भारतीय संस्कृती 166
म्हणून नाम हे सर्वांत मोठे प्रतीक आहे. 'इंद्राचे स्वरूप काय ? इंद्राची मूर्ती कशी असते ?' ह्या प्रश्नाला मीमांसक उत्तर देतात, 'इं आणि द्र- इंद्र हा शब्द, ही दोन अक्षरे म्हणजेच इंद्राचे स्वरूप. हीच त्याची अक्षरमूर्ती.'
ओम हे परमेश्वराचे नाव आपण ठेविले आहे. राम, कृष्ण अशी अनेक नावे तरी कशाला ? त्या सर्व नावांचे सार म्हणजे ओम. सर्व शब्दसृष्टी कढवून हे एक ओम अक्षर निर्माण केले आहे. ओम मध्ये सारे स्वर आले, सारी व्यंजने आली. सारी वाङमये आली, सारे वेद आले. ओम ही परमेश्वराची वाङमयी मूर्ती.
पाषाणमयी मूर्ती घडवावयाला त्रास; पुन्हा ती भंगुर. परंतु या अक्षरमयी मूर्ती सर्वांना सुलभ-सोप्या असून पुन्हा अक्षर म्हणजे अभंग आहेत. माझ्या ओठांतील 'राम' ही अक्षरमयी मूर्ती कोणता मुसलमान घेऊन फोडील ?
म्हणून नाम हे महान प्रतीक आहे. नाम उच्चारताच सारे आठवते. सारा इतिहास एका नावात जणू येऊन बसलेला असतो. आई हा शब्द उच्चारताच मातेचे अनंत प्रेम आठवते. बाळ हा शब्द आठवताच मातेला मुलाच्या शतस्मृती आठवतात. आपण ऋषींचे तर्पण करतो, त्या वेळेस त्यांची नुसती नावे उच्चारतो. त्या नावांतच सारे पावित्र्य येऊन बसते. जसजसा काळ जातो तसतसा इतिहास घट्ट होत होत एका नावात सामावतो. जसे आकाशातील दूरचे पवित्र तारे, तशी ती दूरची नावे होतात. वसिष्ठं तर्पयामि, अत्रिं तर्पयामि, असे आपण म्हणतो; परंतु वसिष्ठ म्हणजे काय ? अत्री म्हणजे काय ? केवळ पावित्र्य ! ते नाम उच्चारताच पवित्र वाटते. राम म्हणताच निराळा संस्कार होतो. हा प्रिय भारतवर्ष म्हणताच सारा थोर इतिहास डोळ्यांसमोर येतो. ते थोर शिवछत्रपती म्हणताच सारा रोमहर्षक पराक्रम आठवतो. म्हणूनच नामाला अपार महत्त्व दिले आहे. ते कोठेही घेता येते. घरी-दारी, बसता-उठता, हे नामरूपदर्शन आहे. त्याला पैसे नकोत, फी नको, दक्षिणा नको, काही नको. 'राधेकृष्ण बोल, तेरे क्या लगेगा मोल ?' 'राधेकृष्ण' बोल बाबा. काही किंमत का द्यावी लागणार आहे ?
ह्या अक्षरप्रतीकात केवढे सामर्थ्य आहे ? चिंच म्हणताच जिभेला पाणी सुटते, मिरची म्हणताच हाय असे होते, हा सर्वांचा अनुभव आहे. म्हणून या नामाला कमी लेखू नका. सारा संसार नामरूपात्मक आहे; परंतु ते नामरूपसुध्दा शेवटी नामात सामावून जाते व केवळ नाम उरते !
असो. भारतीय संस्कृती वाढती आहे. वाढत्या संस्कृतीत प्रतीकेही नवीन नवीन येणार. नवीन तत्त्वज्ञान येताच नवीन प्रतीकेही येतात. राष्ट्रीय सभेचा तिरंगी झेंडा हे सर्व धर्मांच्या ऐक्याचे चिन्ह आहे. त्या झेंड्यावरील चरखा हा कोणाचीही पिळवणूक न करता केल्या जाणा-या श्रमजीवनाचे चिन्ह आहे. चरखा म्हणजे स्वावलंबन, चरखा म्हणजे व्यक्तित्व, चरखा म्हणजे निर्दोष श्रमाची महती. खादी हे एक नवीन प्रतीक निर्माण झाले आहे. खेड्यातील उपाशी लोकांचे स्मरण म्हणजे खादी ! लाल झेंडा हे नवीन प्रतीक येत आहे. जगातील श्रमजीवी लोकांचे ते ऐक्यचिन्ह. हातोडा, कोयता म्हणजे श्रममाहात्म्याची प्रतीके.
अशा रीतीने प्रतीकांकडे पाहात जावे. खोल पाहण्याची दृष्टी आली म्हणजे एक प्रकारचा आनंद वाटतो. त्या त्या क्रिया, ती ती चिन्हे मग अर्थपूर्ण वाटतात. वस्तूंच्या अंतरंगाला हात लावला असे वाटते. आपण रसग्राही आहोत. बाह्य सालींनी कोणाचे समाधान होणार ! भारतीय संस्कृतीच्या अंतरंगाला हात लावावयाचा असेल, तिचे खरे स्वरूप समजावून घ्यावयाचे असेल, तिचे खरे उपासक व्हावयाचे असेल, तर खोल दृष्टी घ्या. म्हणजे मग ह्या संस्कृतीचे अंतरंग प्रेमाने फुललेले, पावित्र्याने नटलेले, त्यागाने पेटलेले, माधुर्याने भरलेले, ज्ञानाने अलंकृत, आशेने शोभिवंत, उत्साहाने संस्फूर्त, आनंदाने पूरित असे दिसून आल्याशिवाय राहणार नाही !