोपर्यंत सर्वत्र अवकळाच असावयाची. सर्व समाजावर मृतकळाच यावयाची. तोपर्यंत आपली दुकाने, आपली हॉटेले, आपल्या खानावळी, आपल्या कचे-या म्हणजे घाण, अव्यवस्था, निष्काळजीपणा, स्वार्थ यांनीच बरबटलेली असावयाची, आणि भारतीय संस्कृती हीन आहे असाच शेरा सारे जग मारील यात संशय नाही.
मोक्ष जप-तपात नसून धर्मात आहे, सेवाकर्मात आहे, आवडीचे कर्म हृदय ओतून करण्यात आहे. समाजदेवाची ही कर्ममय पूजा रसमय, गंधमय करण्यात आहे. त्या कर्माचाच जप करावयाचा. हे कर्म कसे उत्कृष्ट होईल, कसे तन्मयतेने करता येईल, याचीच चिंता बाळगावयाची.
यज्ञानां जपयज्ञोऽस्मि।
असे गीता सांगते. जप म्हणजे निदिध्यास. कालच्यापेक्षा आजचे कर्म अधिक सुंदर होवो, आजच्यापेक्षा उद्याचे होवो, असे सारखे मनात वाटणे म्हणजेच जप. यानेच मोक्षाचे अधिकारी आपण होत असतो. हीच ती तळमळ. सेवा निर्दोष होण्याची तळमळ, सेवा निःस्वार्थी होण्याची तळमळ.
रात्री ईश्वराला प्रत्यहीची कर्मे आर्पण करावयाची असतात. या कर्माचा नैवेद्य त्याला दाखवावयाचा आणि म्हणावयाचे, “देवा ! अजून हे कर्म निर्दोष होत नाही. कर्म करताना अजून स्वतःचा पूर्ण विसर पडत नाही. कीर्तीची, मानाची, पैशांची स्पृहा असते. निंदास्तुतींनी मी खचतो. परंतु उद्या आजच्यापेक्षा अधिक सुंदर करीन बरे कर्म. प्रयत्न करीन.”
आपल्या हातून पूर्ण निर्दोष कर्म होत नाही म्हणून वाईट वाटणे यात सारा धर्म आहे. हे जे अपूर्णत्वाचे अश्रू डोळ्यांतून भळभळतात त्यांत भक्तीचा जन्म आहे. गटे या जर्मन कवीन एके ठिकाणी म्हटले आहे, “जो कधी रडला नाही, त्याला देव दिसणार नाही.” स्वतःच्या अपूर्णतेचे अश्रू डोळ्यांत येऊन डोळे धुतले जातात. डोळे निर्मळ होतात. सर्वत्र भगवंत दिसू लागतो आणि या भगवंताची सेवामय पूजा करावयास अपरंपार उत्साह व उल्हास वाटतो.
अशा जिव्हाळ्याने कर्मे करा म्हणजे कधी थकवा वाटणार नाही. जनाबाई दळून कधी दमत नसे. नामदेवाच्या घरी नेहमी संत यावयाचे. जनाबाई त्यांच्या भक्तिप्रेमाच्या, ज्ञानाच्या गोष्टी ऐकावयास जात नसे ; ती दळीत बसे. “आज माझ्या घरी देव आले आहेत; त्यांना चांगली भाकर पाहिजे. दाणे निवडून नीट बारीक दळू दे.” अशा भावनेने जनाबाई दळी. तिचे हात दमत नसत. त्या हातांत जणू देव येऊन बसे. ते जनाबाईचे हात नसत ; ते देवाचे हात होऊन जात. ते दळणे अपौरुषेय होत असे. ते दळणे म्हणजे अपौरुषेय वेद होता.
जवाहरलाल आठ आठ महिने दौरा काढीत हिंडतात. क्षणाची विश्रांती घेत नाहीत. दिवसातून दहा दहा सभा. विमानातून. मोटारीतून, घोड्यावरून, उंटावरून सायकलीवरून, पायी, भिरीभिरी हिंडणे सदैव चालले आहे ! हा उत्साह कोठून येतो ! त्या सेवेत ते तन्मय असतात. या दरिद्री नारायणाला कसा हसवू, कसा अन्नवस्त्राने नटवू, ज्ञानाने सजवू, हीच चिंता त्यांना असते. ती कर्ममय थोर पूजा असते.