भारतीय संस्कृती 74
मनुष्यापासून किती थोर अपेक्षा ! परंतु ही अपेक्षा मनुष्य कशी पुरी करणार ? पशूप्रमाणे वागणारा मनुष्य देवाप्रमाणे केव्हा होणार ? बर्नार्ड शॉने एके ठिकाणी म्हटले आहे, “मनुष्याला निर्मून हजारो वर्षे झाली. आशेने देव वाट पाहात आहे. देव स्वतःचे हेतू पूर्ण करून घेण्यासाठी निरनिराळे प्रयोग करीत होता. निरनिराळे प्राणी निर्माण करीत होता. हा प्राणी आपले हेतू पूर्ण करील, आपल्या आशा सफळ करील, असे करीत देवाने हजारो प्राणी निर्माण केले. परंतु त्याच्या आशा अपूर्णच राहिल्या. पूर्वीच्या अनुभवाने शहाणा होऊन देव नवीन प्राणी निर्माण करीत असे. परंतु नवीन प्राणी पुन्हा देवाच्या तोंडाला पाने पुशी ! असे करता करता देवाने मानव निर्माण केला. सर्व चातुरी खर्चून ; सर्व अनंत अनुभव ओतून हा दिव्य जीव देवाने निर्मिला आणि देव थांबला. दमलेला देव निजला. त्याला वाटले की हा मानवप्राणी माझ्या सर्व आशा पूर्ण करील, माझे मनोरथ पुरवील. निःशंकपणे देव निजला. आपण जागे होऊ तेव्हा त्या मानवी प्राण्याची दिव्य कृती पाहावयास सापडेल व आपल्या डोळ्यांचे पारणे फिटेल या आशेने देव झोपला आहे, परंतु आता हजारो वर्षे होऊन गेली व देव जर जागा झाला तर काय दिसेल ? देवाला प्रसन्न वाटेल का ? त्या परात्पर पित्याला धन्य धन्य वाटेल का ? मानवी संसाराचा सोहळा पाहून त्याच्या डोळ्यांतून आनंदाक्षू घळघळतील का ? त्याचे हृदय प्रेमाने वोसंडून येईल का ? मानवाला तो पोटाशी धरून त्याला प्रेमाश्रूंनी न्हाणील का ?
“छे छे ! मनुष्य मनुष्याला गुलाम करीत आहे. मनुष्य मनुष्याला छळीत आहे. पिळीत आहे, गांजीत आहे, भाजीत आहे. राष्ट्रे राष्ट्रांचे लचके तोडीत आहेत. दातओठ खाऊन एकमेकांकडे पाहात आहेत. वृक-व्याघ्र बरे ; घारी-गिधाडे पत्करली ; परंतु मनुष्य नको ! सर्व सृष्टीचा त्याने संहार चालविला आहे. तो पाले खातो, फुलफळ खातो, तो पशु-पक्षी मारुन खातो. कधी कधी लीलेने त्यांची शिकार करतो ! परंतु हे एक वेळ जाऊ दे. तो स्वतःच्या जातीचाही निःपात करीत आहे ! वाघीण स्वतःची पिले खाते. तिचे एखादे पिलू वाचते. मांजरीही स्वतःची पिले कधी कधी खाते. प्रसववेदनांनी कष्टी झालेली ती माता स्वतःचीच पोरे मटकावते ! स्वतःच्या पोटाची वखवख, भुकेची आग शान्त करण्याकरिता स्वतःची पोरे वाघीण भक्षिते. परंतु मानवही तेच करीत आहे ! स्वतःच्या पोटाची आग शांत करण्याकरिता तो शेजारच्या राष्ट्रांना खाऊन टाकतो. मानव मानवाला भक्षीत आहे. मनुष्य म्हणजे बुद्धिमान वाघ ! क्रौर्याला बुद्धीही जोड मिळाली. मग काय ? वाघाला फक्त नखे व दात आहेत. प्राणी जवळ आला तरच त्याला वाघ खाऊन टाकील, फाडून खाईल. परंतु बुद्धिवान मानवी वाघाने चमत्कार केले आहेत ! तो पंचवीस मैलांवरून मारू शकतो. तो हवेतून मारील, पाण्यातून मारील, रात्री मारील, दिवसा मारील, हवेने मारील, किरणांनी मारील. सर्व सृष्टीतील संहारतत्त्वे शोधून त्यांचा तो उपासक होत आहे ! मारण्याची साधने शोधून काढणे हीच त्याची संस्कृती ! रक्ताने भरलेला हा मानवी संसार आहे. येथे आरोळ्या व आक्रोश आहेत. बळी दुर्बळाला रगडीत आहे, मारक शक्तीचे गोडवे गायिले जात आहेत. पाशवी बळाची उपनिषदे पढविली जात आहेत. कोणी सुखात तर कोणी दुःखात, कोणी विलासात तर कोणी विलयात, कोणी माड्यामहालांत तर कोणी रस्त्यावर पडलेले, कोणी अजीर्णाने मरत”आहेत तर शेकडो अन्नपविणे मरत आहेत. कोणी वस्त्रांनी गुदमरत आहेत तर कोणी वस्त्र नाही म्हणून गारठत आहेत, कोणी सदैव गाद्यांवर लोळत आहेत; शरीराला श्रम नाही, हातपाय मळत नाहीत, थंडी; ऊन लागत नाही, तर दुस-यांना सुखाची झोप ठाऊक नाही. विश्रांती ठाऊक नाही; ऊन असो, पाऊस असो, दिवस असो, रात्र असो, खायला असो, खायला नसो, आजारी असो, वा बरे असो, घरात मुले तडफडत असोत, बायको मरत असो, सदैव काम करावेच लागत आहे. एकीकडे संगीत, एकीकडे विवळणे, एकीकडे चैन, एकीकडे वाण, एकीकडे मजा, एकीकडे मरण! काय हा मानवी संसार!