भारतीय संस्कृती 24
या धन-नीतीच्या उपासकांना समाजाचा छळ सोसावा लागतो. शंकराचार्यांनी नुसते अद्वैत सिद्ध केले नाही. ते समाजाच्या व्यवहारात आणण्यासाठी त्यांनी कष्ट केले. दक्षिण देशात भिन्नभिन्न देवतांची उपासना करणारे संप्रदाय होते. या संप्रदायांमध्ये प्रचंड वैरे असतात. परंतु शंकराचार्य म्हणाले, “अरे, सारी एका शक्तीची रूपे. गणपती असो या सूर्य असो; शिव असो, शक्ती असो वा विष्णू असो; या पाचही देवतांची एकत्र पूजा करा. पंचायतनपूजा सुरू करा. भेदात अभेद आणा. अद्वैत कृतीत येऊ दे व कलहही मिटू देत.”
पंचायतनपूजा शंकराचार्यानी सुरू केली. नवीन प्रयोग त्यांनी केला. अद्वैताचा प्रात्यक्षिक प्रयोग. शंकराचार्यांचा त्यासाठी छळ झाला. हे सबगोलंकार करणारे आहेत, हे प्रच्छन्न बुद्धपंथीच आहेत, अशी नाना दूषणे त्यांना मिळाली! त्यांच्यावर बहिष्कार घालण्यात आला. शंकराचार्य मरणोन्मुख आईला भेटावयास गेले. आई मरण पावली. त्या मातेच्या मृत देहाला नेण्यासाठी कोणी मिळेना! शंकराचार्यानी आईच्या देहाचे तीन तुकडे केले. एकेक तुकडा त्यांनी स्मशानात नेला व अग्नी दिला! आज मलबार प्रांतात मेलेल्या मनुष्याच्या अंगावर तीन रेषा ओढतात. तीन तुकड्यांची ती कठोर निशाणी आहे!
संतांनी संस्कृतातील ज्ञान लोकांच्या भाषेत आणण्याचे महान कार्य सुरू केले. मनुष्याला ज्ञानाशिवाय कसे जगता येईल? सूर्याचे किरण सर्वांना हवेत, त्याप्रमाणे ज्ञानाचेही किरण जीवमात्रास हवेत. ज्ञान हे काही लोकांची वतनदारी असणे म्हणजे घोर अन्याय होता. संतांनी बंड पुकारले. ज्ञानेश्वर, मुकुंदराय, एकनाथ, सारे बंडात सामील झाले. तुकाराम तर म्हणू लागले, “अरे घोक्यांनो, पाठीवर भार वाहून चव कळत नाही!”
वेदांचा तो अर्थ आम्हांसीच ठावा
येरांनी वाहावा भार माथां।।
प्रत्यक्ष जीवनात जे अद्वैत अनुभवू लागले, त्यासाठी सनातनींचे होणारे विरोध न जुमानता जे वागू लागले, त्यांनाच वेद समजत होता. वेद म्हणजे ज्ञानाचा साक्षात्कार! ज्ञान हे साक्षात्कारासाठी आहे. भरल्यापोटी चर्चेसाठी नाही.
पहिले बाजीराव पेशवे मस्तानीपासून झालेल्या पुत्रांची मुंज करू पाहात होते. त्यांचे हसे झाले. त्यांना अपमान सहन करावे लागले. परंतु भारतीय संस्कृतीचा आत्मा त्यांनी ओळखला होता.
गीतेत चार प्रकारचे भक्त सांगितले आहेत. माझ्या मते त्यात फार थोर दृष्टी आहे. समाजाची उन्नती करणारे सारे शास्त्रच जणू त्यात आले आहे.
आर्ता जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ।
आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी व ज्ञानी असे हे चार भक्त आहेत.