भारतीय संस्कृती 139
भारतीय संस्कृतीत हनुमान हा बळाचा आदर्श आहे. सर्व प्रकारची बळे त्याच्या ठिकाणी संपूर्णपणे विकसित झाली आहेत.
मनोजवं मारुतुल्यवेगम्
जितेन्द्रियं बुध्दिमतां वरिष्ठम्
वातात्मजं वानरयूथमुख्यम्
श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥
मारूती केवळ बलभीम नव्हता, तो मनाप्रमाणे चपळ होता. मोठमोठे पहिलवान असतात, त्यांना जरा पळवत नाही, चपळ मुले त्यांना चिमटे घेऊन बेजार करतील ! त्यांना पटकन मागे वळता येत नाही; पुढे वळता येत नाही. सर्व प्रमाणात पाहिजे. मारुतीचा वा-याप्रमाणे वेग होता. तो नुसता लठ्ठंभारती नव्हता. मारुतिरायाचे शरीर वज्राप्रमाणे दणकट होते व वा-याप्रमाणे चपळ होते. त्याच्या पायांनी दगडाचा चुरा केला असता व तेच पाय द्रोणागिरी आणावयास क्षणात दहा कोस जाते.
या शारीरिक बळाबरोबरच मनोबळही त्यांच्याजवळ होते. ते जितेंद्रिय होते, संयमी होते. शीलवान, चारित्र्यवान, व्रती होते. मिळविलेल्या बळाची उधळपट्टी त्यांनी केली नाही. वासनाविजय त्यांनी केला होता, शरीराच्या अवयवांवर ज्याप्रमाणे त्यांनी विजय मिळविला होता, स्नायूंवर ज्याप्रमाणे सत्ता त्यांनी मिळविली होती, त्याचप्रमाणे मनाच्या ऊर्मीवरही त्यांनी मिळविली होती. मनोविजय ज्याने मिळविला, त्याने सर्व काही मिळविले.
शरीर बलवान, हृदय शुध्द व पवित्र, त्याचप्रमाणे मारुतिरायांची बुध्दीही अलौकिक होती. ते बुध्दिमंतांचे राजे होते. बुध्दीचे त्यांना वावडे नव्हते. आपल्याकडे एक कल्पना रूढ झाली आहे की जो बलवान आहे तो बुध्दिवान नसावयाचा; आणि जो बुध्दिवान आहे तो बलवान नसावयाचा. परंतु मारुतिराय म्हणतात दोन्ही पाहिजेत.
शरीर, हृदय व बुध्दी, तिहींचा उत्कृष्ट विकास आहे; तरीही आणखी एका वस्तूची जरुरी आहे. ती म्हणजे संघटना-कुशलता. आपण स्वत:शी पुष्कळ चांगले असतो, परंतु जर समाजात मिसळलो नाही तर कामे उठत नाहीत. तेज पसरत नाही. मारुती हा वानरयूथमुख्य होता. तरुणांच्या संघटना हाती घेतल्या पाहिजेत, त्यांच्यात घुसले पाहिजे, त्यांना बलोपासना शिकविली पाहिजे; शारीरिक, मानसिक व बौध्दिक अशी त्रिविध बलोपासना. तरुणांबरोबर खेळले पाहिजे. त्यांचे संघ स्थापन केले पाहिजेत. त्यांच्याबरोबर चर्चा केल्या पाहिजेत. तरच कार्य झपाट्याने पुढे जाते.
समर्थांनी अशीच संघटना केली. ही विविध बलोपासना त्यांनी शिकविली. हजारो मारुती त्यांनी स्थापन केले. गावोगावी आखाडे उभे राहिले. दंड वाजू लागले. कुस्त्यांचे फड पडू लागले. यात्रांतून कुस्त्या होत होत्या. या आखाड्यांबरोबरच रामकथाही गावोगाव नेली. रामकथा म्हणजे साम्राज्यनाशार्थ संघटना हे विचारही सर्वत्र गेले. पीळदार दंड जनतेला स्वराज्य देण्यासाठी उपयोगात येऊ लागले. 'मराठा तितुका मेळवावा' हा मंत्र देऊन हृदयात ऐक्य निर्माण करण्यात आले. हृदय, बुध्दी, शरीर, तिघांना तेजस्विता आली. करंटेपण दूर होऊ लागले. 'जो तो बुध्दीच सांगतो' असला चावटपणा नाहीसा होऊन श्रीशिवाजीमहाराजांभोवती सारे जमा होऊ लागले. धर्माभोवती गोळा होऊ लागले.
कारण शरीरबळ, पवित्र हृदय व प्रखर बुध्दी त्याप्रमाणेच सारी संघटना, यांचा उद्देश काय ? या सर्व साधनांचा उपयोग रामसेवेत करावयाचा. 'रामदूत' यात मारुतीचा मोठेपणा आहे. माझी शक्ती दुस-यास गुलाम करण्यासाठी नाही. माझी बुध्दी दुस-यावर साम्राज्ये लादण्यासाठी नाही. माझ्या अंतर्बाह्य शक्ती रामाच्या सेवेसाठी आहेत. आणि रामसेवा म्हणजे तेहतीस कोटी देव दास्यातून मुक्त करणे.