भारतीय संस्कृती 53
अविद्या म्हणजे भौतिक ज्ञान. या भौतिक ज्ञानाने आपण मृत्यू तरतो म्हणजे हा मृत्यूलोक तरतो ; संसारातील दुःखे, रोग, संकटे यांचा परिहार करतो. संसारयात्रा सुखकर करतो. आणि विद्येने अमृतत्त्व मिळते. अध्यात्मज्ञानाने या शरीराच्या आतील, या आकारातील चैतन्य एकच आहे हे कळून अमरता अनुभवास येते.
जो केवळ विद्येला भजेल किंवा केवळ अविद्येला भजेल, तो पतित होईल. एवढेच नव्हे, तर हे उपनिषद सांगते की, केवळ अविद्येची उपासना एक वेळ पत्करली ; परंतु केवळ अध्यात्मात रमणार तर फारच घोर नरकात पडतो. कारण विज्ञानाची उपासना करणारा संसाराला, निदान स्वतःच्या राष्ट्राच्या संसाराला तरी शोभा आणील. परंतु कर्मशून्य वेदान्ती सर्व समाजाला धुळीत मिळवितो. समाजात तो दंभ निर्माण करतो. अध्यात्म व भौतिक शास्त्र यांत कोणत्या एकाचीच कास धरावयाची असेल, तर ईशोपनिषद म्हणते, “भौतिक शास्त्रांची कास धर.” केवळ भौतिक शास्त्रांची कास धरल्याने पतित होशील, परंतु तितका पतित होणार नाहीस-जितका केवळ अध्यात्मवादी झाल्याने होशील-
अन्धं तमः प्रविशन्ति येऽविद्यां उपासते।
ततः भूयः इव ते तमः येऽविद्यायां रताः।।
कर्मे करीत शंभर वर्षे उत्साहाने जगा असा महान संदेश देणारे हे उपनिषद असे सांगत आहे. विज्ञानाची कुटाळकी व हेटाळणी करणे हे भारतीय संस्कृतीची जोपासना करणा-यांना शोभत नाही. विज्ञान तुच्छ नाही ; विज्ञान महान वस्तू आहे हे आता तरी आपण ओळखू या.
गीतेमध्ये ज्ञान-विज्ञान हे शब्द नेहमी बरोबर येतात. विज्ञानाशिवाय ज्ञान निरुपयोगी आहे, आणि ज्ञानाशिवाय, अद्वैत विज्ञान भेसूर आहे. ज्ञानाच्या पायावर विज्ञानाची इमारत उभारली तर कल्याण होईल. पाश्चिमात्य लोक विज्ञानाची इमारत वाळूवर उभारीत आहेत. म्हणून ही इमारत गडगडेल व संस्कृती गडप होईल. विज्ञानाचा पाया अध्यात्माच्या पायावर उभारणे हे भारतीय संस्कृतीचे भव्य कर्म आहे. हे महान कर्म भारताची वाट पाहात आहे. भारत हे कर्म नाही का अंगावर घेणार ?
प्रपंच व परमार्थ यांचे हे रमणीय संमीलन आहे. ज्ञान-विज्ञानाच्या या विवाहातून मांगल्याची बाळे जन्माला येतील व पृथ्वीवर स्वर्ग अवतरेल !