भारतीय संस्कृती 23
मरताना सर्वांत महत्त्वाची वस्तू जीव बरोबर घेऊन जातो. आपण एका गावाहून दुस-या गावी जाऊ लागलो, की सर्वांत महत्त्वाची वस्तू आपण बरोबर घेतो, केरकचरा टाकून देतो. या जगाच्या खोलीतून मोतीलाल परलोकाच्या दुस-या खोलीत जावयास निघाले. कोणती महत्त्वाची वस्तू त्यांनी बरोबर घेतली? त्यांच्या जीवाला कशाची भूक होती? शुद्ध विचारांची, बुद्धीच्या स्वातंत्र्याची, ज्ञानाच्या प्रकाशाची. जर्मन कवी गटे मरताना ‘अधिक प्रकाश, अधिक प्रकाश’ असे म्हणत मेला. मोतीलाल नेहरू “तेजस्वी बुद्धी, स्वतंत्र बुद्धी” असे जपत निघून गेले.
प्रत्यही जानवे हातात धरून गायत्रीमंत्र जपणा-यांना मरताना गायत्रीमंत्र आठवेल का? तो महान मंत्र त्यांच्या रोमरोमांत गेला आहे का? त्यांना जानवे महत्त्वाचे वाटते; परंतु गायत्रीमंत्रातील दिव्य विचार महत्त्वाचा वाटत नाही. विचाराची उपासना करणारा, ज्ञानासाठी धडपडणारा तोच खरा गायत्रीचा सांभाळकर्ता आहे. आणि यासाठीच स्वामी विवेकानंद म्हणत की, “ब्राह्मण पाश्चिमात्यांत अधिक आहेत. ज्ञानाची उपासना आमरण क्षणाक्षणाला करणारे आपणांत कोठे आहेत?” जानवी सांभाळून हिंदुधर्म सांभाळला जात नसतो. जानवी सांभाळणारे किल्ल्या व कानाकोरणी सांभाळतात! हातातील अंगठी व सल्लेजोडी सांभाळतात!
समाजात धर्म आहे की नाही हे कशावरून ओळखायचे? त्यागावरून. ज्यांच्याजवळ त्याग दिसेल, त्यांच्याजवळ धर्माचा आत्मा आहे. ज्या तरुणांना आज धर्महीन म्हणून म्हणण्यात येते, त्यांच्याजवळ जर त्याग असेल तर त्यांच्या जवळ धर्म आहे. शेंडीसाठी पूर्वी युद्धे झाली. ती शेंडी आज न ठेवणारे धर्महीन आहेत, हे म्हणणे पोरकटपणाचे आहे. शेंडी न ठेवणा-याजवळ ज्याच्यासाठी मरावे, असे दुसरे काही आहे की नाही? सत्याग्रहाच्या चळवळीत तुरुंगात नित्यनेमाने टकळी सूत कातावयास मिळाली नाही म्हणून मरेतो उपवास करणारे लोक निघाले. प्रत्येकाला काही ना काही महत्त्वाचे वाटत असते. पूर्वीची चित्रे, पूर्वीची प्रतीके, पूर्वीची व्रते व पूर्वीचे नियम ह्यांत बदल होईल. नवीन व्रते व नवीन प्रतीके येतील, त्या त्या प्रतीकासाठी व व्रतासाठी प्राणार्पण करू पाहणारे तेज असले म्हणजे झाले.
इंग्लंडमध्येब बर्ट्रांड रसेल म्हणून एक प्रज्ञावन्त पुरुष आहे. त्याने एके ठिकाणी लिहिले आहे, ती नीती दोन प्रकारची असते. एक ऋण-नीती व दुसरी धन-नीती. ऋण-नीती समाजाच्या हिताचे काहीएक करीत नसते. माळा जपतील, गायत्रीमंत्र म्हणतील, तीनतीनदा स्नाने करतील, भस्मे लावतील, गंध लावतील. हे सारे ऋण-नीतीचा उपासक करतो. परंतु जर आपण त्याला विचारले, “समाजातील उपासमार दूर करण्यासाठी काय केलेस? समाजास चांगले शिक्षण मिळावे म्हणून काय केलेस? स्त्रियांची स्थिती सुधारावी म्हणून काय केलेस?” या सर्व प्रश्नांना त्याचे उत्तर “नेति नेति” असेच येईल. याच्या उलट धन-नीती असते. धन-नीतीचा उपासक स्नान-संध्या करीत नसेल, देव-दर्शनास, कथा-कीर्तनास जात नसेल, माळा-भस्मे यांची उपासना करीत नसेल, परंतु समाजातील अन्याय दूर करण्यासाठी तो धाव घेतो. तो पददलितांची बाजू घेतो. सारी घाण जाळावयास तो उभा राहतो. जेथे जेथे विपत्ती असेल, संकट असेल, जुलूम असेल, अशरणता असेल, अरेरावी असेल, तेथे तेथे तो वीराप्रमाणे उभा राहील. स्वत:चे बलिदानही वेळ पडली तर तो देईल.
सनातनी लोक ऋण-नीतीचे उपासक असतात. नवीन कार्यकर्ते धन-नीतीचे कार्यकर्ते असतात. ज्या समाजात कर्मशून्य ऋण-नीतीचाच पसारा फार दिसतो, त्या समाजाला धुळीस मिळावे लागते. ज्या समाजात प्रत्यक्ष सेवा करणारे धन-नीतीचे उपासक असतात. तो समाज वर येतो.