भारतीय संस्कृती 144
लक्ष्मण तर प्रत्यक्ष रामाबरोबर वनात गेला. भरत रामाचे चिंतन करून जगला. परंतु लक्ष्मण रामाच्या दर्शनानेच जगला असता. तुळशीदासांच्या रामायणात हा प्रसंग फारच सुंदर रंगविला आहे. लक्ष्मण म्हणतो, 'रामा ! पाण्याशिवाय मासा कसा राहील ? आईशिवाय बाळ कसे राहील ? तसा तुझ्याशिवाय मी कसा राहू ?
"रामा ! काठीवर ध्वज फडकत असतो. तुझ्या यशोध्वजासाठी या लक्ष्मणाची काठी होऊ दे. तुझ्यासाठी लक्ष्मण आहे. तुझ्याशिवाय लक्ष्मणाला अर्थ नाही.'
भारतीय संस्कृती राम-लक्ष्मण, भरत-सीता यांनी बनविली आहे. भारतीयांच्या रक्तारक्तांत त्यांची चारित्रे गेली आहेत. हे महान आदर्श अमर असे भारतीयांच्या डोळ्यांसमोर लिहिलेले आहेत.
भिन्न भिन्न आदर्शाचा तोटा नाही. ब्रह्मचर्याच्या ध्येयाचे भारतीय उपासक पाहा. हनुमान पाहा. लंकेचे शोधन करीत असता स्त्रीनिवासाकडे तो वळत नाही. फक्त एका खोलीत रामनामाचा जप त्याला ऐकू आला म्हणून तेथे तो डोकावला. तेथे त्रिजटा होती. तसेच ते अलोट इच्छाशक्तीचे इच्छामरणी भीष्म ! आणि पूर्ण वैराग्याने रंगलेले शुक !
भारतीय साहित्यात काही प्रसंग असे आहेत, की त्यांना जगाच्या वाङमयात तोड नाही. शुकपरीक्षेचा प्रसंग असाच आहे. वसंत ऋतू आपले सारे उन्मादक वैभव तेथे पसरतो. कोकिळा प्रेमोत्कट कुऊ करते. पाखरे प्रेमाने परस्परांस खाजवीत आहेत. फुलांचा घमघमाट सुटला आहे. प्रसन्न वारा वाहात आहे. नवपल्लव कोवळे कोवळे फुटले आहेत. सारे वातावरण जसे मादावलेले आहे. आणि ती शुभांगी रंभा शेकडो विलासी हावभाव करीत उभी आहे. वारा तिचा पदर ओढीत आहे. सा-या सृष्टीतील मोहक सुंदरता आसमंतात ओतलेली आहे. ती रंभा त्या शुकाच्या गळ्याला मिठी मारते. परंतु त्याचा रोमही वाकडा होत नाही !
धन्य तो शुक ! धन्य ही भरतभूमी, व त्या शुकाला रंगविणारी प्रतिभा !
वैराग्यमूर्ती शुकाबरोबरच निश्चयमूर्ती ध्रुव डोळ्यांसमोर येतो. बापाने मांडीवरून ढकलले हा अपमान त्याला सहन होत नाही. जेथून कोणी ढकलणार नाही असे अढळ पद घेण्यासाठी तो तेजस्वी बाळ घराबाहेर पडतो. बापाला लाज वाटून तो त्या मुलाच्या मागे लागतो.
"फीर बाळा देईन दोन गांव । ध्रुव बोले देईल देवराय'
बाप सारे राज्य देऊ करतो. तरी ध्रुव माघारा वळत नाही. आज भारतवर्षीयांस या ध्रुवाची आठवण नाही. ती आठवण असती तर फेकलेल्या तुकड्याकडे आशाळभूतपणाने पाहात ते बसले नसते. 'आमचे ध्येय आम्ही गाठू. हे मधले मोह नकोत', असे ध्रुवाच्या वारसदारांनी म्हटले पाहिजे.