भारतीय संस्कृती 170
एका बंगाली गीतात एक फारच गोड भाव एकदा मी वाचला होता. एक गोपी म्हणते :
"माझ्या अंगणात प्रत्यही काटे-सराटे पसरून त्यांच्यावरून चालत जाण्याची सवय मी करीत असते. कारण, त्याची मुरली कानी पडताच मला धावत जावे लागेल; आणि वाटेत काटे असले तर मी अडायची एखाद वेळी. सवय असली म्हणजे बरी.
"माझ्या अंगणात पाणी ओतून मी खूप चिखल करते, आणि त्या गा-यातून चालण्याचा अभ्यास मी करीत असते. कारण त्याची मुरली ऐकली की मला जावे लागेल. आणि वाटेत चिखल असेल, तर फजिती व्हायची; परंतु सवय असली म्हणजे पळत जाईन.'
ध्येय एकदा ठरले म्हणजे मग चिखल असो वा काटे असोत, फास असो वा विष असो, त्याच्याकडे सा-या जीवाची ओढ लागली पाहिजे. कृष्णाची मुरली ऐकताच सर्वांनी धावत आले पाहिजे, फेर धरला पाहिजे, हातात हात घालून नाचले पाहिजे. अंतर्बाह्य एकता.
हृदय शुध्द आहे, प्रेमाचा चंद्र फुलला आहे, सा-या वासना संयत आहेत, एक ध्येय दिसत आहे, आसक्ती नाही, द्वेष-मत्सर मालवलेले आहेत, अहंकार शमला आहे, दंभ दुरावला आहे, अशा वेळेस गोकुळात मुरली सुरू होते. या जीवनात संगीत सुरू होते, त्या संगीताची गोडी कोण वर्णील ? त्या संगीताची गोडी कोण चाखील ?
महात्माजी म्हणाले की, 'माझ्या हृदयात तंबोरा लागलेलाच आहे.' थोर उद्गार ! प्रत्येकाच्या हृदयात असा तंबोरा लागू शकेल. प्रत्येकाच्या जीवन-गोकुळात ही मधुर मुरली वाजेल. परंतु केव्हा ? व्यवस्था लावणारा, इंद्रियांना आकर्षून घेऊन ध्येयाकडे नेणारा श्रीकृष्ण जन्मेल तेव्हा.
हा श्रीकृष्ण आपल्या सर्वांच्या हृदयात आहे. ज्याप्रमाणे एखाद्या डोंगरात बाहेरच्या खडबडीत, ओबडधोबड खडकात एखादे शिवालय असते, त्याप्रमाणे आपल्या या ओबडधोबड, ओंगळ जीवनाच्या आतील बाजूस एक शिवालय आहे. आपल्या सर्वांच्या हृदय-गाभा-यात हा शंभू, हा मूत्यूंजय, हा सदाशिव आहे. तो प्रत्यही दिसत नाही; परंतु तो आहे यात संशय नाही. अॅमिल या एका थोर पाश्चिमात्य विचारवंताने एके ठिकाणी लिहिले आहे :
"Deep within this ironical and disappointed being of mine, there is a child hidden, sad, simple creature who believes in the ideal, in love, in holiness and all heavenly superstitions."
याचा भावार्थ असा, की या माझ्या परस्परविरोधी, संशयी, निराश अशा जीवनाच्या आतील गाभा-यात एक लहानसे बालक आहे. ध्येयावर श्रध्दा ठेवणारे, प्रेमावर, पावित्र्यावर, मांगल्यावर विश्वास ठेवणारे, सर्व दैवी वृत्तींवर श्रध्दा ठेवणारे असे हे बालक आहे. हे बालक दिसत नाही, परंतु ते आहे. ते अजून लहान आहे, साधे आहे; खिन्न असे आहे; परंतु आहे.
हे बालक म्हणजे बाळकृष्ण. हा बाळकृष्ण वाढू लागतो. तो खिन्न न राहता बलवान होतो. गुदमरून न जाता प्रकट होऊ लागतो. जीवन-गोकुळात संगीत निर्माण करण्यासाठी धडपडू लागतो. या बाळकृष्णाला वाढविणे हे आपले काम आहे. जीवनात संगीत पाहिजे असेल तर ह्या वेणुधराला वाढवा.