भारतीय संस्कृती 119
आणि सर्वात थोर ही पृथ्वी ! किती क्षमावान ! किती उदार ! तिला आपण नांगराने टोचतो, परंतु ती कणसे घेऊन वर येते ! आपण तिच्यावर किती घाण करतो. तिच्यावर नाचतो, कूदतो. परंतु ही भूमाता रागावत नाही.
“ऐशी ही धरणीमाय करीं क्षमा जगाला”
ती आपल्या सर्व लेकरांना क्षमा करते. भारतीय संस्कृती म्हणते, “भूमातेचे स्मरण ठेव. तिला विसरू नकोस.” आपल्या कहाण्यांत पृथ्वीची कहाणी आहे. पृथ्वीमहिमा आपण विसरलो नाही. चंद्र-सूर्य-ता-यांची फुले तिच्या खोप्यात आहेत. समुद्राचे वस्त्र ती नेसली आहे. फुलांचे हार तिने घातले आहेत. हिरवी चोळी तिने घातली आहे. शेष-वासुकींचे तोडेतोरड्या तिच्या पायांत आहेत. भव्य महान महीमाता !
प्रात:काळी उठताना त्या पृथ्वीमातेला म्हणावयाचे, “आई ! माझे पाय तुला आता शतदा लागतील. रागावू नकोस.”
“विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे ।”
चराचरावर प्रेम करू पाहणारी, कृतज्ञता सर्वत्र प्रकट करणारी ही भारतीय संस्कृती आहे. ह्या संस्कृतीचा अंतरात्मा ओळखा. तिचा सूर ओळखा. ह्या संस्कृतीचे ध्येय काय, गन्तव्य-मन्तव्य-प्राप्तव्य काय, याचा सहृदयतेने व बुद्धिपूर्वक विचार करा. आणि पूर्वजांची ही थोर दृष्टी घेऊन पुढे जा. तसा प्रयत्न करा. ध्येयाकडे जाण्याचा अविरत प्रयत्न करणे हेच आपले काम आहे.
विश्वावर प्रेम करण्याचे ध्येय देणा-या हे थोर भारतीय संस्कृती, तुला शतश: प्रणाम ! तुला वाढविणा-या थोर पूर्वजांनाही अनंत वंदने !