भारतीय संस्कृती 76
मनुष्याला या ध्येयाकडे घेऊन जाणे हे धर्माचे काम आहे. संस्कृतीचे हेच प्राप्तव्य, हेच गन्तव्य. संत याच ध्येयाकडे मानवी समाजाला घेऊन जाण्यासाठी तडफडत असतात. संत हे मुक्त असतात. परंतु बध्दांना मुक्त करण्यासाठी ते स्वत: बध्द होतात. चिखलात रुतलेल्यांना काढण्यासाठी ते पुन्हा चिखलात येतात. वरती दवाखान्यात त्यांना बसवत नाही. रानावनांत भटकणा-या बंधूंना ज्ञानाच्या सोपानाकडे आणण्यासाठी कमर कसून आशेने संत प्रयत्न करतात. स्वत:चे बलिदान देतात.
संत मनुष्याला चुचकारुन ध्येयाकडे घेऊन जात आहेत. घोड्याला चुचकाराचे लागते, तसेच मानवी प्राण्याचे आहे. संत म्हणतात. ''विषयोपभोग घे, संपत्ती जोड, काही हारकत नाही, परंतु थोडी मर्यादा सांभाळ. '' खा, पी, झोप घे, विषय भोग, संपत्ती मिळव. मारामारी कर, हिंसा कर, या गोष्टी मनुष्याला शिकविण्याची जरुर नाही. या त्याच्या रक्तातच आहेत. या उपजत वृत्तीच आहेत. धर्म या गोष्टी सांगत नाही. धर्म या वृत्तींना मारीतही नाही. धर्म म्हणतो. ''या वृत्तींना मर्यादा घाल. '' तुला खायचे असेत तर खा बाबा. परंतु गड्या, जर बेताने खा. तेलतिखट खाऊ नकोस. शिळेपाके खाऊ नकोस. मांसमच्छर खाऊ नकोस. वाटेल तेव्हा खाऊ नकोस. भूक लागेल तेव्हाच खा. खाण्याचा वेळही ठरव. निजायच्या आधी दोन तास खा. खाल्ल्याबरोबर फार व्यायाम करू नकोस. जे पचेल तेच खा. मांसमच्छरही खावयाचे असेल तर वाटेल त्या प्राण्याचे खाऊ नकोस. जे पचण्यासारखे असेल तेच खा. तेथेही नियम पाळ, विचार कर.
तुला झोपायचे असेल तर झोप. परंतु लौकर झोप व लौकर ऊठ. फार झोपू नकोस. त्यामुळे आळस येईल. शरीरही दुबळे बनेल. मोकळया हवेत झोप. कुशीवर झोप. पाय लांब करुन झोप. रात्रीच्या वेळीच झोप. दिवसा झोपू नकोस. विधिपूर्वक झोप घे.
विषयभोग तुला भोगावयाचा आहे; भोग बाबा. परंतु नेहमीच भोग भोगणे शोभत नाही. पशुपक्षीही संयम पाळतात. तू तर मनुष्य. अमावस्या वर्ज्य कर. अमुक वार वर्ज्य कर. काहीतरी संयम पाळ. ज्याप्रमाणे एकच दिवस खुप खाल्लेस तर मरशील, परंतु रोज बेताचे खाल्लेस तर रसनेचे सुख पुष्कळ वर्षे तुला घेता येईल. त्याचप्रमाणे प्रमाणात विषयसेवन करशील तर तुझी शक्ती पुष्कळ काळ पुरेल. तुझ्या सुखासाठी तू बंधन पाळ.
तुला हिंसा करावयाचीच आहे, तर कर बाबा. परंतु तेथेही काही नियम पाळ. विषारी वायू सोडू नकोस. बाँबगोळे फेकू नकोस. गदायुध्दात कमरेखाली मारू नकोस. रात्री लढाई करु नकोस, एकावर अनेकांनी हल्ला करु नका, स्त्रिया मुले, वृध्द पुरुष यांना मारू नका. उगीच अन्यायाने मारू नकोस, तुला कोणी मारायला आला तरच प्रतिकार करावयास उभा राहा, कपटाने मारू नकोस.
संपत्ती मिळवावयाची आहे, मिळव. परंतु उत्तम व्यवहाराने मिळव. कोणाला फसवू नकोस. लुबाडू नकोस, चोरीमारी करू नकोस. गोरगरिबाला पिळू नकोस फार फायदा घेऊ नकोस. फार व्याज घेऊ नकोस. दुस-या देशांतील लोकांना दारू पाजून पैसे नको मिळवू, दुस-या देशांतील लोकांना बेकार करून, त्यांचे उद्योगधंदे मारून त्यांना गुलाम करून पैसे नको मिळवू. दुस-यांची घरे पाडून स्वत:च्या माडया नको बांधू. दुस-याला नाडून स्वत: नको नटू. दुस-याला रडवून स्वत: नको हसू.