भारतीय संस्कृती 128
संत या गोष्टींचा प्रयोग करू लागले. स्वत:च्या वैयक्तिक, मर्यादित जीवनात या प्रयोगाचा त्यांनी अवलंब केला. प्रेमाचीच शक्ती अपार आहे असा त्यांना अनुभव आला. बंगालमध्ये चैतन्य म्हणून थोर संत होऊन गेले. एके दिवशी चैतन्य आपल्या शिष्यांसमवेत नामसंकीर्तन करीत रस्त्याने जात होते. टाळमृदंगाचा घोष सुरू होता. सारे रंगले होते.
“हरि बोल हरि बोल । भवसिंधु पार चल । ”
असा गजर गगनात जात होता. इतक्यात दोघा दुष्टांनी येऊन चैतन्यांच्या मस्तकावर प्रहार केला. भळभळ रक्त वाहू लागले. चैतन्यांचा ब्रह्मचारी शिष्य नित्यानंद त्या दुष्टांवर धावला; परंतु थोर चैतन्य म्हणाले, “निताई ! त्यांनी मला मारले तरी मी त्यांना प्रेमच देणार !”
भजन सुरू होते. चैतन्य ‘हरि बोल’ म्हणत होते. सारे नाचत होते. ते दोघे दुष्टही नाचू लागले ! त्या भजनरंगात तेही रंगले. चैतन्यांची अहिंसा अत्यंत प्रभावी ठरली. त्या दिवसापासून ते दुष्ट दारूडे अगदी निराळे झाले. चैतन्यांचे ते एकनिष्ठ सेवक झाले.
प्रेमाने पशूही क्रूरता विसरतात. अँड्रोक्लिस व सिंह ही गोष्ट जगात सुप्रसिद्धच आहे. सेवेने, प्रेमाने क्रूर पशूही जर माणसाळतात, तर प्रेमाने मनुष्य सुधारणार नाही का?
केलेले प्रेम व्यर्थ जात नाही. समजा, चैतन्यांच्या डोक्यावर आणखी प्रहार बसते व चैतन्य मरते तर? ते मरणही सुपरिणामी झाले असते. त्या मरणाचा त्या दोघांवर काहीच परिणाम नसता का झाला? कदाचित एक मरण त्यांना सुधारावयास पुरे पडले नसते. परंतु याचा अर्थ असा नाही की ते वाया गेले, सती सिंधूचे मरण शेवटी सुधाकराचे डोळे उघडल्याशिवाय राहिले नाही. महान व्यक्तींनी आपापल्या वैयक्तिक जीवनात हिंसेवर अहिंसेचा प्रयोग लहान मोठ्या गोष्टींत आजपर्यंत अनेकदा करून पाहिला. सर्वांनी सांगितले, की हिंसेपेक्षा अहिंसेचे सामर्थ्य अपार आहे. शिक्षणशास्त्रज्ञ शेकडो पुस्तकांत सांगत आहेतकी, मुलांना छड्या मारून सुधारू पाहणे हा चुकीचा मार्ग आहे. “छडी वाजे छम छम विद्या येई घम् घम्” हा सिद्धान्त शास्त्रीय नाही. शिक्षणशास्त्रातील नवीन तत्त्वे सर्व जागतिक व्यवहारात आणावयास हवीत. जग ही एक शाळाच आहे. आपणांस एकमेकांस सुधारावयाचे आहे. हे काम दंडुक्यापेक्षा दुस-याच मार्गाने होणे शक्य आहे.
शास्त्रज्ञ प्रथम आपल्या लहानशा खोलीत पुन:पुन्हा प्रयोग करून पाहतो आणि तो संशयातीत असा यशस्वी झाला, तर जगापुढे मांडतो. मग तो प्रयोगालयातील प्रयोग सर्व जगात रूढ होतो. कोणत्याही ज्ञानाचे असेच आहे. संतांच्या वैयक्तिक जीवनात अहिंसेचा प्रयोग यशस्वी झाला होता. हा प्रयोग व्यक्तिगत जीवनातून समाजाच्या जीवनात आणावयाचा होता. खोलीत सिद्ध झालेले ज्ञान समाज्याच्या व्यवहारात रूढ कारवयाचे होते. महात्मा गांधींनी हे काम हाती घेतले. संतांच्या जीवनातील अहिंसेचा प्रयोग महात्माजींनी सार्वजनिक जीवनात आणला वर्गा-वर्गाचे, जातींचे, राष्ट्रा-राष्ट्रांचे तंटे या अहिंसेच्या मार्गाने सोडवावयाचे, असे त्यांनी ठरविले.