भारतीय संस्कृती 96
महात्माजींच्या दृष्टीत असेच तेज आहे. आश्रमातील मंडळी सांगतात, महात्माजींनी जरा डोळा वाकडा करून पाहिले की मेल्यासारखे होते. त्यांच्या डोळ्यांची भीती वाटते, ते डोळे जणू समोरच्या माणसाच्या हृदयाचा ठाव घेतात. त्या दृष्टीपासून तुम्ही काही लपवू शकणार नाही, ते प्रखर किरण आत घुसल्याशिवाय राहात नाहीत.
बंगालमधील आशुतोष मुकर्जी यांच्या डोळ्यांत असेच तेज होते. कलकत्ता विद्यापीठाच्या एका बैठकीत डाक्का कॉलेजचे प्रिन्सिपॉल टर्नरसाहेब आशुतोषांच्या विरुध्द बोलण्यासाठी उभे राहात होते. परंतु त्या टर्नरसाहेबांनी आपल्या आठवणीत लिहिले आहे:''त्या काळ्या कुळकुळीत पुरुषाने माझ्याकडे तीक्ष्ण नजरेने पाहताच मी मटकन खुर्चीत बसलो!'' (“The black man stared at me and I stag gered back in my chair”)
इतिहाससंशोधक राजवाडे नेहमी घोंगडीवर झोपायचे. ते प्रथम -पत्नी पंचविसाव्या वर्षी मेली त्या वेळेपासून नैष्ठिक ब्रह्मचर्याने राहिले. म्हणूनच त्यांची धारणशक्ती अपूर्व होती. त्यांची बुध्दी वाटेल त्या शास्त्रात चाले. तसेच स्वामी विवेकानंद. विवेकानंदाच्या एकाग्रतेची कमाल होती. ते परिच्छेदच्या परिच्छेद एकदम वाचीत. त्यांची स्मृती अद्भूत होती. त्यांना कोणते शास्त्र समजत नसे असे नव्हते. तसेच स्वामी रामतीर्थ. ब्रह्मचर्याच्या तेजाच्या जोरावर जोरावर सर्व गोष्टी साध्य करून घेता येतात असे ते म्हणत असत.
असे हे ब्रह्मचर्याचे तेज आहे. हे तेज सा-या शरीरात फाकते. डोळ्यांत दिसते, वाणीत उतरते. तोंडावर फुलते. विवेकानंदांना पाहताच दृष्टी दिपून जात असे. रामतीर्थाना पाहताच प्रसन्न वाटत असे. ब्रह्मचर्यांचा अपार महिमा आहे. .
ज्याला आपले आयुष्य सार्थकी लावावयाचे आहे, त्याला ब्रह्मचर्याशिवाय उपाय नाही. महात्माजी १८-१८ तास न थकता काम करतात. हा उरक कोठून आला? इच्छाशक्तीचे हे बळ आहे. लोखंडी इच्छाशक्ती महापुरुषाजवळ असते. परंतु ही इच्छाशक्ती तरी कोठून येते? वासनाजयातूनच दृढ इच्छाशक्ती येत असते. ब्रह्मचर्य हे प्रयत्नसाध्य आहे, ते एकदम थोडेच मिळणार आहे? त्याच्या पाठीस लागले पाहिजे. पुन:पुन व्रतच्युत होऊ, परंतु पुन: वर उठू, अधिक नेटाने पुढे जाऊ. एकदा ते ध्येय मात्र ठरले पाहिजे. आपणांस अशक्य आहे असे म्हटले की ते कधीच मिळणार नाही.
मनुष्य पुष्कळ वेळा आपल्या दुर्गुणांचीच जास्त चिकित्सा करीत बसतो. कधीकधी आपल्या दुर्गुणांचे विस्मरण करणे हाच त्यांना जिंकावयाचा मार्ग असतो. मी असा वाईटच आहे, कसले ब्रह्मचर्य मला साधते, मी सुधारणार नाही, असाच रड्या मी राहणार, असे म्हणाल तर तसेच पतित राहाल. दुर्गुणांचे चिंतन करीत राहिल्याने ते अधिकच दृढ होतात. ''पंचविस दुणे पन्नास'' हे मला विसरू दे असा सारखा जप केल्याने पंचवीस दुणे पन्नास आपण विसरणार तर नाहीच, परंतु उलट ते कायमचे ओठांत व डोक्यात बसतील! जागृती-स्वप्नी पंचवीस दुणे पन्नास दिसतील. जे तुम्हांला नको आहे त्यांची आठवण करू नका. मी चांगला आहे, मी चांगला होणार आहे, मनाने बळकट होणार, मी पुढे जाणार, असेच म्हणत राहिले पाहिजे. भारतीय संस्कृती सत्संकल्पावर भर देते. :
अहं ब्रह्मास्मि, शिव:केवलोऽहम् ।
''मी ब्रह्म आहे, मी सर्वशक्तीमान आहे. '' असे ध्यान करीत जा अशीच कल्पना ठसवीत जा. असे म्हणत राहाल तसे होईल. आपली श्रध्दा आपल्या जीवनाला आकार देत असते.