भारतीय संस्कृती 177
मरण म्हणजे सक्तीने अनासक्ती शिकवणे. उपनिषदे म्हणतात, 'तेन त्यक्तेन भुन्जीथा:' 'अरे, जगात दुस-याची झीज भरून काढ आणि मग तू स्वत: उपभोग घे.' परंतु आपण हा आदेश विसरत असतो. आपण कोठारे भरतो, स्वत:च्या नावावर पैसे पाठवतो. शेजारी दु:खी दुनिया मरत असते. आणि जीवाचा उध्दार करणारे मरण येते. या संचयाच्या पंकातून जीवाला वर उचलण्यासाठी मरण म्हणजे मातेचे मंगल हात. आसक्तीच्या चिखलात बरबटलेल्या जीवाला धुऊन स्वच्छ करू पाहणारे ते हात.
धुळीमध्यें गेलें तन-मन मळून
तुझ्या अमृतहातें टाकी रे धुऊन
तुझ्या पायाजवळीं ठेवी रे निजवून
काय सांगू देवा, कोणा सांगू ? । ।
अशी जीवाची, आतील हृदयाची हाक असते. जगातील कोणतीही अन्य वस्तू ही घाण दूर करू शकणार नाही. शेकडो देवालये फोडून जमा केलेल्या अगणित संपत्तीच्या चिखलात महंमद रुतला होता. बेडकाप्रमाणे त्या चिखलात तो आनंदाने उड्या मारीत होता. देवाला मानवाचा हा अध:पात पाहवला नाही. महंमदाला उचलण्यासाठी तो धावला. महंमद रडू लागला. तो आसक्तिमय पसारा त्याला सोडवेना; परंतु देवाने त्याला वर उचलले; मरणाचा साबण लावून त्याला धुतले.
मदीय मालिन्य धुवावयातें
तुझ्याविणें कोण समर्थ माते । ।
हे जीवाचे मालिन्य धुवावयास हातात मरणाचे अमृत घेऊन येणा-या जगन्माउलीशिवाय दुसरे कोण समर्थ आहे ?
मरण आपणांस सावध करते. सारे सोडून जावयाचे आहे, असे स्पष्टपणे समजून येते. जीव गादीवरून घोंगडीवर येतो. देवाच्या दारात नम्र होऊनच गेले पाहिजे. सुईच्या नेढ्यातून हत्ती एक वेळ पलीकडे जाईल; परंतु जगाला कृश, हीन-दीन करून स्वत: कुबेर झालेला संपन्मत्त मनुष्य देवाच्या दारातून आत जाऊ शकणार नाही.
द्वार किलकिले स्वर्गाचे । सताड उघडें नरकाचें
नरकाकडे यांच्या मोटारी जाऊ शकतील. परंतु स्वर्गाच्या अरुंद रस्त्यातून दुस-यासाठी झिजून चिपाड झालेला मनुष्य जाऊ शकेल.
भारतीय संस्कृती सांगते, 'मरताना तरी गाद्यागिरद्यांवरून खाली ये.' आपण बाहेर जगात मिरवतो तेव्हा कोट-बूट घालून जातो. सर्व ऐट त्या वेळेस असते. परंतु सायंकाळी घरी येऊन तुळशीच्या अंगणात बसलेल्या आईला जेव्हा आपण भेटावयास जातो, तेव्हा उपरणे, रुमाल, कोट सारे ओटीवरच राहते. आपण आईचा मंगल हात अंगावरून फिरावा म्हणून तिच्याजवळ उघडे येऊन बसतो. त्याप्रमाणे जगात मिरविल्यानंतर जेव्हा आयुष्याच्या सायंकाळी आपण त्या परम थोर मातेला भेटावयास जाऊ त्या वेळेस उघडे होऊन गेले पाहिजे. एक भक्तिप्रेमाचे वैभव घेऊन आईजवळ जावयाचे.
परंतु मनुष्याला कधी कधी आईलाही उघडे होऊन भेटावयाची लाज वाटते. दुर्योधन आईची कृपादृष्टी सर्वांगावर पडून अमर होण्याची इच्च्छा करीत होता. परंतु त्याला लाज वाटली. फुलांची चड्डी तरी तो नेसलाच. त्याचे इतर शरीर अमर झाले, परंतु मांड्या भीमाच्या गदेने चूर्ण झाल्या ! आईजवळ आडपडदा नको. अमर जीवन पाहिजे असेल तर मातेजवळ मूल होऊन जा. जन्माला आलेत तेव्हा घोंगडीवर आलेत. आता मरताना घोंगडीवर मूल होऊन जा. जन्माला आलेत तेव्हा घोंगडीवर आलेत. आता मरताना घोंगडीवर मरा. जन्मताना बाळ व मरताना बाळ. फरक इतकाच की, जन्मताना आईपासून दूर आलेत म्हणून रडलेत. आता मरताना पुन्हा आईजवळ जावयाचे आहे म्हणून हसा. जन्मताना आपण रडलो, परंतु लोक आनंदाने हसले, आता मरताना आपण हसू व लोक आपली गोड आठवण करून रडतील असे करू.