भारतीय संस्कृती 43
आता एका मातेचे उदाहरण घ्या. ती एकाच मुलाची सेवा करते. परंतु सेवा करताना स्वतःला विसरते. त्या सेवेचे रिपोर्ट ती लिहून प्रसिद्ध करीत नाही. तसे रिपोर्ट ती छापील तर महाभारते होतील. परंतु इतके ती करते, तरी काहीच नाही असे तिला वाटते. तिच्या कर्माची गणितात मांडणी करा.
एका मुलाची सेवा
पूर्ण निरंहंकारता ( स्वतःला शून्य करणे )
या अपूर्णांकाची काय किंमत ? एकाला शून्याने भागिले तर भाग कितीचा लावावयाचा ? तेथे कोणताही भाग लावा, तो अपुराच पडतो.
एक भागिले पूज्य, या अपूर्णांकाची किंमत अनंत आहे; आणि अनंत म्हणजेच मोक्ष.
एका लहानशा कर्मानेच मोक्ष मिळेल. जर कर्मात जिव्हाळा असेल तर त्या कर्मात आत्मा असेल. आपण दक्षिणा देतो त्या वेळेस ती ओली करून देतो. हेतू काय ? ती दक्षिणा रुकाभर असेल, एक पै असेल ; परंतु हृदयाचा ओलावा त्या दक्षिणेत आहे. म्हणून तो पै श्रीमंतांच्या अहंकारी लक्षावधी रुपयांच्या दानाहून अनंतपटींनी श्रेष्ठ आहे. रुक्मिणीचे एक भावभक्तीचे तुळशीपत्र सत्यभामेच्या सौन्याचांदीच्या, हिरे-माणकांच्या राशीहून वजनदार ठरते. सर्वस्वाचा त्याग करणा-या शिवाच्या जटेतील एक केस कुबेराच्या संपत्तीहून वजनदार ठरतो.
म्हणून कर्म भक्तिमय करा. ज्याच्यासाठी कर्म करावयाचे त्यालाच देव माना. असे तुम्ही करू लागलात म्हणजे तुमच्या जड कर्मात किती रसमयता येते, याचा अनुभव तर घेऊन पाहा. समजा, माझी खानावळ आहे. माझा एखादा प्रिय मित्र जर जेवावयास यावयाचा असेल, तर मी किती काळजीपूर्वक स्वयंपाक करीन ? किती प्रेमाने करीन ? ती भाकरी भाजताना मला त्रास होणार नाही, चटणी वाटताना हात दुखणार नाहीत. मी ताट स्वच्छ ठेवीन. तांब्या स्वच्छ ठेवीन. तांब्या स्वच्छ भरून ठेवीन. माशा दूर करण्याची दक्षता बाळगीन. माझ्या मित्रासाठी जर मी इतके करीन, तर माझ्याकडे जेवावयाला येणारे म्हणजे भगवंताच्याच मूर्ती आहेत अशी जर भावना मी करीन, तर माझ्या खानावळीचे कसे स्वरूप दिसेल बरे ? किती स्वच्छता, किती प्रेम, किती अगत्य, किती आनंद, किती प्रसन्न वातावरण असेल, नाही ? प्रत्यक्ष मोक्ष-लक्ष्मी येथे अवतरलेली दिसेल !
समाजसेवेचे कोणतेही कर्म घ्या. शाळा असो, खानावळ असो, दुकान असो, सलून असो. मामलेदार व्हा, वा म्युनिसिपल अधिकारी व्हा. या समाजदेवाची पूजा करावयाची आहे हे विसरू नका. म्हणजे तुमचे कर्म दिव्य झाल्याशिवाय राहणार नाही.