भारतीय संस्कृती 113
कुटुंबातील एक माणूस अशा दृष्टीने भारतीय संस्कृती गायीकडे पहावयास शिकविते. आपण गायीसाठी गोग्रास काढून ठेवतो. आधी गायीसाठी पान वाढायचे व मग आपण जेवावयाचे. जेवताना तिची आठवण ठेवावयाची. आपण कपाळाला गंध लावतो, कुंकू लावतो. गायीच्याही कपाळी ते लावावयाचे. मनुष्य म्हणतो, “गायी! तू मुकी. तुझे स्णरण आधी, तुझ्या रूपाने सर्व पशूंचे मी स्मरण करतो.तुझे तर्पण करून सर्व पशूंचे तर्पण झाले असे मी समजतो.”
भारतीय संस्कृतीत सर्वत्र गाय भरली आहे. लहान मुलांना आया ज्या ओव्या म्हणतात, त्या ओव्यांत गायीवर किती गोड विचार गायिलेले आहेत. त्या गायीवरच्या ओव्या अत्यंत सहृदय अशा आहेत:
ये ग ये ग गायी । चरुनी वरुनी
तान्हा बाळाला म्हणूनी । दूध देई
गायी ग चरती । कोवळीं कणसें
तान्हा बाळा निरसें । दूध पाजूं
गायी हंबरती । प्रेमाचा पान्हा फुटे
गळ्याचें दावे सुटे । वासरांच्या
अंगणात गाय । दाखविते माय
गोड घांस खाय । राजा माझा
गायीचा गोवारी । म्हशीचा खिलारी
तान्ह्या बाळाचा कैवारी । गोकुळींचा
गायी ग चरती । वांसरें कोठें गेलीं
गंगेच्या पाण्या नेलीं । तान्हा बाळानें
गायी ग चरती । कोंवळा ग चारा
दुधाचा चारी धारा । वांसरांना
गायी ग चरती । वांसरें हंबरती
वाडा आहे हा श्रीमंती । तान्ह्या बाळाचा
गायीचा ग गो-हा । मांडी वळूनिया बसे
वाडा शोभिवंत दिसे । माझ्या बाळानें
अशा प्रेमळ गो-प्रेमाच्या ओव्या शेकडो आहेत. गायीच्या वासरांबरोबर खेळत भारतीय बाळे वाढत असतात. गायीची वासरे म्हणजे जणू आपली भावंडे!
आपण बाळाचे बारसे करतो. त्याप्रमाणे गायीच्या वासरांचेही बारसे करण्याचा एक दिवस आपण ठरविला आहे. दिवाळीच्या आधी आश्विन वद्य द्वादशीला आपण गाय-गो-हांची बारस, किंवा गोवत्सबारस; किंवा वसुबारस हे नाव दिले आहे. बारस म्हणजे द्वादश, द्वादशी. बारसे म्हणजे बारावा दिवस. आश्विनातील कृष्ण पक्षातील हा हेतुपुरस्सर बारावाच दिवस गायवासरांसाठी आपण नियुक्त केला आहे. त्या दिवशी गायवासरांची आपण पूजा करतो. त्या दिवशी त्यांचा उत्सव. माणसाच्या दिवाळीच्या आधी गायवासरांची दिवाळी. गायीच्या वासराचा जन्मल्यापासूनचा बारावा दिवस जणू आपण साजरा करतो.