भारतीय संस्कृती 174
मृत्यू म्हणजे आईच्या कुशीत जाऊन झोपणे ! लहान मूल दिवसभर खेळते, खिदळते, रडते, पडते. रात्र पडताच आई हळूच त्याला उचलून घेते. त्याची खेळणी वगैरे तेथेच पडतात. आई त्याला कुशीत घेऊन झोपते. ती आईची ऊब घेऊन बाळ ताजेतवाने होऊन सकाळी पुन्हा दुप्पट उत्साहाने चेष्टा करू लागते. तसेच जीवाचे. जगात दमलेल्या, श्रमलेल्या जीवाला ती माता उचलून घेते. बाळाची इच्छा नसतानाही उचलून घेते. आपल्या सोबत्यांकडे, आपल्या सांसारिक खेळण्यांकडे बाळ आशाळभूत दृष्टीने बघत असतो. परंतु आईला बाळाचे हित ठावे. त्या रडणा-या बाळाला ती घेते. कुशीत निजविते. जीवनरस पाजून पुन्हा पाठवते.
मृत्यू म्हणजे माहेरी जाऊन येणे. सासरी गेलेली लेक दोन दिवस माहेरी जाऊन येते. पुन्हा प्रेम, उत्साह, आनंद, मोकळेपणा घेऊन येते. त्याप्रमाणे त्या जगन्माउलीजवळ जाऊन येणे म्हणजेच मृत्यू. लहानपणी शाळेत जाणारी मुले मध्येच घरी जाऊन येतात. पाणी पिण्याचे निमित्त करून, भुकेचे निमित्त करून, आजारीपणाचे निमित्त करून, मुले घरी जातात. त्यांना आईचा मुखचंद्र पाहावयाची तहान असते. आईच्या प्रेमाची भूक असते. आई प्रेमाने बघते. पाठीवरून हात फिरविते. वडी देते. जा म्हणते, मुले हसत-खेळत पुन्हा प्रसन्नपणे शाळेत येतात व धडे शिकू लागतात. तसेच हे जगाच्या शाळेत कंटाळलेले, किदरलेले जीवन आईचा मुखचंद्र पाहावयास आसावतात. ते आईकडे जातात. भरपूर प्रेमरस पिऊन पुन्हा या संसाराच्या महान विद्यालयात शिकू लागतात.
मरण म्हणजे विश्रांती ! मरण म्हणजे अनंतात स्नान ! थकलेले, कंटाळलेले लोक गावाबाहेर तलावात पोहून येतात, समुद्रात डुंबून येतात. नदीच्या पाण्यात नाचून, कुदून येतात. त्यांना थकवा जातो. जीवनात डुंबल्यामुळे जीवन मिळते. मरण म्हणजे काय ? जगात दमलेले जीव अनंत जीवनाच्या सिंधूत डुंबून येतात. हे डुंबावयास जाणे म्हणजे मरण. ही सुट्टी आहे. मरण म्हणजे अनंत जीवनात पोहून येण्यासाठी मिळालेली महान सुट्टी. त्या जीवनात न्हाऊन, माखून, पुन्हा ताजेतवाने होऊन आपण जगात कर्मे करावयास येतो.
उंच शिखरावरच्या महादेवाच्या मंदिराकडे जाण्यासाठी पाय-या असतात. त्याप्रमाणे परिपूर्णतेच्या शिखराकडे जाण्यासाठी जन्म-मरणाची पावले टाकीत जीव जात असतो. मरण म्हणजे एक पाऊलच, मरण म्हणजेही प्रगतीच. मरण म्हणजे पुढे जाणे. देवाकडे नेणा-या पाय-यांना आपण प्रणाम करतो. त्या पाय-या पवित्र वाटतात, ध्येयसाधन वाटतात. त्याप्रमाणे मरणही पवित्र व मंगल आहे. आतल्या ध्येयाकडे ते घेऊन जाणारे आहे. मरणाला प्रणाम असो !
मरण म्हणजे एक प्रकारे विस्मरण, जगात स्मरणाइतकेच विस्मरणाला महत्त्व आहे. जन्मल्यापासून ज्या ज्या गोष्टी आपण केल्या, जे जे ऐकिले, जे जे पाहिजे, जे जे मनात आले, त्या सर्वांचे जर सारखे आपणांस स्मरण राहिले तर तो केवढा भार होईल ! त्या प्रचंड पर्वताखाली आपण चिरडले जाऊ. हे जीवन असह्य होईल.
व्यापारी ज्याप्रमाणे हजारो घडामोडी करतो, परंतु शेवटी एवढा फायदा किंवा एवढा तोटा, एवढी सुटसुटीत गोष्ट ध्यानात धरतो, तसेच जीवांचे आहे. मरण म्हणजे जीवनाच्या व्यापारातील नफा-तोटा पाहण्याचा क्षण. साठ-सत्तर वर्षे दुकान चालविले, त्याचा आढावा घेण्याची वेळ म्हणजे मरण. त्या नफ्या-तोट्याच्या अनुभवाने शहाणे होऊन आपण पुन्हा दुकाने थाटतो. आईची अनुज्ञा घेऊन पुन्हा व्यापार करावयास आरंभ करतो. कनवाळू, स्वातंत्र्य देणारी आई कधी प्रतिबंध करीत नाही.