भारतीय संस्कृती 38
सेवासाधने
सजीव
कुळे, शिक्षक, मजूर, हमाल, माणसे, गायी, बैल, घोडा, खेचर वगैरे पशू.
निर्जीव
पुस्तके, छापखाने, कारखाने, यंत्रे, नांगर, मोटर इत्यादी.
मनुष्य सजीव साधनांपेक्षा निर्जीव साधनांची अधिक काळजी घेतो असे आपणांस दिसून येते. एखादा जमीनदार बैलगाडी नीट ठेवील, चाक नीट आहे की नाही पाहील, वंगण घातलेले आहे की नाही पाहील ; परंतु बैलाला पोटभर चारा मिळाला की नाही, वेळेवर पाणी मिळाले की नाही हे पाहणार नाही.
मोठ्या कारखान्यांत तुम्ही जा. तेथे यंत्राला सारखे तेल मिळत असते. यंत्राची खूप चिंता वाहण्यात येते. यंत्रे वरचेवर स्वच्छ करण्यात येतात. परंतु या निर्जीव यंत्रासमोर जे एक सजीव यंत्र असते, त्याची कोण काळजी घेतो ? त्या मजुरांच्या शरीरयंत्राला तेलातुपाचे ओंगण भरपूर मिळते की नाही, याची काळजी कोणता कारखानदार घेतो?
कारखाना हे सेवेचे साधन आहे. कारखान्यातून समाजाला उपयुक्त वस्तू पुरविण्यात येतात. कारखाना ही पवित्र वस्तू आहे. या पवित्र कर्माची सर्व साधनेही पवित्र आहेत. म्हणूनच यंत्राची नीट काळजी घेणे म्हणजे महान धर्म होय. देवाची मूर्ती म्हणजे माझा साचा. तो साचा घासूनपुसून ठेवणे म्हणजे देवाची मूर्ती घासणे होय. परंतु निर्जीव यंत्रांच्या पूजेबरोबरच सजीव यंत्रांचीही पूजा कारखानदाराने केली पाहिजे. त्या मजुरांना चांगले अन्न, पुरेसे कपडे, राहावयाला नीट हवेशीर घरे, प्यायला स्वच्छ पाणी, अपघातात तत्काल मदत, मजुरांचा विमा, त्यांना पगारी रजा, त्यांना करमणूक इत्यादी सर्व गोष्टी आहेत की नाहीत हे पाहणे म्हणजे महान धर्म होय. हा महान धर्म न पाळणारा नरकाचा धनी आहे. सा-या समाजात तो दास्य-दारिद्र्याचा नरक निर्माण करील. दुर्गुणांचा नरक निर्माण करील. व्यभिचार, चोरी, दारू, खून यांचा प्रसार करील.
समाजात हा दुःखप्रद देखावा दिसतो आहे. श्रीमंत मनुष्य मोटर ठेवण्यासाठी जितकी सुंदर खोली बांधील, तितकी गड्याला राहावयासाठी बांधणार नाही. माणसांपेक्षा मोटरी पूज्य आहेत ! मजुरांपेक्षा यंत्रे मौल्यवान आहेत ! परंतु ही सजीव सेवासाधने जर उपेक्षिली गेली तर सारा संसार भयाण होईल, ह्याची ह्या विचारहीन स्वार्थी कारखानदारांस कल्पनाही नसते.
गीतेतील पंधराव्या अध्यायात क्षर व अक्षर असा दोन प्रकारचा पुरुष सांगितला आहे ; आणि या दोघांना व्यापून असणारा तो पुरुषोत्तम. क्षरसृष्टी, अक्षरसृष्टी व त्यांना वेढून असणारा परमात्मा. तिघेही पवित्र. क्षरसृष्टी म्हणजे आजूबाजूची बदलणारी सृष्टी. या क्षरसृष्टीतून आपणांस सेवेची साधने मिळतात. फुले, फळे, धान्य सारे मिळते. लाकूड, धातू, दगड सारे मिळते.