भारतीय संस्कृती 146
आणि तसाच तो बळी ! वामनाला पाऊल ठेवावयास जागा नाही, तर स्वत:चा माथा तो पुढे करतो. बळीची फजिती झाली असून मत्सरी देव नगारे वाजवितात, दुंदुभी वाजवितात, परंतु धीरोदात्त बळी म्हणतो :
"नभीं सुरांच्या जयवाद्यनादा । भीतों जसा मी अपकीर्ती-वादा । '
'माझ्या यशाची मला चाड आहे. या देवांच्या गोंगाटाची मला पर्वा नाही.'
चारुदत्ताने मृच्छकटिकात असेच उद्गार काढले ओत :
"विशुध्दस्य हि मे मृत्यु: पुत्रजन्मसम: किल । '
भारतीय संस्कृतीचा हा आवाज आहे.
आश्रय मागणा-या कपोताचे संरक्षण शिबी राजा मांडीचे मांस कापून देऊन करतो. मयूरध्वज अतिथीला अर्धे अंग कापून देतो, आणि डाव्या डोळ्यांतून पाणी आले म्हणून अतिथी निघून जाऊ लागताच मयूरध्वज म्हणतो, 'हे शरीर कर्वतून द्यावे लागत आहे म्हणून हे पाणी नाही. तर उजवे अंग सार्थकी लागले; आपले तेवढे भाग्य नाही, म्हणून या डाव्या अंगाचा डावा डोळा भरून आला आहे !'
अतिथीला एकुलता एक पुत्र शिजवून वाढणारी चांगुणा आपल्या मुलाचे मस्तक ओव्या म्हणत कांडते ! केवढे धैर्य, किती त्याग, कशी ध्येयोत्कटता ! आणि शेवटी अतिथी राजाला जेवायला बोलावतो. राजा श्रियाळ कचरतो, त्या वेळेस ती थोर सती पतीला धीर देत म्हणते :
"नवमास वाहिला म्यां उदरांत । तुम्हां जड नव्हे चौ प्रहरांत । '
'आपल्या बाळाला मी नऊ महिने पोटात ठेविले. तुम्हांला चार प्रहर ठेववत नाही का ?'
जो युध्दाला बाहेर पडणार नाही, त्याला तापलेल्या तेलात टाकण्यात येईल, अशी हंसध्वज राजा दवंडी पिटवितो; परंतु त्याचा प्रिय पुत्र सुधन्वा पत्नीप्रेमाने घरी राहतो. त्याला यावयास उशीर होतो. परंतु न्यायी हंसध्वज मागेपुढे पाहात नाही. जी शिक्षा मी इतरांस केली असती ती माझ्या मुलास नको का ? सुधन्वा तप्त तेलात टाकला जातो !
सावित्री पतीसाठी मरणापाठोपाठ जावयास तयार होते ! घोर अरण्य ! रात्रीची वेळ ! समोर मृत्युदेव ! परंतु ती सती भीत नाही. ती मृत्यूचेही मन वळविते.
आणि ती गांधारी ! पतीला दृष्टिसुख नाही, मग मी ते कसे भोगू ? ती आपले डोळे जन्मभर बांधून ठेविते ! त्या त्यागाची कल्पनाच करवत नाही. समान हक्कासाठी भांडणा-या भारतीय नारींनो ! हा पाहा सती गांधारीचा समान हक्क ! गांधारीसमोर भगवान श्रीकृष्ण थरथरत उभा राहात असे. भारतीय पतिव्रतांनो ! तुम्हांस अनंत प्रणिपात !
विश्वावर प्रेम करणारे भगवान बुध्द उपाशी वृध्द वाघिणीच्या तोंडात आपली मांडी देतात ! संत नामदेव कुत्रा कोरडी पोळी खाईल, म्हणून त्याच्या पाठोपाठ तूप घेऊन धावतात ! झाड तोडणा-यासमोर तुळशीदास जाऊन उभे राहतात. आणि म्हणतात, 'माझ्या मानेवर घाव घाला. त्या सुंदर झाडावर नको.' कबिराच्या आज्ञेवरून रानातून गवत कापून आणण्यासाठी गेलेला कुमार कमाल ते प्रभातकाळच्या मंद वा-याने डुलणारे गवत पाहून विरघळतो. 'नको रे कापू, नको रे कापू' असे जणू ते म्हणत आहे असे त्याला वाटते. त्याच्या हातातील विळा गळून पडतो. डोळ्यांतून प्रेमाश्रू गळतात. तसाच तो माघारा येतो. कबीर कमालच्या चरणी लागतो.